जेट एअरवेज (Jet Airways) या कंपनीचे संस्थापक नरेश गोयल (Naresh Goyal) यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. नरेश गोयल यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोयल यांच्या विरोधात कॅनरा बँकेकडून 538 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीवरून ईडीने गोयल यांच्यासह अनिता गोयल, आनंद शेट्टी आणि जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅनरा बँकेच्या कर्ज प्रकरणात ईडीने नरेश गोयल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तब्बल चौकशी अंती इडी शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली आहे. शनिवारी गोयल यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी ईडीकडून गोयल यांच्या कस्टडीची मागणी केली जाईल.
काय आहे प्रकरण?
कॅनरा बँकेने जेट एअरवेजला 848.86 कोटी रुपयांचे कर्ज मंजुर केले होते. मात्र, जेट एअरवेजकडून 538.62 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यात आली नाही. या फसवणुकी प्रकरणी नोव्हेबर 2022 मध्ये कॅनरा बँकेने जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्यासह त्यांच्या पत्नी अनित गोयल , आणि जेट एअरलाईन्सचे संचालक गौरव आनंद शेट्टी यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीबीआयने गोयल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, एअरलाईन क्षेत्रात सेवा देणाऱ्या जेट एअरवेजची सेवा ही आर्थिक तोट्यात आल्यामुळे 2019 मध्येच बंद पडली आहे.
मालमत्तांवर छापेमारी
सीबाआयकडे दाखल झालेल्या गुन्ह्यातून यामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर ईडीने गोयल यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच जुलैमध्ये इडी गोयल यांच्या 8 ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी गोयल यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.