सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने डिमॅट आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेधारकांना आपल्या खात्यामध्ये नॉमिनीची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मूदत देण्यात आली आहे. तुम्ही अद्यापही तुमच्या खात्यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नोंदवले नसेल तर आत्ताच त्यांची नोंद करून घ्या, अन्यथा तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. त्यानंतर तुम्हाला त्यावर व्यवहार करता येणार नाहीत.
नॉमिनीची नोंद करणे अनिवार्य
सेबीने गुंतवणूकदारांना त्यांची मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी, तसेच त्यांच्या पश्चात त्यांची गुंतवणूक अथवा मालमत्ता त्यांच्या कायदेशीर वारसांकडे हस्तांतरित करण्यासाठी अडथळे निर्माण होऊ नये, या उद्देशाने नॉमिनी नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीच्या नियमानुसार सर्वच डिमॅट खातेधारक आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना नॉमिनीची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
खाते गोठवले जाणार-
प्रत्येक खातेधारकाने नॉमिनीचे नोंद करणे आवश्यक असताना किंत्येक खातेधारकांकडून बऱ्याच वेळा दिरंगाई केली जाते.त्यामुळे सेबीने आता थेट 30 सप्टेंबरपर्यंतची मूदत देऊन नॉमिनी नोंदीचे निर्देश दिले. शिवाय या मुदतीनंतर नॉमिनीची नोंद नाही केल्यास खाते गोठवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता खातेधारकांना मुदतीपूर्वीच खात्यामध्ये नॉमिनीची नोंद करावी लागणार आहे. दरम्यान, मुदतीनंतर ज्यावेळी ग्राहक नॉमिनीची नोंदीची प्रक्रिया पूर्ण करेल त्यानंतर पुन्हा त्यांचे खाते पूर्ववत सुरू करण्यात येईल.
3 नॉमिनीची नोंद करू शकता
सध्याच्या नियमांनुसार खातेधारक आपल्या खात्यात तीन जणांची नावे नामनिर्देशित करू शकतात. मात्र, अशा प्रकारे एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर खातेधारकांना त्यांच्या हिश्श्याचे प्रमाण देखील नमूद करणे गरजेचे आहे. नॉमिनीच नोंद करण्यासाठी खातेधारकांना NSDL च्या संकेतस्थळावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.