Concord Biotech IPO: बायोटेक्नॉलॉजी फर्म Concord Biotech कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात 4 ऑगस्टला गुंतवणुकीसाठी ओपन होणार असून तो 8 ऑगस्टपर्यंत खुला असणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी कोणतेही नवीन शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार नाही. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलसाठी उपलब्ध असणार आहे.
कॉनकॉर्ड बायोटेक कंपनीचे अहमदाबादमध्ये मुख्यालय आहे. या कंपनीमध्ये क्वाड्रिया कॅपिटल आणि दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची कंपनी रेअर इंटरप्रायजेस यांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या या कंपनीवर विशेष नजर असणार आहे. कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत 2.09 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी करून देणार आहे. तर याची विक्री Helix Investment Holdings कंपनीकडून होणार आहे. हेलिक्स इन्वेस्टमेंट होल्डिंग कंपनीची कॉनकॉर्डमध्ये जवळपास 20 टक्के भागीदारी आहे. हेलिक्स कंपनी आपला सर्व हिस्सा या आयपीओच्या माध्यमातून विकणार आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 2004 मध्ये यामध्ये गुंतवणूक केली होती. तर झुनझुनवाला यांच्या रेअर इंटरप्रायजेस कंपनीजवळ कॉनकॉर्डचे 24.09 टक्के भागीदारी आहे.
कंपनीने अँकर गुंतवणूकदारांसाठी 3 ऑगस्ट हा दिवस राखीव ठेवला आहे. तर एकूण शेअर्सपैकी 50 टक्के शेअर्स हे पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB), 15 टक्के गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव ठेवले आहेत. तर उर्वरित 35 टक्के शेअर्स हे किरकोरळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर कंपनीने जवळपास 10 हजार शेअर्स हे कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहेत.
आयपीओच्या माध्यमातून कॉनकॉर्ड कंपनीला थेट पैसे मिळणार नाहीत. कारण कंपनी एकही नवीन शेअर्स विक्रीसाठी आणत नाही. त्यामुळे ऑफर फॉर सेलमधून जे शेअर्सची विक्री करणार आहेत. त्यांच्याकडेच हे पैसे जातील. शेअर्सचे अलॉटमेंट 11 ऑगस्टला होणार असून 17 ऑगस्टला गुंतवणूकदारांच्या खात्यात शेअर्स जमा होतील आणि 18 ऑगस्टला त्याचे लिस्टिंग होईल.