चेक म्हणजे आर्थिक व्यवहार करायचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे बरेच मोठाले व्यवहार चेकद्वारेच केल्या जातात. कारण, तुम्हाला मोठी रक्कम चोरी होण्याची किंवा ते सांभाळण्याचे टेन्शन राहत नाही. महत्वाचे म्हणजे, जेव्हा आपण बॅंकेत चेकद्वारे व्यवहार करतो. तेव्हा त्याची नोंद बॅंकेद्वारे केली जाते.
नंतर भविष्यात जर गरज पडली तर त्या व्यवहाराला सहज ट्रॅक करता येते. त्यामुळे चेकचा वापर सर्व जण व्यवहारासाठी करतात. पण, तुमचा चेक बाउन्स झाल्यास, बॅंक तुमच्यावर चार्ज आकारते. त्यामुळे चेकचा व्यवहार करताना तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
चेक बाउन्स होण्याचे कारण
चेक बाउन्स म्हणजे तुम्ही बॅंकेत चेकद्वारे व्यवहार करायला गेला आणि तो व्यवहार किंवा प्रक्रिया अयशस्वी झाली तर त्याच्यासाठी चेक बाउन्स ही टर्म वापरली जाते.मात्र, चेक बाउन्स होण्याचे मुख्य कारण पाहायला गेल्यास ते म्हणजे जारीकर्त्याच्या खात्यात पैसे नसणे हे आहे. त्यामुळे तुम्ही चेक वटवायला गेला आणि त्या खात्यात पैसे नसले की तुमचा चेक बाउन्स होतो.
भरावा लागू शकतो दंड
भारतात चेक बाउन्स बेकायदेशीर आणि फौजदारी गुन्हा मानला जाऊ शकतो. त्यामुळे जारीकर्त्याला दंड भरावा लागू शकतो. तसेच, काही प्रकरणांमध्ये, कायदेशीर कारवाई (बँकेद्वारे) जारीकर्त्यावर होऊ शकते. त्यामुळे चेक बाउन्स झाल्यास जारीकर्त्याला आर्थिक फटका बसू शकतो. यावर काही बॅंका चार्जेस देखील आकारतात.
बॅंकेनुसार चार्जेस आहेत वेगळे
प्रत्येक बॅंकाचे चार्जेस वेगवेगळे असू शकते. तसेच, शुल्काव्यतिरिक्त विविध दंड आणि सेवा कर आणि उपकर बॅंकाकडून आकारला जातो. तुमचे HDFC बॅंकेत खाते असेल आणि तुमचा चेक पहिल्यावेळेस बाउन्स झाल्यास तुम्हाला 350 रुपये द्यावे लागू शकतात. तेच जर पुन्हा ही तुमचा चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला 750 रुपये चार्ज द्यावा लागतो. तेच जर तांत्रिक कारणामुळे चेक बाउन्स झाल्यास 50 रुपये चार्ज द्यावा लागतो.
ICICI बॅंकेत लोकल चेक डिपाॅझिट केल्यानंतर बाउन्स झाल्यावर 100 चार्ज द्यावा लागतो. तेच, पहिल्या महिन्यात तुमचा चेक रिटर्न झाल्यास 350 आणि त्याच महिन्यात वित्तीय कारणांसाठी रिटर्न झाल्यास 750 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तर गैर-वित्तीय व्यवहारासाठी 50 रुपये चार्ज द्यावा लागतो, स्वाक्षरी व्हेरिफिकेशन वगळता. तेच, आउटस्टेशन चेक बाउन्स झाल्यावर प्रति चेक 150 अधिक बॅंकेचे चार्जेस द्यावे लागतात.
जर तुमचा SBI बॅंकेत चेक बाउन्स झाल्यास, तुमची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास तुम्हाला 150 अधिक जीएसटी चार्जेस द्यावे लागणार आहेत. तेच, रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असल्यास 250 आणि जीएसटीही द्यावा लागणार आहे. तसेच, तुमच्या खात्यात कमी पैसे असल्यास, तुम्हाला 500 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. तेच काही तांत्रिक कारणामुळे चेक बाउन्स झाल्यास 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागणार आहे.
त्यामुळे तुम्ही बॅंकेत व्यवहार करत असताना, चेक व्यवहाराला हलक्यात घेऊ नका. यामुळे तुमच्या आर्थिक बाबींवर परिणाम पडू शकतो. त्यामुळे खात्यात पुरेपूर रक्कम असेल तेव्हाच चेक देणे फायद्याचे आहे.