रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही भारतातील मध्यवर्ती बँक असून ती सर्व बँकांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवून असते. RBI ने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे देशातील बँकांना बंधनकारक आहे. या नियमांमध्ये तडजोड केली किंवा नियमांचे उल्लंघन केल्यानंतर बँकांना दंड ठोठावण्याचा अधिकार RBI ला देण्यात आला आहे.
याच अधिकार श्रेणीचा वापर करून RBI ने देशातील सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट्रल बँकेवर (Central Bank) कारवाई केली असून तिला 84.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँकेने आर्थिक व्यवहार करताना काही नियमांचे पालन न केल्याने त्यांना हा दंड लागू करण्यात आला आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
सेंट्रल बँकेच्या रिस्क असेसमेंट रिपोर्ट आणि इन्स्पेक्शन रिपोर्टची पडताळणी
भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 मे रोजी सेंट्रल बँकेला (Central Bank) हा दंड ठोठावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक निर्देश (वित्तीय बँका आणि काही निवडक वित्तीय संस्थाच्या माध्यमातून फसवणूक आणि रिपोर्टिंग) 2016 आणि मास्टर सर्क्युलरमध्ये सांगण्यात आलेल्या काही नियमांचे पालन न केल्याने हा दंड करण्यात आला आहे.
RBI ने सेंट्रल बँकेच्या रिस्क असेसमेंट रिपोर्ट आणि इन्स्पेक्शन रिपोर्टची पडताळणी करून ही कारवाई केली आहे. या पडताळणीत सेंट्रल बँकेने आखून देण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याचे दिसून आले आहे. RBI ने असे सांगितले आहे की, सेंट्रल बँकेने पैसे हस्तांतरणा संदर्भातील नियमांचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांना दंड ठोठावला आहे. RBI च्या या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. ग्राहकांना बँकेकडून उत्तम सेवा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात येणार आहे.
'या' बँकेवर देखील केली होती कारवाई
मागील आठवड्यातच RBI ने कॅनरा बँकेला (Canara Bank) देखील दंड ठोठावला होता. या दंडाची रक्कम 2 कोटी रुपये होती. तसेच गेल्या 24 तासात आरबीआयने चार को-ऑपरेटिव्ही बँकांना देखील दंड ठोठावला आहे. हा दंड 44 लाख इतका आहे.
पुण्याची जनता सहकारी बँक, बॉम्बे मर्केटाईल को-ऑपरेटिव्ही बँक आणि राजस्थानमधील बारा येथील बारा नागरिक सहकारी बँकेवर देखील आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. चेन्नईतील तामिळनाडू स्टेट को-ऑपरेटिव्ही बँकेला देखील 16 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्व बँकांनी बँकिंग आर्थिक व्यवहारांचे नियम न पाळल्याने कारवाई करण्यात आली आहे.