महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात रेपो दरात वाढ केली आहे. यामुळे बँकांनी कर्जदर आणि ठेवीदरात वाढ केली आहे. कर्जदारांसाठी व्याजदर वाढ डोकेदुखी वाढवणारी असली तरी ठेवीदार मात्र सध्या आनंदात आहे. मुदत ठेवींवरील व्याजदर हा सरासरी 7% वर गेला आहे. बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर जादा व्याज दिले जाते.
मुदत ठेव हा सर्रास गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे. त्यातही बँकांमधील गुंतवणूक ही तुलनेने सुरक्षित आणि कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. मात्र बड्या कमर्शिअल बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँकांकडून ठेवींवर चांगले व्याज दिले जात आहे. युनिटी स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांकडून ठेवींवर 8 ते ९ % व्याज दिले जात आहे.
एसबीआय, एचडीएफीसी बँक, आयसीआयसीआय बँक या बँकांचा व्याजदर 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी 3% ते 7.10% या दरम्यान आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी व्याजदर 3.50% ते 7.60% इतका आहे. अॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी 3.50% ते 7.20% व्याज दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा 3.50% ते 7.95% इतका व्याजदर आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा व्याजदर 4.5% ते 9% इतका आहे. किमान 1001 दिवसांसाठी ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर 9.5% व्याज दिले जाते. इतरांना याच ठेवीसाठी 9% व्याजदर दिला जातो. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेकडून 6 महिने ते 201 दिवसांसाठी 8.75% इंटरेस्ट रेट दिला जातो. 501 दिवसांच्या मुदत ठेवीवर 8.75% व्याज असून 1001 दिवसांसाठी 9% व्याजदर आहे. ज्येष्ठ नागरिकांना 6 महिने ते 201 दिवसांसाठी 9.25%, 501 दिवसांसाठी 9.25% आणि 1001 दिवसांसाठी 9.50% व्याज दिले जाते, असे बँकेने म्हटले आहे.
स्मॉल फायनान्स बँकांपैकी एक असलेल्या फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने सर्वसामान्यांना 1000 दिवसांच्या ठेवींवर 8.4% व्याजदर जाहीर केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1000 दिवसांसाठी 9.01% व्याज दिले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)