Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Banking Reforms: बदलत्या बँकिंग व्यवस्थेतील धोरण अंमलबजावणीसाठी `जनअभियान`

AIBEA

Banking Reforms: नोटबंदी ते जनधनसारख्या योजना, अद्ययावत यंत्रमानव ते मूळ तंत्रज्ञानरहित बँकिंग व्यवहार, अपुरे मनुष्यबळ ते महागडी बँकिंग सुविधा अशा बदलत्या बँकिंग स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत 13 मे 2023 पासून तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होत आहे.

नोटबंदी ते जनधनसारख्या योजना, अद्ययावत यंत्रमानव ते मूळ तंत्रज्ञानरहित बँकिंग व्यवहार, अपुरे मनुष्यबळ ते महागडी बँकिंग सुविधा अशा बदलत्या बँकिंग स्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत 13 मे 2023 पासून तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. अनेक दशकानंतर महाराष्ट्रात होत असलेल्या या अधिवेशनात देश-विदेशातील आघाडीचे कामगार नेते उपस्थित राहणार असून बँकिंग विषयक धोरण अंमलबजावणीसाठीच्या जनअभियानाचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

देशभरातील विविध बँक कर्मचारी-अधिका-यांचे नेतृत्त्व करणा-या ऑल इंडिया बँक्स एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) आयोजित केलेले हे अधिवेशन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात होईल. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन (एमएसबीईएफ) ही राज्यातील 35 हजारांहून अधिक कर्मचा-यांची संघटना या अधिवेशनाची यजमान संस्था आहे. अधिवेशनात मॉरिशस, सायप्रस, डेन्मार्क, मलेशिया, ब्राझील, इजिप्त आदी देशातील बँक क्षेत्रातील अनेक शिष्टमंडळेही असतील. 3 हजारांहून अधिक प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी होतील.

13 मे रोजी अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी 12 मे 2023 रोजी नॅशनल इन्स्टिट्युट आफ बँक मॅनेजमेंटचे माजी संचालक आर. बंदोपाध्याय लिखित `टुवार्ड्स ट्रान्सफॉर्मिंग बँक्स एज पब्लिक युटिलिटी इन्स्टिट्युशन्स` पुस्तकाचे प्रकाशन होईल. सायंकाळी ६ वाजता षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला पिपल्स पब्लिशिंग हाऊसचे डॉ. भालचंद्र कांगो उपस्थित असतील. यावेळच्या चर्चासत्रात इंदिरा गांधी इन्स्टिट्युट आफ डेव्हलमेंट रिसर्चचे मानद प्राध्यापक डॉ. दिलीप नाचणे, एल अँड टी फायनान्स हाऊसिंगच्या समूह मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. रुपा रेगे-नित्सुरे, आयआयएम, अहमदाबादचे प्राध्यापक डॉ. टी. टी. राम मोहन व एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचेलम सहभाग घेतील.

अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव व एमएसबीईएफचे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, एआयबीईएचे हे यंदाचे २९ वे अधिवेशन आहे. यापूर्वी मुंबई तसेच पुणे येथे संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन झाले आहे. नोटबंदी, टाळेबंदी अशा महत्त्वाच्या टप्प्यानंतर होत असलेल्या यंदाच्या अधिवेशनात गेल्या काही वर्षातील बँक क्षेत्रातील बदलाचा उहापोह घेतला जाणार आहे. अधिवेशनात सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून बँकिंग विषयक धोरण आणख्यासाठीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी व्यापक जनमत संघटित करण्यासाठी देशभरात जनअभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भात एक विशेष ठराव अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात संमत करण्यात येईल.

'एआयबीईए'चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचेलम यांनी सांगितले की, एआयबीईए ही ७७ वर्षांपासून बँक कर्मचा-यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी देशव्यापी संघटना आहे. देशभरात तिचे ५ लाखांहून अधिक सदस्य आहेत. राष्ट्रीयीकरणानंतर गेल्या ५३ वर्षात बँक शाखांची संख्या १ लाख पार झाली आहे. या दरम्यान ठेवी आणि कर्जाचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्मचारी संख्या वर्षागणिक हजारोच्या संख्येने कमी होत आहे. गेल्या पाच दशकात ३० हून अधिक खासगी बँका बंद पडल्या आणि नऊ महिन्यात ९१ हजार कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित झाली. भारतीय बँकिंग क्षेत्राचे असे चित्र असताना त्याविषयीची कारणमिमांसा या राष्ट्रीय अधिवेशनात होईल.

पी. साईनाथ परिषदेचे मुख्य वक्ते

राष्ट्रीय अधिवेशनाला रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे संबोधित करणार आहेत. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या सरचिटणीस अमरजीत कैर या अधिवेशनाचे उद्घाटन करतील. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनिटनचे सरचिटणीस पॅम्बिस क्यार्टिसिस, शेतकरी नेते सुखदेव सिंग, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक संजीव बंदलीश हे प्रमुख पाहुणे असतील. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान एआयबीईएचे अध्यक्ष राजन नागर हे भूषवतील. अधिवेशनाच्या उद्घाटनदिनी खा. बिनय विश्वंम, खा. कुमार केतकर, खा. सुप्रिया सुळे व खा. अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती असेल. पुढील दोन दिवस अधिवेशनात शिष्टमंडळ चर्चा, ठराव-प्रस्ताव आदी असतील.