Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD Cancelation Process: मॅच्युरिटीपूर्वीच बँकेतील मुदत ठेव बंद करायची असेल, तर प्रक्रिया जाणून घ्या

Bank FD Cancelation Process

Image Source : economictimes.indiatimes.com

Bank FD Cancelation Process: सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक म्हणजे मुदत ठेव योजना. यामध्ये निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याजदर देण्यात येतो. बऱ्याच वेळा आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मॅच्युरिटीपूर्वी मुदत ठेव मोडली जाते. त्याची प्रक्रिया काय, जाणून घेऊयात.

गुंतवणुकीचा सर्वात जुना आणि सुरक्षित पर्याय म्हणून बँकेतील मुदत ठेव योजनेकडे (FD) पाहिले जाते. सरकारी किंवा खासगी बँका मुदत ठेवींवर वेगवेगळा व्याजदर देतात. या मुदत ठेवीचा परतावा हा त्याच्या मॅच्युरिटीनंतर मिळतो. जर तुम्हाला आर्थिक अडचणीच्या वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज असेल, तर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी बँकेतील मुदत ठेव मोडून पैसे मिळवू शकता. मात्र अशा परिस्थतीत तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नाही.

जर तुम्हीही मॅच्युरिटीपूर्वी मुदत ठेव मोडण्याचा विचार करत असाल, तर बँकांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने (Online & Offline Process) ही प्रक्रिया राबविली जाते. जवळपास प्रत्येक बँकेची मुदत ठेव मॅच्युरिटीपूर्वी मोडण्याची प्रक्रिया एकसारखीच असते. आज ती आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात.

एचडीएफसी बँकेची मुदत ठेव मॅच्युरिटीपूर्वी कशी बंद कराल?

देशातील नामांकित एचडीएफसी बँकेमध्ये (HDFC Bank) तुम्ही 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करू शकता. ही मुदत ठेव मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याआधी बंद करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही मुदत ठेव बंद करता येते. ऑनलाईन पद्धतीने मुदत ठेव बंद करण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

1) एचडीएफसी बँकेच्या अधिकृत नेट बँकिंग पोर्टलला भेट द्या.

2) नेट बँकिंगचे डिटेल्स वापरून तुम्ही अकाउंटमध्ये लॉग इन करा.

3) त्यानंतर मुदत ठेव (Fixed deposit) पर्यायावर क्लिक करा.

4) 'लिक्विडेट फिक्स्ड डिपॉझिट' या पर्यायावर क्लिक करा.

5) आता ड्रॉप डाऊन सुचीमध्ये तुम्ही जे मुदत ठेव खाते बंद करणार आहात, त्या खात्याची निवड करून Continue पर्यायावर क्लिक करा.

6) नोंदवलेल्या माहितीची खात्री करून सबमिट पर्यायावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण करताच तुमच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

ऑफलाईन प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

1) एचडीएफसी बँकेतील मुदत ठेव ऑफलाईन पद्धतीने बंद करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल.

2) त्यानंतर बँकेच्या शाखेत जाऊन तुम्हाला या संदर्भातील फॉर्म भरावा लागेल.

3) या फॉर्ममध्ये बँक खात्याचे तपशील, मुदत ठेव क्रमांक, नाव इ. तपशील भरून ते  सबमिट करावे लागतील.

4) तुम्ही फॉर्म बँकेत सबमिट केला की, तुमच्या बचत खात्यात पैसे जमा करण्यात येईल.

Source: indiatv.in