नवीन आर्थिक वर्षातील पहिली समभाग विक्री योजना आज 3 एप्रिल 2023 पासून खुली होणार आहे. अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस या कंपनीचा 865 कोटींचा IPO आज खुला होणार आहे. खुल्या समभाग विक्रीसाठी कंपनीने 415 ते 436 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. (Avalon Technologies 865 crore ipo issue opens today)
अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस समभाग विक्री योजनेत 320 कोटींचे फ्रेश शेअर्स विक्री करणार आहे. 545 कोटींचे शेअर ऑफर फॉर सेल म्हणून प्रवर्तक आणि संचालकांकडून विकले जाणार आहे. गुंतणूकदारांना या आयपीओसाठी 6 एप्रिल 2023 पर्यंत बोली लावता येणार आहे. शेअर मार्केटमध्ये बऱ्याच महिन्यांनंतर आयपीओ धडकला आहे. मागील काही सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ दिसून आली होती. याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्यामुळे शेअर मार्केटमधील अस्थिरता आणि पतधोरण याचे परिणाम अॅव्हलॉन टेक्नॉलॉजिसच्या पब्लिक इश्यूवर दिसून येण्याची शक्यता आहे.
अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस ही इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा (Electronics Manufacturing and Services-EMS) यात काम करणारी कंपनी आहे. भारतात 10 ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. भारतासह चीन जपान, अमेरिका या देशांत कंपनीची सेवा आहे. कंपनीचे भारताबाहेर 2 उत्पादन प्रकल्प आहे. कंपनीने 145 कोटींची कर्ज फेड आणि 90 कोटींची खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी सार्वजनिक समभाग विक्रीची योजना आणली आहे. कंपनीने आयपीओचे एकूण आकारमान कमी केले आहे. यापूर्वी 1025 कोटींचा आयपीओ आणण्याचा प्रस्ताव होता. मात्र तो आता 865 कोटींपर्यंत कमी करण्यात आला आहे. प्री आयपीओ प्लेसमेंटच्या माध्यमातून अव्हलॉन टेक्नॉलॉजीसने 160 कोटी उभारले आहे.
आर्थिक आघाडीवर दोन वर्षांत दमदार कामगिरी
मागील दोन वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरीत प्रचंड वाढ झाली आहे. वर्ष 2020 पासून कंपनीच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. 31 मार्च 2020 अखेर अव्हलॉन टेक्नॉलॉजीसचा एकूण महसूल 653.15 कोटी इतका होता. कर वजा करता कंपनीने 12.33 कोटींचा नफा मिळवला. 31 मार्च 2022 अखेर कंपनीचा महसूल 851.65 कोटींवर गेला आहे. कंपनीला 68.16 कोटींचा करोत्तर नफा मिळाला. या वर्षाअखेर कंपनीवर 294 कोटींचे कर्ज असून एकूण मालमत्ता 587.96 कोटी इतका आहे. कंपनीने निम्मे कर्ज फेडण्यासाठी कंपनीने आयपीओचा निर्णय घेतला आहे. मात्र वर्ष 2022-23 मध्ये कंपनीची कामगिरी सुमार राहिली. एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्यांच्या काळात कंपनीला 34.2 कोटींचा नफा मिळाला. त्यात गतवर्षाच्या तुलनेत 19.2% घसरण झाली आहे.
कसा असेल अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस IPO चा प्रवास
- इश्यू खुला होणार - 3 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023
- IPO - 865 कोटी
- लॉट साईज - 34 शेअर्सचा एक लॉट
- शेअर अलॉटमेंट - 12 एप्रिल 2023
- रिफंड- 13 एप्रिल 2023
- डिमॅट खात्यात शेअर ट्रान्सफर - 17 एप्रिल 2023
- शेअर मार्केटमध्ये लिस्टींग - 18 एप्रिल 2023
- शेअर मार्केट - बीएसई आणि एनएसई