Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan Refinance: वाढत्या व्याजदरापासून वाचण्यासाठी होम लोन ट्रान्सफरचा पर्याय निवडा

Home Loan Refinance

Home Loan Refinance: वाढत्या महागाईबरोबरच कर्जदारांना वाढलेला ईएमआयचा हप्ता आणि वाढलेल्या कर्जाच्या कालावधीला तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी कर्जदार होमलोन रिफायनान्सचा पर्याय स्वीकारून कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी करू शकतात.

रिझर्व्ह बँकेने सलग तीनवेळा रेपो दरात कोणतीही वाढ केलेली नाही. पण तरीही अनेक बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात अपेक्षित कपात केलेली नाही. उलट वाढत्या महागाईबरोबरच कर्जदारांना वाढलेला ईएमआयचा हप्ता आणि वाढलेल्या कर्जाच्या कालावधीला तोंड द्यावे लागत आहे. अशावेळी कर्जदार कमी व्याजदराने इतर बँकेकडून रिफायनान्सचा पर्याय स्वीकारू शकतात.

ईएमआय किंवा कालावधी वाढीशिवाय दुसरा पर्याय काय?

कर्ज देणाऱ्या बँका जेव्हा व्याजदरात वाढ करतात. तेव्हा त्याचा थेट फटका होमलोन किंवा कार लोन घेणाऱ्याच्या मासिक खर्चावर पडतो. होमलोनचा व्याजदर वाढला की, बँका कर्जदारांसमोर दोन पर्याय ठेवतात. एकतर कर्जाचा कालावधी वाढवण्याचा आणि दुसरा म्हणजे ईएमआयची रक्कम वाढवण्याचा. या दोन्ही पर्यायांमुळे कर्जदाराला कोणताही लाभ होत नाही. कारण झालेल्या दरवाढीनुसार कर्जदाराला अधिकची रक्कम ही भरावीच लागते आणि ती थोडी-थोडी भरायची झाली तर जास्त कालावधीसाठी भरावी लागते.

ईएमआय वाढल्यामुळे मासिक बजेट कोलमडते

होमलोन ही दीर्घकालीन असते. ते किमान 20 ते 25 वर्षांचे असते. त्यामुळे सलग इतकी वर्षे नियमित हप्ता भरावा लागतो. त्यात मासिक हप्त्यात वाढ झाली तर घराच्या खर्चाचे बजेट कोलमडते. समजा एका कर्जदाराने 50 लाखांचे होमलोन घेतले आहे. बँकेने त्या कर्जदाराला 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5  टक्क्याने कर्ज दिले होते. पण मधल्या काळात रेपो दर वाढल्यामुळे बँकांनी व्याजदरातही वाढ केली. परिणामी कर्जाचा व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 9.5 टक्के झाला. यामुळे सदर कर्जदाराचा ईएमआय 43,391 रुपयांवरून 46,607 रुपये झाला. म्हणजेच प्रत्येक महिन्यात त्याच्या ईएमआयमध्ये 3,216 रुपयांची आणि एकूण कर्जात 7.72 लाख रुपयांची वाढ झाली. अशावेळी अनेकांचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाते. त्यामुळे अशा मोठ्या कर्जांचे नियोजन योग्य पद्धतीने गरजेचे असते.

होमलोन ट्रान्सफर

गेल्या पाच-सहा महिन्यात आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवल्यामुळे अनेक बँकांनी आपल्या कर्जाचे दर नवीन ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी कमी केले आहेत. याचा फायदा जुन्या होमलोन कर्जदारांना नक्कीच घेता येईल. जर एखादी बँक आताच्या बँकेच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजाने कर्ज देत असेल तर, त्या बँकेत कर्ज ट्रान्सफर केले पाहिजे. आपण वर पाहिलेल्या उदाहरणानुसार, 50 लाखांच्या लोनसाठी 20 वर्षासाठी 9.05 टक्के व्याजदर सुरू आहे. तर हेच लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केल्यावर ती बँक 8.40 टक्क्याने कर्ज देत असेल तर कर्जदाराचा प्रत्येक महिन्याचा ईएमआय जवळपास 2,233 रुपयांनी कमी होईल.

क्रेडिट स्कोअर वाढवा

अनेक बँका कर्ज देताना कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासून त्यानुसार कर्ज देतात. कर्जाचा व्याजदरदेखील क्रेडिट स्कोअरवर ठरत असतो. त्यामुळे कर्जाची रक्कम आणि कालावधीमध्ये बदल करण्याचे अधिकार कर्जदाराला नसले तरी, चांगल्या क्रेडिट स्कोअरनुसार, कर्जदाराला कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. म्हणजे ज्यांचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला नसतो. त्यांना बँक अधिक व्याजाने कर्ज देतात आणि ज्यांचा क्रेडिट स्कोअर मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यांना बँका 0.25 ते 0.50 टक्क्यांनी कमी व्याजदराने कर्ज देतात. त्यामुळे वाढत्या ईएमआय आणि कालावधीवर मात करण्यासाठी कर्जदरा क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करून व्याजदर कमी करू शकतो.

बँकेशी व्याजदराबाबत चर्चा करा

प्रत्येक बँकेला ग्राहक हवे असतात. ते आपले ग्राहक दुसऱ्या बँकांकडे जाऊ नयेत यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. अशावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून इतर बँकांच्या तुलनेत व्याजदर कमी करून देण्याची मागणी करावी. अनेक बँका अशाप्रकारे व्याज कमी करून देतात. यामुळे कर्जाची वर्षे किंवा ईएमआय कमी होण्यास मदत होते.

अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने होमलोनच्या वाढत्या व्याजदरावर पर्याय काढता येऊ शकतात. कर्जाचा व्याजदर हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यामुळे अशी परिस्थिती तुमच्यावर आल्यावर ती हाताळण्यासाठी तुम्ही अशी पूर्वतयारी करू शकता.  

Ref: www.financialexpress.com