हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टच्या पडझडीतून सावरत नाही तोच अदानी ग्रुपवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर शेअर मार्केटमध्ये शुक्रवारी 1 सप्टेंबर 2023 रोजी अदानी ग्रुपमधील प्रमुख शेअर्समध्ये घसरण झाली. याचा फटका देशातील मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार एलआयसीला बसला आहे. अदानी ग्रुपमधील शेअर्सच्या घसरणीने एलआयसीला 3951 कोटींचा फटका बसला आहे.
जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर कोसळले होते. यातून किरकोळ गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना जबर आर्थिक फटका बसला होता. एलआयसीला देखील झळ बसली होती.
एलआयसीने अदानी ग्रुपमधील 7 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट आणि अदानी एनर्जी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
या पडझडीमुळे एलआयसीने गुंतवणूक केलेल्या अदानींच्या 7 शेअर्सचे बाजार मूल्य 3 हजार 951 कोटींनी कमी झाले असून ते 44 हजार 743.94 कोटी इतके आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी हे मूल्य 48 हजार 694.65 कोटी इतके होते. तूर्त एलआयसीला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीत 3 हजार 950 कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे.
अदानी एंटरप्राईसेसमध्ये एलआयसीची 30 जून 2023 अखेर 4.26% हिस्सेदारी आहे. शेअरमधील घसरणीने गुंतवणूक मूल्य 1 हजार 360 कोटींनी कमी झाले आहे.
अदानी पोर्टमध्ये एलआयसीची 9.12% हिस्सेदारी आहे. काल अदानी पोर्टच्या शेअरमधील पडझडीमुळे एलआयसीला 1 हजार 181 कोटींचे नुकसान झाले आहे. याशिवाय अदानी एनर्जीमधील घसरणीने 584 कोटी, अंबुजा सिमेंटमधील गुंतवणुकीमुळे 395 कोटी, अदानी टोटल गॅसमध्ये 264 कोटी, अदानी ग्रीन एनर्जी या शेअरमध्ये 194 कोटींचे नुकसान एलआयसीला झाले आहे.
अदानी ग्रुपला बसला फटका
Organised Crime and Corruption Reporting Project या संस्थेने अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी अदानींच्या शेअर्समध्ये गैरव्यवहार करण्यासाठी परदेशातून पुन्हा भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा या संस्थेने केला आहे. यावृत्तानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री करुन पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. यामुळे अदानी ग्रुपचे बाजार मूल्य 10.50 लाख कोटींपर्यंत खाली आले. मात्र OCCRP ने केलेले आरोप अदानी ग्रुपने फेटाळून लावले आहेत.