शेअर बाजारात मागील तीन सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्समधील तेजीने भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC)दिलासा मिळाला. मागील महिनाभरात 'एलआयसी'ला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीने झालेल्या नुकसानाची काही प्रमाण भरपाई झाली. तीन दिवसांत एलआयसीला 9000 कोटींचा फायदा झाल्याचे बोलले जाते. ‘एलआयसी’सह अनेक बड्या गुंतवणूकदारांचे अदानी ग्रुपमधील शेअर्सचे पोर्टफोलिओ आता पुन्हा नफ्यात आले आहेत. (LIC and Rajiv Jain make profit in Adani Group Shares)
भारतीय शेअर बाजारात ‘एलआयसी’ ही सर्वात मोठी स्थानिक पातळीवरील संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. ‘एलआयसी’ची अदानी ग्रुपमधील शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक चर्चेचा विषय ठरली होती. हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी ग्रुपवर जाहीर केलेल्या अहवालानंतर ‘एलआयसी’च्या गुंतवणूक रणनितीवर टीका झाली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनी ‘एलआयसी’ला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीने झालेल्या नुकसानीचा मुद्दा उचलून धरला होता. यावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
अदानी समूहाने सिंगापूरमधील गुंतणूकदारांकडून प्राप्त केलेले कर्ज, अमेरिकी संस्थेने चार शेअर्समध्ये केलेले 15446 कोटींचे ब्लॉक डील या घडामोडींनी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अदानी ग्रुपचे शेअर्स सरत्या आठवड्यातील सलग तीन सत्रात तेजीत होते. त्यात अदानी एंटरप्राईजेसचा शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. तेजीच्या लाटेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला.
शेअर बाजारातील माहितीनुसार अदानी समूहातील 10 पैकी 7 शेअर्समध्ये 'एलआयसी'ने गुंतवणूक केली आहे. शेअर होल्डिंगनुसार एलआयसीकडे अदानी ग्रीन एनर्जीचा 1.28% हिस्सा आहे. 9.14% हिस्सा अदानी पोर्ट अॅंड सेझमध्ये आहे. याशिवाय अदानी ग्रुपमधील इतर पाच कंपन्यांमध्ये ‘एलआयसी’ने बऱ्यापैकी गुंतवणूक केली आहे. ‘एलआयसी’ची अदानी ग्रुपमधील एकूण गुंतवणूक 30127 कोटी इतकी आहे. 24 जानेवारी 2023 रोजी हिंडेनबर्ग अहवाल जाहीर झाला आणि शेअर मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली. तब्बल सहा आठवडे अदानी समूहातील सर्वच्या सर्व 10 शेअरमध्ये घसरण सुरुच होती. यामुळे एलआयसीच्या गुंतवणुकीला देखील प्रचंड झळ बसली.
‘एलआयसी’चे 30 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार ‘एलआयसी’ची अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमधील एकूण गुंतवणूक 35917.31 कोटी इतकी होती. 27 जानेवारी 2023 रोजी या गुंतवणुकीचे बाजार मूल्य 56142 कोटी इतके होते. ‘एलआयसी’ला झालेले नफा महिनाभरात पाण्यात बुडाला. ‘एलआयसी’ला अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीने 50000 कोटींचे नुकसान सोसावे लागले. 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एलआयसी’चे गुंतवणूक मूल्य 29893.13 कोटी इतके खाली आले होते. मात्र तीन दिवसांती तेजीने हे चित्र बदलले. शुक्रवार 3 मार्च 2023 अखेर 'एलआयसी'ची अदानी ग्रुपमधील एकूण गुंतवणूक 39068.34 कोटी इतकी वाढली आहे. तीन दिवसांतील तेजीने ‘एलआयसी’ने 9000 कोटींचा फायदा कमावला.
अदानी ग्रुपच्या 10 शेअर्समध्ये मागील महिनाभरात झालेल्या घसरणीने कंपन्यांचे बाजार भांडवल 11 लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. हिंडेनबर्ग अहवाल बाजारात धडकण्यापूर्वी अदानी ग्रुपची मार्केट कॅप 19.2 लाख कोटी इतकी होती. हिंडेनबर्गने केलेले आरोप अदानी ग्रुपकडून फेटाळण्यात आले आहेत.
अदानी ग्रुप प्रमोटर्सनी शेअर्स विकले
सरत्या आठवड्यात अदानी ग्रुपच्या शेअरमधील तेजीचा फायदा प्रमोटर्सनी उचलला. एस. बी. अदानी फॅमिली ट्रस्टने आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे 21 कोटी शेअर्स परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांन विकले. चार कंपन्यांचे शेअर्सचे हे बल्क डिल 15446 कोटींचे होते.
राजीव जैन यांनी कमावला बंपर नफा
शेअर मार्केटमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही. क्षणात कोणी बंपर कमाई करतो तर क्षणात प्रचंड नुकसान सोसावे लागते. असाच बंपर फायदा अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीतून राजीव जैन यांनी कमावला आहे. पडत्या शेअर बाजारात राजीव जैन यांनी अदानी ग्रुपमधील 4 कंपन्यांमध्ये 15446 कोटींची गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय त्यांच्यासाठी जबरदस्त फायदेशीर ठरला आहे. महिनाभरात शेअर मार्केटमध्ये सपाटून मार खालेल्या अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणक करणारे राजीव जैन कोण? अशा बातम्या भारतीय माध्यमांमध्ये सुरु झाल्या नाहीत तोवरच जैन यांनी मात्र याच गुंतवणुकीवर तब्बल 3100 कोटींचा फायदा कमावला आहे. सलग तीन सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीच्या रॅलीने राजीव जैन यांच्या गुंतवणुकीची मार्केट व्हॅल्यू 18548 कोटी इतकी वाढली आहे. दोन दिवसांत राजीव जैन यांनी 3102 कोटी रुपयांच्या फायद्यात आहेत.