Cyber Investment Fraud: व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावरील अज्ञान व्यक्तींवर विश्वास ठेवून गुंतवणूक करणं चांगलंच महागात पडलं आहे. देशभरातील हजारो नागरिक या बनावट गुंतवणुकदारांच्या जाळ्यात सापडले आहेत. बंगळुरू पोलिसांनी या सायबर गुंतवणूक घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून तब्बल 854 कोटींचा घोटाळा समोर आला आहे.
जास्त परताव्याचं अमिष भोवलं
बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहे. त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे अज्ञात व्यक्तींवर भरोसा ठेवणं किती महागात पडू शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. या घोटाळेबाजांकडून नागरिकांना गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचं अमिष दाखवलं जायचं. सुरुवातीला काही काळ पैसे देण्यातही आले. मात्र, नंतर हे गुन्हेगार मुद्दल घेऊन पसार झाले.
देशभरातून 5 हजारांपेक्षा जास्त तक्रारी
एकूण रकमेपैकी 5 कोटी रुपये पोलिसांनी विविध बँक खात्यातून जप्त केले आहेत. मात्र, इतर रक्कम अद्याप हाती न लागल्यानं गुंतवणूकदारांच मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याशी संबंधित देशभरातून पाच हजारांपेक्षा जास्त तक्रारी आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
कशा प्रकारे केली गुंतवणुकदारांची फसवणूक?
नागरिकांना फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या इतरही सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला जात होता. सुरुवातीला 1 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम गुंतवण्यास सांगत होते. यावर प्रति दिनी 5 हजार रुपयांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवले. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी 1 लाखापासून 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्याकडे गुंतवली.
सुरुवातीला पैसे देऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर नागरिकांचे पैसे घेऊन सर्वजण फरार झाले. परतावा तर सोडाच मुद्दलही गेली. बंगळुरूसह देशभरातील शहरांतील नागरिक या सायबर घोटाळ्याचे बळी ठरले आहेत.
मनी लाँड्रिंगद्वारे पैसे वळवले
नागरिकांनी पैसे ऑनलाइन जमा केल्यानंतर हे सर्व पैसे मनी लाँड्रिंगद्वारे वळवण्यात आले. क्रिप्टो, पेमेंट गेटवे आणि गेमिंग अॅपद्वारे हे पैसे दुसरीकडे वळवले. विविध शहरातील बँकांत 84 बनावट खाती पोलिसांना आढळून आली. यातील काही खाती ही खरी होती. मात्र, खातेधारकांना घोटाळेबाज कमिशन देत होते. फक्त त्यांच्या खात्यांचा वापर करून घेतला.