बँकांमध्ये 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची प्रक्रिया आज मंगळवार 23 मे 2023 पासून सुरु झाली. नोटा बदलून घेण्याच्या पहिल्याच दिवशी नागरिक आणि बँक कर्मचारी यांच्या गडबड आणि गोंधळाचे वातावरण दिसून आले. रिझर्व्ह बँकेने नोटा बदलण्यासाठी कोणताही अर्ज भरुन देण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट केलेले असताना काही बँकांनी मात्र या आदेशाला हरताळ फासला आहे. बँकांनी नागरिकांकडून ओळखपत्राची मागणी केली तर काही बँकांनी अर्ज भरुन घेतले. सोशल मिडीयावर याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना त्यांच्याकडील 2000 रुपयांच्या चलनी नोटा बदलून घेता येणार आहे. याशिवाय 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांची नोट चलनात वैध राहणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे अशांना आजपासून बँकांमध्ये या नोटा बदली करण्याचा पर्याय खुला झाला.
एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील. अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी काही निवडक बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून अर्ज भरुन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या फॉर्मची प्रत ट्विटरवर पोस्ट करुन नेटिझन्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिल्लीत काही बँकांनी 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. कॅश कमी असल्याने नोटा बदलून घेण्याऐवजी या बँकांनी ग्राहकांनी या नोटा बँक खात्यात जमा करण्याचे आवाहन केले. रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बदलून घेताना ओळखपत्र देण्याची किंवा कोणताही फॉर्म भरुन देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र तरिही काही बँकांनी यासंदर्भात फॉर्म तयार केला आहे. जे 2000 रुपयांची नोट बदलून घेतील त्यांचा तपशिल घेतला जाणार आहे. यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
व्यावयासिकांसाठी 2000 ची नोट ठरतेय डोकेदुखी
बँकेत रांगेत उभे राहून नोटा बदलून घेण्यापेक्षा बाजारात खरेदी करुन 2000 रुपयांची नोट खर्च करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे भाजी विक्रेते, मटण विक्रेते, किराणा दुकानदार, मॉल्समधील व्यावसायिक यांच्यासाठी 2000 रुपयांची नोट डोकेदुखी बनली आहे. 2000 रुपये स्वीकारताना सराफा व्यावसायिक अतिरिक्त दर आकारत असल्याचे बोलले जाते. नोटबंदीची घोषणा झाल्यानंतर बाजारात खरेदीसाठी 2000 रुपयांच्या नोटीचा वापर वाढला आहे. पेट्रोल पंपावर 2000 रुपयांच्या नोटीने इंधन खरेदी वाढल्याचे दिसून आले आहे.