SBI Scam Proof Asanas: जागतिक पातळीवर भारत जरी डिजिटली प्रगती करत असला तरी अजूनही भारतातील नागरिक डिजिटली तितकेसे साक्षर नसल्याचे दिसून येत आहे. कारण पुण्यात नुकतेच एका माजी कर्नलला (Retired Colonel) सायबर भामट्यांनी 1 कोटी रुपयांना फसवले. या फसवणुकीमुळे सदर कर्नलची आयुष्यभराची कमाई चोरट्यांनी लंपास केली. अशावेळी आर्थिक आणि डिजिटलीदृष्ट्या साक्षर असणे गरजेचे आहे.
एसबीआय बँकेकडून गेले काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॅमपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी #ScamProofAsanas या नावाने एक अनोखे कॅम्पेन राबवले जात आहे. यामध्ये लोकांची डिजिटली आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे हे सांगितले जात आहे.
जसे की, या कॅम्पेनमध्ये एक 'मूँह बंद आसन'आहे. यातून कोणीही फोन करून ओटीपीबाबत माहिती विचारली तर आपले तोंड बंद ठेवा आणि तो फोन कॉल कट करा. कारण बऱ्याचदा आपल्याकडे अशिक्षित लोकांबरोबर शिक्षित लोकांचीही सायबर भामट्यांकडून फसवणूक होते. मागील वर्षातील सायबर गुन्ह्यांची आकडेवारी पाहता मागच्या वर्षी जवळपास 52,974 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे हे तेलंगणामध्ये झाले होते. तर महाराष्ट्राचा यामध्ये चौथा क्रमांक होता.
सायबर भामट्यांकडून सिनिअर सिटिझन टार्गेट
सायबर भामट्यांकडून जाणीवपूर्वक सिनिअर सिटिझन्सला टार्गेट केले जात आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. पण त्याचा वापर करत असताना सुरक्षितता कशी बाळगावी. याची पुरेशी माहिती नसल्यामुळेच फसवणूक होत असल्याचे दिसून येते. सरकार किंवा बँकांकडून सातत्याने सांगितले जाते की, ओटीपीसाठी कोणतीही बँक फोन करत नाही. ओटीपीसाठी कोणकडूनही फोन आला तरी तो कोणाला शेअर करू नये. पण इथेच फसगत होत असल्याचे दिसून येते.
एसबीआयने अशाच घटनांवर आधारित #ScamProofAsanas हे कॅम्पेन सुरू केले. फ्रॉड कॉलपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी कान सतर्क ठेवा. म्हणजे तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहिती कोणी विचारत असेल तर तुम्ही लगेच सतर्क व्हा आणि असे फोन टाळा. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना स्वत: सतर्क राहणे हा योग्य पर्याय ठरू शकतो.