रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी 19 मे 2023 रोजी जाहीर केला. यानंतर सर्वसामान्यांमध्ये दोन हजाराच्या नोटीबाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन हजार रुपयाच्या नोटीसाठी छपाईचा खर्च 3 रुपये 54 पैसे इतका होता.रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत 33 कोटी 63 लाख नोटांची छपाई केली असून यासाठी 100 कोटी खर्च केले. नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आलेली 2000 रुपयांची नोट साडे सहा वर्षात हद्दपार करण्यात आल्याने ही नोट का चलनात आणण्यात आली,असा सवाल उपस्थित केला जात आहे.
केंद्र सरकारने काळा पैसा हद्दपार करण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी जाहीर केली होती. चलनातील जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या होत्या. नोटबंदीची घोषणा केल्यानंतर चार दिवसांनी चलनात नवीन नोटा दाखल झाल्या. यात 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन चलनी नोटांची सिरिज रिझर्व्ह बँकेने छपाई केली होती. मात्र आता 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना 2000 रुपयांची नोट बँकांमध्ये बदलून घेता येणार आहे.
मागील तीन वर्षात 2000 रुपयांची नोटेचे प्रमाण चलनातून सातत्याने कमी होत असल्याचे दिसून आले होते. रिझर्व्ह बँकेकडून 2000 रुपयांच्या नोटेची नव्याने छपाई बंद केली होती. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2023 अखेर चलनात 3.62 लाख कोटी रुपये मूल्याच्या नोटा आहेत.
वर्ष 2016 मधील नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेच्या चार चलन छपाई केंद्रांमधून नवीन चलनी नोटांची छपाई करण्यात आली. त्यानुसार सुमारे 32 कोटी 85 लाख 2000 रुपयांच्या नोटा चलन यंत्रणेत आल्या होत्या. वर्ष 2018 मध्ये हे प्रमाण वाढून 33 कोटी 63 लाख इतके वाढले.
नोटांच्या छपाईला 100 कोटींचा खर्च
रिझर्व्ह बँकेसाठी 2000 रुपयांची नोट छपाईच्या दृष्टीने खर्चिक होती. 2000 रुपयांची एक नोट छपाई करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला 3.54 रुपयांचा खर्च येतो. बँकेने 2016 ते 2019 पर्यंत 2000 रुपयांच्या नोटांची छपाई केली. या तीन वर्षात 33 कोटी 63 लाख नोटांची छपाई करण्यात आली आहे. यासाठी बँकेकडून 100 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. आता या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने छपाईचा खर्च पाण्यात गेल्याचे बोलले जाते. वर्ष 2016 मधील नोटबंदीनंतर रिझर्व्ह बँकेचा चलन छपाई खर्चात प्रचंड वाढ झाली. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये चलन छपाई खर्च 4984.8 कोटी इतका झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. एका वर्षात नोटांच्या छपाईवरचा हा दुसरा मोठा खर्च ठरला. यापूर्वी 2016-2017 या नोटबंदीच्या वर्षात रिझर्व्ह बँकेने चलन छपाईवर 8000 कोटी खर्च केले होते.
2000 रुपयांच्या चलनी नोटीचा आजवरचा प्रवास
- नोव्हेंबर 2016 मध्ये RBI ने 2000 रुपयांची नोट चलनात आणली.
- आर्थिक वर्ष 2016-2017 मध्ये 2000 रुपयांच्या 354.2991 कोटी चलनी नोटांची छपाई करण्यात आली.
- आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये छपाईचे प्रमाण वाढून 11.1507 कोटी चलनी नोटांची छपाई करण्यात आली.
- मात्र 2018-19 मध्ये छपाईचे प्रमाण प्रचंड कमी करण्यात आले. या वर्षात केवळ 4.669 कोटी चलनी नोटांची छपाई करण्यात आली.
- 30 मार्च 2018 अखेर केवळ 336 कोटी चलनी नोटा वितरणात होत्या.
- वर्ष 2019 मध्ये 2000 रुपयांची नोट दुर्मिळ झाली. बँकांमध्ये आणि ATM मध्ये 2000 रुपयांच्या नोटीचा वापर कमी झाला.
- अर्थव्यवस्थेत (Circulation) दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण दर महिन्याला कमी होत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आले.
- मार्च 2022 अखेर 2000 रुपयांच्या चलनी नोटांचे प्रमाण 13.8% इतके होते. त्याचे एकूण मूल्य 31.05 लाख कोटी इतके होते.
- रिझर्व्ह बँकेने 2019 पासून 2000 नोटांची छपाई बंद केली असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले.
- डिसेंबर 2022 मध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 2000 रुपयांच्या नोटीला चलनातून रद्द करण्याची मागणी खासदारांनी केली होती.
- 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला.