रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी 6 ऑक्टोबर 2023 रोजी पतधोरण जाहीर केले. बँकेने सलग चौथ्यांदा रेपो दर स्थिर ठेवला. यामुळे कर्ज स्वस्त होण्याची शक्यता मावळली आहे. दरमहा ईएमआय भरणाऱ्या कर्जदारांना स्वस्त कर्जासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.5% इतका स्थिर आहे. पतधोरण स्थिर असल्याने तूर्त व्याजदर वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांचा मासिक हप्ता जैसे थेच राहणार आहे.
मागील काही महिन्यांपासून देशात महागाईच जोर वाढला आहे. जीवनावश्यक वस्तू, खाद्य वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे पतधोरणात व्याजदर कपात झाल्यास ईएमआयचा हप्ता कमी होईल, अशी अपेक्षा कर्जदारांनी व्यक्त केली होती. मात्र रिझर्व्ह बँकेच्या स्थिर पतधोरणाने कर्जदारांची निराशा झाली.
महागाईचा आगडोंब शमवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये सहावेळा रेपो दरात वाढ केली होती. यामुळे कर्जाचा मासिक हप्ता वाढला होता. जगभरातील सेंट्रल बँकांकडून देखील कठोर पतधोरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचेच अनुकरण रिझर्व्ह बँकेकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जाच्या मासिक हप्त्याचा भार हलका होण्यासाठी आणखी तीन ते सहा महिने वाट पहावी लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 2024 च्या सुरुवातीला पहिल्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कपात केली जाण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने पतधोरणात महागाईबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार डिसेंबरअखेर महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे. महागाईचा दर उद्दिष्टाच्या जवळपास आला तर बँकेकडून रेपो दरात कपात करण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतात. रेपो कपात झाली तर बँकांकडून कर्जदर कमी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी पुढील तीन महिने महागाई कमी होण्यासाठी वस्तूंच्या पुरवठा साखळीतील अडथळे दूर करणे आवश्यक आहे.
ईएमआयचा भार हलका करण्यासाठी कर्जदारांना होम लोन ट्रान्सफरसारख्या पर्यायांचा वापर करता येऊ शकतो. मात्र जाणकारांच्या मते कर्जदरात केवळ 0.25% ते 0.50% सवलत मिळत आहे म्हणून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत होम लोन ट्रान्सफर करणे योग्य नाही. यासाठी किमान 1 ते 1.15% व्याजदराची बचत होत असेल तरच होम लोम ट्रान्सफर करावे असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.