कर्जाची परतफेड करणाऱ्या किंवा नव्या कर्ज घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महागाई कमी झाल्याने रिझर्व्ह बँकेने आज गुरुवारी 8 जून 2023 जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेतला. रेपो दर 6.50% स्थिर राहिल्याने बँकांकडून कर्जाचे दर स्थिर ठेवले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन महिन्यात घाऊक आणि किरकोळ महागाईचा दर कमी झाला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजदर जैसे थे ठेवले. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर केले. यात रेपो दर 6.50% कायम ठेवला. मार्जिनल स्टॅंडिंग फॅसिलीट 6.75% कायम ठेवला आहे. गेल्या पतधोरणात आरबीआयने व्याजदर जैसे थेच ठेवले होते.
बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपीचा दर 6.5% राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी 8%, दुसऱ्या तिमाहीत 6.5%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% आणि चौथ्या तिमाहीत जीडीपीचा दर 5.2% राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सरासरी विकास दर 4.8% ते 5% या दरम्यान राहील, असे म्हटले आहे.
वर्ष 2023-24 मध्ये महागाईचा दर 4% वर राहील, असे दास यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मॉन्सूनवर एल निनोचा किती प्रभाव पडेल हे आताच सांगणे कठिण आहे. मात्र या परिस्थितीवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे. 2000 रुपयांची नोट चलनातून परत घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे दैनंदिन रोकड तरलता वाढली असल्याचे दास यांनी सांगितले.
दरम्यान, आरबीआयने सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवल्याने व्याजदर वाढीचे सत्राला पूर्णविराम मिळाला का, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.महागाईचा विचार करता आरबीआय व्याजदर कपात करण्याऐवजी वर्षभर व्याजदर जैसे थेच ठेवू शकते, असे मत एचडीएफसी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ साक्षी गुप्ता यांनी व्यक्त केले.
मासिक हप्त्याचा भार नाही वाढणार
रिझर्व्ह बँकेने सलग दोन पतधोरणात प्रमुख व्याजदरात कोणाताही बदल केला नसल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. त्यापूर्वी मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दर 2.50% वाढ केली होती. रेपो दरवाढीनंतर बँकांनी कर्जाचे दर वाढवले. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अशी सर्वच प्रकारची कर्जे 2 ते 4% ने वाढली होती. कर्जदरात वाढ होण्याबरोबरच ठेवींचा व्याजदर देखील वाढला होता. कर्जदारांना कर्जाचा वाढीव हप्ता भरताना जादा पैशांची तजवीज करावी लागली. आता सलग दोन पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवल्याने बँकांकडून कर्जदर स्थिर ठेवले जातील. कर्जाचा हप्ता वाढण्यची शक्यता कमी असल्याचे जाणकारांनी सांगितले.