कर्ज मंजुर करताना ग्राहकाचा आर्थिक व्यवहारांबाबतचा इतिहास तपासला जातो. मात्र ही प्रक्रिया आता आणखी कठोर करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या आहेत. यात क्रेडीट कार्डावर कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज अशा असुरक्षित कर्जांमध्ये बँकांनी ग्राहकांची क्रेडीट हिस्ट्री सखोल तपासावी, असे आरबीआयने म्हटले आहे.
बँकांमधून मागील काही महिन्यांमध्ये वैयक्तित कर्ज आणि क्रेडीट कार्डवरील कर्ज वितरणात मोठी वाढ झाली आहे. या प्रकारची कर्ज असुरक्षित कर्जे म्हणून ओळखली जातात. ही कर्ज मंजूर करताना ग्राहकाकडून तारण घेतले जात नाही. असुरक्षित असल्याने त्यात बँकांसाठी जोखीम जास्त असते. या कर्जांचा व्याजदर देखील इतर कर्जांच्या तुलनेत सर्वाधिक असतो.
बँकांमधून क्रेडीट कार्ड आणि वैयक्तिक कर्जाचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा प्रकारची कर्जे मंजूर करताना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.
क्रेडीट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँकांनी ग्राहकाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. ही खबरदारी नाही घेतली तर कर्ज बुडण्याची शक्यता वाढेल, असे आरबीआयने म्हटले आहे. डिफॉल्ट वाढण्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने बँकांकडील असुरक्षित कर्जाचा पोर्टफोलिओ मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोनानंतर वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड वाढली होती. वर्ष 2022 मध्ये 9.9 कोटी ग्राहकांनी वैयक्तिक कर्ज घेतले होते. याच काळात 1.7 लाख कोटींचे क्रेडीट कार्डवर कर्ज मंजूर करण्यात आले होते. यात 28% वाढ झाली होती.त्यामुळे रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्ज वितरणाबाबत बँकांना अलर्ट केले होते.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2023 मध्ये पर्सनल लोनमधून 40 कोटींचे वितरण केले आहे.फेब्रुवारी 2022 मध्ये पर्सनल लोनमधून 33 लाख कोटी मंजूर करण्यात आले होते. महागाई आणि व्याजदर वाढत असल्याने पर्सनल लोनमध्ये डिफॉल्ट होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.