Aadhar Card: आधार कार्डच्या वाढत्या महत्वामुळे स्कॅमर्स एखाद्या व्यक्तीचा डेटा कसा चोरता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांना जागरुक करण्यासाठी UIDAI ने (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ट्विटरद्वारे माहिती दिली की, UIDAI कधीही ई-मेल किंवा WhatsApp वर POI (ओळखीचा पुरावा) किंवा POA (पत्त्याचा पुरावा) पेपर्स शेअर करण्यास सांगत नाही. त्यामुळे आधार अपडेट करायचे असल्यास आधार पोर्टल किंवा आधार केंद्राचा वापर करणे योग्य आहे. तरीही युझर्सना बॅंक खाते हॅक होण्याची चिंता असते. कारण, आधार मोबाईल नंबर आणि बॅंक खात्याला लिंक असते. त्यामुळे चिंता असणे साहजिक आहे. पण, खरंच आधार कार्डवरुन बॅंक खाते हॅक होऊ शकते ?
बॅंक खाते नाही होणार हॅक
तुमचा आधार डेटा चोरी गेला तरी तुम्ही निश्चिंत राहू शकता. कारण, यामुळे तुमचे बॅंक खाते हॅक होऊ शकत नाही. कारण, जोपर्यंत पिन किंवा ओटीपी तुम्ही शेअर करत नाही, तोपर्यंत तुमचे खाते सुरक्षित आहे. त्यामुळे पिन कोणासोबत शेअर करु नका. शेअर केल्यास तुमचे खाते रिकामे व्हायला वेळ लागणार नाही. तरीही बऱ्याच लोकांचा समज आहे की आधार कार्ड वापरुन स्कॅमर्स पैसे काढू शकतात. आता सांगितलेल्या माहितीवरुन तुमची खात्री पटली असेल की ते शक्य नाही. कारण, ज्या प्रमाणे एटीएम नंबर माहिती करुन कोणी पैसे काढू शकत नाही, त्याचप्रमाणे आधारची माहिती घेऊन कोणी पैसे काढू शकत नाही. पण, आधारचा डेटा चोरी न जाण्यासाठी तुम्ही काळजी घेऊ शकता.
आधार डेटा सुरक्षित कसा ठेवायचा?
तुमचा आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये बायोमेट्रिक लॉकिंग आणि व्हर्च्युअल ID चा वापर आणि आधार नंबर मागणाऱ्यांची ओळख जाणून घेण्याचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही यामधील बायोमेट्रिक लॉकिंगसाठी UIDAI पोर्टलचा वापर करुन, तुमची महत्वाची माहिती लाॅक करु शकता. तसेच, तुम्ही व्हर्च्युअल ID जनरेट करुन ती सुद्धा वापरु शकता.
यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. जर तुम्हाला कोणी तुमचे आधार कार्ड मागत असल्यास, त्याची ओळख जाणून घेऊ शकता. यामुळे तुम्हाला ती व्यक्ती कोण आहे हे समजायला मदत होईल. तसेच, कोणतीच बॅंक किंवा इतर संस्था तुमचा आधार डेटा मेसेज किंवा टेक्स्टद्वारे मागत नाहीत. या गोष्टीं लक्षात ठेवल्यास, तुमचा आधार डेटा सुरक्षित राहायला मदत होणार आहे.