भारतात नोटांप्रमाणे नाणी सुद्धा चलनामध्ये वापरली जातात. मुळात पूर्वी नोटांऐवजी नाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता. आणे ते रुपया अशा वेगवेगळ्या प्रकारची नाणी चलनामध्ये वापरली जात होती. यातील काही नाणी ही कालबाह्य झाली तर उर्वरित नाणी आजही चलनात आहेत. 5 रुपयाचे नाणे आजही चलनात आहे. पण आपण बारकाईने पाहिले, तर लक्षात येईल की, यामध्ये दोन प्रकारची नाणी होती. एक म्हणजे जाड्या स्वरूपातील 5 रुपयाचे नाणे, तर दुसरे सोनेरी रंगाचे कमी जाडीचे नवीन नाणे.
गेल्या काही दिवसांपासून 5 रुपयाचे जुने जाडे नाणे बाजारात येणे बंद झाले आहे. मुळात हे नाणे बनवणे सरकारने बंद केले आहे. बाजारात शिल्लक राहिलेली नाणीच सध्या चलनात वापरली जात आहेत. पण, हे असं अचानक का झालं? हे नाणं बंद करून नवीन प्रकारच नाणं का बनवलं गेलं? यामागील कारण काय आहे, जाणून घेऊयात.
नाण्यापासून बनवले जाऊ लागले ब्लेड
5 रुपयांचे जुने नाणे हे मुळातच खूप जाड होते. ते तयार करण्यासाठी जास्त धातू वापरण्यात येत होते. ज्या धातूपासून ही नाणी तयार करण्यात येत होती, त्याच धातूपासून रेझर धारदार ब्लेड देखील बनवलं जात होतं. त्यामुळे लोक त्याचा गैरवापर करू लागले. जुन्या 5 रुपयाच्या जाड्या नाण्याची याच कारणाने तस्करी वाढली. या नाण्याची तस्करी करून लोकं बांग्लादेशात घेऊन जाऊ लागले. त्याठिकाणी ही नाणी वितळवून त्याची ब्लेड तयार करण्यात येऊ लागली. एका कॉईनपासून 6 ब्लेड बनवण्यात येत होती. एक ब्लेड दोन रुपयांना विकले जायचे. या हिशोबाने 5 रुपयांचे नाणे वितळवून त्याचे ब्लेड बनवून 12 रुपये कमवले जात असल्याचा प्रकार समोर आला. यातूनच तस्कर मोठी कमाई करू लागले.
पृष्ठभागाच्या मूल्यापेक्षा धातूचे मूल्य अधिक
कोणत्याही नाण्याला दोन प्रकारे मूल्य असते. पहिले म्हणजे पृष्ठभागाचे मूल्य आणि दुसरे म्हणजे धातूचे मूल्य. पृष्ठभागाच्या मूल्यात नाण्यावर लिहलेल्या गोष्टींचा समावेश होतो, जसे की, 5 रुपये असे नाण्यावर लिहलेले असते. दुसऱ्या मूल्यामध्ये नाणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूची किंमत गणली जाते. 5 रुपयाच्या जुन्या नाण्याची पृष्ठभागाच्या मूल्यापेक्षा धातूच्या मूल्याची किंमत जास्त होती. त्यामुळे तस्कर हे नाणे वितळवून त्याचे ब्लेड तयार करू लागले.
RBI ने यावर घेतला ठोस निर्णय
बाजारात 5 रुपयाची जुनी जाड नाणी कमी होऊ लागली आहेत याची कल्पना सरकार आणि रिझर्व्ह बँकेला (Govt & RBI) आल्यावर ही नाणी बनण्यासाठी वापरण्यात येणारा धातू बदलण्यात आला. याशिवाय नवीन सोनेरी रंगाची कमी जाडीची नाणी रिझर्व्ह बँकेने तयार केली. जेणेकरून जुन्या नाण्यांची तस्करी थांबवण्यास मदत होईल.