• 24 Sep, 2023 06:56

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Long Term Investment: दीर्घकाळ गुंतवणुकीचे हे 7 मार्ग तुम्हाला माहितीयेत का?

long Term Investment Options

Image Source : www.whoswho.co.za

तुम्ही जर भविष्याचे नियोजन करत असाल आणि त्यात दीर्घकालीन गुंतवणूक योजनेचा समावेश नसेल तर नक्कीच तुमच्याकडून काहीतरी चूक होतेय असं समजा. कारण, निवृत्ती, मुलांचे शिक्षण, घर खरेदी अशा गोष्टींसाठी जास्त पैसे लागतात. जर तुम्ही योग्य नियोजन करून आतापासूनच दीर्घकालीन पर्यायांत गुंतवणूक सुरू केली तर भविष्यातील अडचणी कमी होतील.

थेंबे थेंबे तळे साचे या वृत्तीप्रमाणे दरमहा थोडी रक्कम जरी बाजूला काढून ठेवली तरी दीर्घकाळात एक मोठी राशी जमा होईल. तुमचं आर्थिक ध्येय कोणतं आहे. यावर तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करता हे ठरते.

जर तुम्हाला पुढील एक-दोन वर्षात कार खरेदी करायची असेल तर हे अल्पकालीन ध्येय झाले. मात्र, तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैशांची तरतूद करायची असेल तर दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. तुमचा मुलगा पाच वर्षांचा आहे. मात्र, त्याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही आतापासून गुंतवणूक करत असाल तर हे दीर्घकालीन उद्दिष्ट झाले. तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती यानुसार तुम्ही योग्य पर्याय निवडायला हवा. 

दीर्घकाळ गुंतवणुकीचे फायदे काय? 

दीर्घकाळ गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते. अल्प कालावधीत बाजार अस्थिर असतो. मात्र, दीर्घकालावधीत फायदा होण्याची शक्यता जास्त असते. 

चक्रवाढ व्याजदराने पैशाची वाढ होते. जेवढे जास्त दिवस गुंतवणूक कराल तेवढा चक्रवाढ व्याजदराचा फायदा होईल. 

महागाईला हरवता येईल. म्युच्युअल फंड, शेअर मार्कटमधील गुंतवणूक महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता असते.

शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते. दीर्घकाळ गुंतवणुकीत सातत्य असेल तर मोठ्या गरजांसाठी पैशांची तरतूद होईल. जसे की, मुलांचे शिक्षण, घर, निवृत्ती.

दीर्घकाळ गुंतवणुकीचे मार्ग 

म्युच्युअल फंड 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांद्वारे अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जाते. इक्विटी, डेट, गोल्ड, रिअल इस्टेट, ETF सह अनेक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली जाते. दरमहा किंवा एकरकमी SIP द्वारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होण्याची शक्यता असते.

पब्लिक प्रोविडंट फंड 

ही गुंतवणूक योजना अर्थ मंत्रालयाने 1968 साली सुरू केली आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा चांगला पर्याय आहे. यातील गुंतवणुकीतून कर बचतही करता येते. 15 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. म्हणजेच 15 वर्ष तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत. चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. तसेच 15 वर्षानंतर पुढेही योजना सुरू ठेवू शकता. मात्र, पाच वर्षांच्या पटीत सुरू ठेवता येईल. या योजनेवरील व्याजदर सरकारकडून ठरवला जातो. 

नॅशनल पेन्शन स्कीम 

नॅशनल पेन्शन स्कीम ही सुद्धा एक सरकारी योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीतून निवृत्तीसाठीची सोय होईल तसेच कर वजावटीचा फायदाही मिळेल. दीर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरुपात दरमहा पैसे मिळू शकता. ही एक सरकारी योजना असल्याने जोखीम कमी आहे. 

डायरेक्ट इक्विटी इन्वेस्टमेंट 

तुम्ही चांगला कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून थेट कंपनीच्या इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. दीर्घकाळ शेअर्स ठेवल्याने फायदा होण्याची शक्यता वाढते. एकाच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स न घेता विविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून तुम्ही जोखीम कमी करू शकता. तसेच शेअर्सच्या पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बदल करू शकता. 

स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक

कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल स्थावर मालमत्तेतून चांगले भाडे मिळू शकते. तसेच दीर्घकाळात मालमत्तेचे मूल्यही वाढते. मात्र, रिअल इस्टेट मालमत्ता खरेदीसाठी मोठी रक्कम लागते. 

एम्पलॉई प्रोव्हिडंट फंड 

EPF ही पगारदार व्यक्तींसाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे. पगारातील काही हिस्सा EPF खात्यात जमा केला जातो. कंपनीला निम्मा हिस्सा यामध्ये जमा करावा लागतो. यावर करवजावट मिळते तसेच दीर्घकाळात निश्चित परतावा मिळतो. निवृत्तीनंतर हे पैसे तुम्हाला मिळतील. 

एक्सचेंज ट्रेडेड फंड 

एक्सचेंज ट्रेडेड फंड हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. मात्र, हे फंड्सची स्टॉक मार्कटमध्ये खरेदी विक्री करता येते. स्टॉक, बाँड्स आणि कमॉडिटीसंबंधी फंडमध्ये गुंतवणूक करता येते. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.