मराठीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. हा चित्रपट कधीही लागला, तरी आपण तो कुटुंबासोबत पाहू शकतो. 35 वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेला हा मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहावासा वाटतो. 23 सप्टेंबर 1988 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचा पहिला शो पाहण्यासाठी चित्रपटगृह अगदी खच्च भरलं. या चित्रपटाने त्या काळातही बॉक्स ऑफिसवरचं रेकॉर्ड ब्रेक केलं होतं.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), अभिनेत्री प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी या चित्रपटाला चार चांद लावले. कोट्यवधींची कमाई करणारा आणि जवळपास तीन दशकांपुर्वी हाऊसफुल्ल झालेल्या या चित्रपटाच्या तिकीटाचा दर काय होता? त्याने किती कमाई केली, याबद्दल जाणून घेऊयात.
तीन दशकांपुर्वी आत्ता एवढी महागाई नक्कीच नव्हती. तेव्हा लोकांना मिळणार पगारही फारच कमी होता.लोकांच्या गरजाही मर्यादितच होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्या काळी चित्रपट बनवणं ही सर्वात मोठी गोष्टी होती. कथा, पटकथा, चित्रीकरण, संकलन अशा अनेक टप्प्यातून चित्रपट जात होता. चार ठिकाणावरून चार पैसे गोळा करून निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपट बनवायचे. आत्तासारखा जाहिरातींचा भडिमारही नव्हता. अशा काळात 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करून इतिहास रचला होता. त्याकाळातही करोडोचा गल्ला करणारा चित्रपट म्हणून 'अशी ही बनवाबनवीची' ख्याती होती.
तिकिटाचा दर किती होता?
'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 रोजी प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटाच्या तिकिटाचा दर खालच्या सिटींगसाठी 3 रूपये होता. तर बाल्कनीसाठी प्रेक्षकांना 5 रूपये मोजावे लागत होते. इतक्या कमी तिकीट दर असतानाही या चित्रपटाने त्या काळातही 3 कोटी रूपयांचा गल्ला जमवला. याच चित्रपटातून मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर पुढे जाऊन अनेक कलाकार यशस्वी ठरले.
कधीही न संपणारी लोकप्रियता
या मराठी चित्रपटाने आत्तापर्यंत प्रत्येक मराठी माणसाची मनं जिंकून घेतली आहेत. 'धनजंय माने इथेच राहतात का', '70 सत्तर रूपये वारले', 'हा माझा बायको पार्वती', 'नवऱ्यानं टाकलंय तिला', 'लिंबू कलरची साडी' असे या चित्रपटातील गाजलेले डायलॉग्ज आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याच डायलॉग्जचा वापर करून अनेक जण मिम्स बनवतात.