2020 नंतरचा जगाचा बराचसा काळ कोरोना विषाणूच्या उद्रेकाशी लढण्यात गेला आहे. काही ठिकाणी अजूनही आपण त्याचे परिणाम भोगत आहोत. आजारपण, मृत्यू, नोकरी गमावणं, भीती अशा सगळ्या आवेगांमधून समाज गेला. आणि जागतिक तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनामुळे मंदीचं सावट उभं राहिलं.
या काळातच लोकांच्या मनात एक संकल्पना घोळत होती कोरोनामुळे देशाचं दळण वळणच थांबलेलं असताना गरजूंना मदत करण्याचा आणखी सोपा पर्याय कुठला? तसंच गरजूंसाठी काम करण्यांना आर्थिक रसद पुरवणं घरी बसून कसं शक्य होईल? या प्रश्नांना उत्तर म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच सामाजिक शेअर बाजाराच्या संकल्पनेचा पहिल्यांदा विचार झाला.
आणि विशेष म्हणजे या संकल्पनेला आता सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड अर्थातच शेअर बाजारांच्या राष्ट्रीय नियामक संस्थेनंही उचलून धरलं आहे. राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच NSE ला त्यांनी सामाजिक शेअर बाजार हा उपविभाग सुरू करायला परवानगी दिली आहे.
NSE ने गेल्याच आठवड्यात 23 फेब्रुवारीला एक प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे. आता सविस्तर बघूया या एक्सचेंजचा फायदा कसा होणार? त्याचं काम नेमकं कसं चालणार?
सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
NSE ने लागलीच एक ट्विट काढून SSE बद्दलची प्राथमिक माहिती लोकांना दिली आहे. प्रसिद्धी पत्रकात असं म्हटलंय की, ‘SSE मुळे सेवाभावी संस्थांना निधी गोळा करण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळेल. त्यांचं काम जगासमोर येईल. आणि या संस्था निधी कसा वापरतात याविषयीची पारदर्शकताही वाढेल.’
सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या किंवा नफा कमावणाऱ्या सेवाभावी संस्थांची एका एक्सचेंजवर नोंदणी करणं. या संस्था करत असलेली सेवाभावी कामं आणि उपक्रम यांची माहिती पारदर्शकपणे त्यांच्या माहितीपत्रकात मांडली जाते. संस्थेचा जमाखर्चही लोकांसमोर असतो.
आणि नोंदणी झालेल्या सेवाभावी संस्था थेट लोकांकडून मदतनिधी उभा करू शकतात. SSE मध्ये नोंदणीसाठी NSE ने आपले निकष आधीच स्पष्ट केले आहेत.
कोव्हिड सारख्या मोठ्या संकटात अशा नेटवर्कची गरज सर्वप्रथम भासली होती.
SSE च्या संकल्पनेला मान्यता मिळाल्यानंतर NSE चे CEO आशीषकुमार चौहान यांनी सेवाभावी संस्थांना नोंदणीसाठी आवाहन केलं आहे.
‘आम्ही मागचे काही महिने अनेक संस्थांशी संपर्कात आहोत. SSE वर लिस्टिंगचे फायदे त्यांना समजून सांगत आहोत. आणि आताही आम्ही इतर संस्थांना आवाहन करतो की, त्यांनी आमच्याशी संपर्क साधून SSEचं काम समजून घ्यावं,’ आशिषकुमार आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणाले.
SSE चं काम चालतं कसं? आणि त्याचे फायदे काय?
एका अहवालानुसार, भारतात ना नफा, ना तोटा तत्त्वावर चालणाऱ्या जवळ जवळ 31 लाख संस्था आहेत. ही संख्या देशातल्या एकूण शाळांच्या दुप्पट आहे. आणि सरकारी रुग्णालयांपेक्षा तर 250 पट जास्त आहे.
या संस्थांना आता SSE च्या माध्यमातून निधी गोळा करता येईल. त्यासाठी दारोदार फिरावं लागणार नाही. कोव्हिडमुळे ज्यांचे रोजगार गेले आहेत, अशांसाठी काम करणाऱ्या संस्था सध्या सर्वाधिक आहेत. सरकारी योजनांची मदतही त्यांना मिळते. पण, आता त्यांच्या पाठीशी SSE उभं राहील.
अशा सेवाभावी संस्थांनी SSE मध्ये नोंदणी करून घेतल्यावर देशातल्या कॉर्पोरेट कंपन्या तसंच सामान्य व्यक्तीही या संस्थांमध्ये गुंतवणूक करू शकेल. सध्या परदेशी कंपन्या तसंच परदेशी व NRI नागरिकांना इथं गुंतवणुकीची मनाई आहे.
नोंदणी झालेल्या संस्था झिरो कुपन - झिरो प्रिन्सिपल बाँड तसंच सेवाभावी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एक्सचेंजमधून पैसा उभा करू शकतात. संस्था सोशल व्हेंचर फंडही काढू शकतात.

गुंतवणुकीवर कर वजावटीचा फायदा
भारतीय नागरिकांना SSE मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 80G अंतर्गत कर वजावटीचा फायदा मिळू शकतो. अर्थात, त्यासाठी संस्थांनी काढलेल्या प्रत्येक फंडाला 80G अंतर्गत नोंदणी करून ही सूट मिळवावी लागेल.
NSE नेही त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं आखली आहेत. एक्सचेंजच्या माध्यमातून उभ्या केलेल्या पैशाचा विनियोग लोकांना लगेच कळावा इतकी पारदर्शकता फंडाच्या कामकाजात असली पाहिजे. ती असेल तर अशा फंडातल्या गुंतवणुकीला 80G वजावटीसाठी आवश्यक मान्यता मिळू शकते.
एखाद्या कंपनीने या एक्सचेंजमध्ये गुंतवणूक केली असेल तर ती त्यांच्या CSR कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी अंतर्गत केलेला खर्च म्हणून ग्राह्य धरली जाते. आणि त्याचा फायदा कर भरताना मिळू शकतो.
जगात कुठे कुठे आहेत सोशल स्टॉक एक्सचेंज?
ब्राझील, सिंगापूर, युके, पोर्तुगाल, कॅनडा तसंच दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये आधीपासूनच सोशल स्टॉक एक्सचेंज कार्यरत आहेत.
भारतातलं एक्सचेंज डिसेंबर 2023 मध्ये आपलं कामकाज सुरू करणार आहे.
एक्सचेंजला अजून सुरूवात झाली नसली तरी सामाजिक उपक्रमांसाठी शेअर बाजारातून पैसे उभारणीची काही ठळक उदाहरणं भारतातही देता येतील. HDFC म्युच्युअल फंड कंपनीने आपला कॅन्सर फंड बाजारात आणला आहे. या फंडात इतर फंडांसारखीच गुंतवणूक होते. पण, फंडाने कमावलेला पैसा कर्करोगावरील उपचारांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना जातो.