• 09 Feb, 2023 09:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax - Saving FDs : ‘या’ 5 मुदत ठेवी कर बचतही करतात आणि 7% च्या वर परतावाही देतात

Fixed Deposit

Tax - Saving FDs : मार्च 2023 ला हे आर्थिक वर्षं संपेल. आपल्याला तोपर्यंतची मुदत आहे कर बचतीसाठी गुंतवणूक करायला. पगारदार व्यक्तींसाठी 80C कलमांअंतर्गत मिळणारी वजावट खूप महत्त्वाची. त्या दृष्टीने बँकांच्या करबचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींवरचे व्याज दर बघूया..

आजकालचा जमाना म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचा (Share Market Investment) असला तरी गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी (Safe Investment) अजूनही काही टक्के रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतवण्याकडे लोकांचा कल असतो. काही मुदत ठेवींमधून कर बचतही शक्य होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? बँकांच्या अशा काही मुदत ठेव योजना असतात.     

सध्याचा जमाना व्याज दरवाढीचा असल्यामुळे काही बँका आपल्या मुदत ठेवींसाठी आकर्षक व्याज दरही देऊ करत आहेत. म्हणजेच चांगल्या व्याज दराबरोबरच कर बचतीचा फायदा या मुदत ठेवींमधून तुम्हाला मिळू शकणार आहे. अशाच काही निवडक योजना तुमच्यासमोर ठेवत आहोत. या सर्वांची मुदत पाच वर्षांसाठीची आहे. तरंच कर बचतीचा फायदा मिळू शकेल. साधारणपणे 7% पेक्षा जास्त व्याज देऊ करणाऱ्या योजना यात समाविष्ट केल्या आहेत.     

बँक बझार (www.bankbazaar.com) या वेबसाईटने अशा बँक मुदत ठेवींचा डेटा तयार केला आहे. आणि व्याज दरावरून त्यांनी मुदत ठेवींना रँकिंग दिलं आहे.     

1.DCB बँकेची कर बचत मुदत ठेव (DCB Bank)   

कर बचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींमध्ये सर्वात जास्त व्याज दर या घडीला DCB बँकेनं देऊ केला आहे. पाच वर्षं मुदतीसाठी त्यांचा व्याज दर आहे 7.6%    

अर्थात, संपूर्ण पाच वर्षं ही गुंतवणूक तुम्हाला कायम ठेवावी लागेल. आणि मुदत ठेव मध्येच मोडता येणार नाही. 80C अंतर्गत 1,50,000 रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वाचवता येतो.    

DCB बँकेत हे दीड लाख रुपये गुंतवलेत, तर पाच वर्षांनंतर तुम्हाला मिळतील 2.19 लाख रु.     

2.उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)   

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तसंच AU स्मॉल फायनान्स बँक या दोन्ही बँकांनी कर बचत करणाऱ्या मुदत ठेवींवर 7.2% व्याज देऊ केलं आहे. मुदत ठेव पाच वर्षांपूर्वी तुम्हाला मोडता येणार नाहीए. पण, यात दीड लाखांची गुंतवणूक केलीत, तर पाच वर्षांनंतर तुम्हाला 2.14 लाख रुपये नक्की मिळणारएत.     

3.डॉईचं बँक (Deutsche Bank)   

डॉईचं बँक या जर्मन बँकेनं भारतीय ग्राहकांना मुदत ठेवींवर 7% व्याज देऊ केलंय. परदेशी बँकांपैकी या बँकेचा व्याज दर सर्वात आकर्षक आहे. इथं दीड लाख रुपये गुंतवलेत तर पाच वर्षांनंतर त्याचे होतील 2.12 लाख रु.     

4.Yes Bank (Yes Bank)   

फक्त येस बँकच नाही तर आघाडीच्या खाजगी बँका कर बचत देणाऱ्या मुदत ठेवींवर सध्या 7% व्याज देऊ करत आहेत. सिटी बँक, RBL बँक, IDFC फर्स्ट, HDFC, अँक्सिस तसंच ICICI बँकेच्या काही कर बचत देणाऱ्या मुदत ठेवींवर 7% इतकं व्याज मिळतं. आणि यात कुठेही दीड लाख रुपये गुंतवलेत तर पाच वर्षांनंतर त्याचे 2.12 लाख रुपये होतील.     

5.इंडसइंड बँक (IndusInd Bank)   

इंडस इंड बँक तसंच सर्वोदय स्मॉल फायनान्स बँक या दोन बँका कर बचत देणाऱ्या मुदत ठेवींवर 6.75% इतकं व्याज देत आहेत. आणि इथं तुम्ही दीड लाख रुपये गुंतवलेत तर पाच वर्षांनंतर तुम्हाला 2.10 लाख रुपये परत मिळतील.     

पाच लाखांपर्यंतच्या मुदत ठेवींवर रिझर्व्ह बँकेचं संरक्षण आहे. म्हणजे तुमची न बुडण्याची हमी मध्यवर्ती बँकेनं दिली आहे. तसंच वर दिलेले व्याज दर हे कर बचत लागू होणाऱ्या मुदत ठेवींवरचे आहेत. आणि सगळ्यांची मुदत पाच वर्षांची आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे व्याज दर यात गृहित धरलेले नाहीत.