देशातील हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या (Vande Bharat Express Train) निर्मितीमध्ये आता टाटा स्टील्स (Tata Steel Company) महत्त्वाचे योगदान देणार आहे. पुढील दोन वर्षात देशात 200 वंदे भारत ट्रेन्सची निर्मिती केली जाणार आहे. खासकरून यामध्ये स्लीपर गाड्यांच्या (Sleeper Trains) समावेशही करण्यात आला आहे.
2024 च्या पहिल्या तिमाहीत (Q3) वंदे भारत ट्रेनची पहिली स्लीपर आवृत्ती सादर करण्याचे लक्ष्य भारतीय रेल्वेने ठेवले आहे. अशा परिस्थितीत रेल्वेच्या कामकाजाला गती देण्यासाठी भारतीय रेल्वेने टाटा स्टील कंपनीसोबत नुकताच एक करार केला आहे. या करारानुसार ट्रेन्सच्या सीट्स आणि डबे तयार करण्याची जवाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली आहे. या कराराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या गोष्टी बनवणार टाटा स्टील कंपनी
हाय स्पीड ट्रेन वंदे भारत ही 16 डब्यांची असणार आहे. अशा स्वरूपातील 22 ट्रेन्ससाठी टाटा स्टीलला सीट्स आणि डबे तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी ते थ्री-टायर डब्यांसाठी सीट्स तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय ट्रेनचे पॅनेल, खिडक्या आणि ट्रेन स्ट्रक्चरही (Train Structure) तयार करण्याचे काम कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीसोबतच्या या करारामुळे वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन बदल होणार आहेत.
टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य (Tata Steel Vice President Debashish Bhattacharya) यांनी यासंदर्भात माहिती दिली की, या ट्रेनच्या सीट्स 180 अंशांपर्यंत फिरू शकणार आहे. ही खास सुविधा आगामी ट्रेन्समध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय विमानासारख्या खास प्रवासी सुविधाही देण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे IANS च्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, ही पहिली अशी ट्रेन असेल, ज्यामध्ये 180 डिग्री फिरणाऱ्या खुर्च्या प्रवाशांना पाहता आणि अनुभवता येणार आहेत.
टाटा स्टीलला मिळाले 145 कोटींचे कंत्राट
भारतीय रेल्वेने टाटा स्टीलशी केलेला हा करार 145 कोटी रुपयांचा असून कंपनीला हे काम 12 महिन्यात पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी कंपनी कंपोझिट डिव्हिजनने कामास सुरुवात करणार आहे. 16 डब्यांच्या एकूण 22 ट्रेनमधील संपूर्ण सीटिंग सिस्टीमची जवाबदारी टाटा स्टीलवर भारतीय रेल्वेने सोपवली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रवाशांना टाटा स्टीलने बनवलेल्या फिरत्या खुर्च्यांवर बसायला मिळणार आहे.