• 31 Mar, 2023 08:38

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Motors ने 50 लाख गाड्यांची निर्मिती करून रचला विक्रम

Tata Motors

Image Source : www.cardekho.com

Tata Motors Crosses 50 Lakh Passenger: देशातील विश्वसनीय ब्रँड टाटा मोटर्सने 50 लाख गाड्यांची निर्मिती करून एक विक्रम रचला आहे. यापैकी 50,000 इलेक्ट्रिक वाहनांची यशस्वी विक्रीही त्यांनी केली आहे. या गाडयांना लोकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) 50 लाख वाहनांची निर्मिती करून एक विक्रम रचला आहे. हा आनंद कंपनी देशभरातील प्रादेशिक कार्यालयात  महिनाभर साजरा करणार आहे. टाटा मोटर्सने 1991 मध्ये वाहन उद्योगात प्रवेश केला आणि ग्राहकांसाठी सर्वोत्तम दर्जाचे मॉडेल्स सादर केले. टाटा सध्याच्या घडीला तीन वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कारची विक्री करत आहे. यामध्ये टाटा नेक्सन, टाटा टियागो आणि टाटा टिगोरचा समावेश करण्यात आला आहे. मेड इन इंडिया (Made in India) संकल्पनेला चालना देणाऱ्या टाटांच्या कारला लोकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

अशा प्रकारे टाटांच्या वाहन निर्मितीचा आकडा वाढला

जागतिकीकरणानंतर देशात औद्योगिकतेचे वारे वाहू लागले. भारतातील लोकांना आपली वाटावी आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने टाटांनी 1991 मध्ये वाहन उद्योगात प्रवेश केला. 2004 मध्ये म्हणजे 13 वर्षांच्या प्रवासानंतर, टाटा मोटर्सने 10 लाख वाहनांची उत्पादन निर्मिती पूर्ण करण्यात यश मिळवले. 2010 मध्ये हे लक्ष 20 लाख वाहनांपर्यंत पोहचले. लोकांचा उदंड प्रतिसाद आणि उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे सेल वाढला, आणि 2015 मध्ये टाटाने 30 लाख वाहने बनवण्याचा आकडा सहज पार केला.  2020 मध्ये 40 लाख वाहनांची निर्मिती आणि त्यानंतर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करून 2023 मध्ये टाटा मोटर्सने 50 लाख वाहनांची यशस्वी निर्मिती केली.

50 लाख वाहनांच्या उत्पादनाचा विक्रम केल्यानंतर आता टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि उत्पादन युनिट्ससाठी देशातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये महिनाभर याचा आनंद साजरा करणार आहे. टाटा सध्या Tata Altroz, Tata Nexon, Tata Punch, Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier, Tata Safari या कारची विक्री करत आहे.

आतापर्यंत किती इलेक्ट्रिक कार विकल्या?

अलीकडेच टाटाने 50,000 इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा आकडाही गाठला आहे. टाटा सध्या टाटा नेक्सॉन, टाटा टियागो आणि टाटा टिगोर अशी तीन इलेक्ट्रिक कार यशस्वी रित्या विकत आहे. लवकरच टाटा पंच आणि टाटा अल्ट्रोज ही दोन इलेक्ट्रिक वाहने ग्राहकांच्या सेवेत सादर करण्यात येणार आहेत. ज्यावर सध्या काम सुरू आहे.

'या' कंपन्या आहेत प्रतिस्पर्धी

देशातील लोक टाटांच्या गाडयांना पसंती देत असले, तरीही टाटा मोटर्सचे प्रतिस्पर्धी म्हणून महिंद्रा, मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा यांसारख्या गाडयांना पाहिले जाते.