Share Market Closing Bell: बाजारातील चढ-उताराच्या स्पर्धेत, शेवटच्या तासात बाजारात सुधारणा दिसून आली. सेन्सेक्स, निफ्टी मागील आठवड्याप्रमाणेच आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी घसरणीसह बंद झाले. बँकिंग स्टॉकची खरेदी होताना दिसून आली तर मेटल, आयटी, ऑटो आदी क्षेत्रांच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा समभागांवर दबाव होता. मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांवर दबाव होता. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 175.58 अंकांनी म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घसरून 59 हजार 288.35 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 73.10 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 17 हजार 392.70 वर बंद झाला.
हे स्टॉक्स वधारले आणि हे स्टॉक्स खालावले (These stocks rose and fell)
आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) निफ्टीवर सर्वाधिक 2.17 टक्क्यांची वाढ नोंदवली. तसेच पॉवरग्रीडमध्ये ((PowerGrid) 2.16 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) 1.80 टक्के, एचडीएफसी लाइफ (HDFC Life) 1.58 टक्के आणि एसबीआय (SBI) 1.24 टक्क्यांनी वाढले.
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) निफ्टीवर सर्वाधिक 9.74 टक्क्यांनी घसरून बंद झाली. बजाज ऑटो (Bajaj Auto) 5.32 टक्के, यूपीएल (UPL) 4.10 टक्के, टाटा स्टील (Tata Steel) 2.96 टक्के आणि इन्फोसिस (Infosys) 2.58 टक्के घसरले.
शेअर बाजार कोसळण्यामागील कारणे? (Reasons behind stock market crash?)
सध्या जागतिक बाजारपेठेत कमजोरी आहे. गेल्या आठवड्यात डाऊ जोन्समध्ये सलग चौथ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. आज सकाळी आशियाई बाजारावर खूप दबाव होता आणि सर्व प्रमुख निर्देशांक लाल रंगात होते.
अमेरिकेत पुन्हा एकदा महागाई वाढल्याने फेड रिझव्र्ह पुढील दोन-तीन बैठकांमध्ये व्याजदर वाढवू शकतो, असा कयास आता बाजारातील निरीक्षकांनी बांधला आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 31 हजार कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे.
डिसेंबर तिमाही कमाईचा हंगाम मूल्यांकनांना समर्थन देण्यासाठी कोणतेही सकारात्मक ट्रिगर निर्माण करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे शेअर बाजारालाही ब्रेक लागला होता. अदानी समुहाच्या समभागातील सततच्या विक्रीच्या दबावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. दिवसभराच्या व्यवहारात अदानी समूहाच्या 10 पैकी 9 सूचीबद्ध कंपन्यांच्या भावात घसरण झाली. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या समभागांमध्ये सर्वाधिक 6.5 टक्क्यांची घसरण झाली. समूहातील सहा कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटला आले. या सगळ्यांमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे.