• 31 Mar, 2023 08:41

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Science Day : BMC च्या 25 कोटींच्या बजेटनं मुंबईकरांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार का?

Mumbai Pollution

Image Source : www.singlepost.com

National Science Day : यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे Global Science for Global Wellbeing. लोकांच्या भल्यासाठी जगाने एकत्र येऊन विज्ञानाचा केलेला उपयोग, असं यात सुचवायचं आहे. सध्या भारतासमोरचा एक मोठा प्रश्न आहे तो हवेतल्या प्रदूषणाचा. आणि मुंबई तर जगातलं दुसरं प्रदूषित शहर आहे.

रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर कार्यक्रमात मुंबईकरांची प्रदूषणासाठी माफी मागितली. शहरात जागोजागी सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्पांमुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी ही दिलगिरी होती. आणि येत्या तीन ते चार वर्षांत मुंबई पूर्णपणे प्रदूषण-मुक्त होईल असं सांगायलाही ते विसरले नाहीत.        

झालंय असं की, मुंबईत प्रदूषण वाढलंय. आणि या घडीला मुंबईनगरी जगातलं दुसरं सर्वात जास्त प्रदूषित शहर बनलंय. अशावेळी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला पावलं उचलणं गरजेचं बनलंय. देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही मुबई शहरासाठी 2023 मधला अजेंडा प्रदूषण-मुक्त आणि ट्राफिक-जाम मुक्त मुंबई असा असल्याचं म्हटलं होतं.       

पण, देवेंद्र फडणवीस यांचं भाषण, विरोधकांनी शहरातल्या प्रदूषणावर केलेली टीका या सगळ्या राजकीय गोष्टी झाल्या. आणि याचवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे प्रदूषणाची बरीचशी ओरड ही राजकीय असल्याचाच भास होतो. आहे.        

आपण मात्र या प्रश्नाकडे वैज्ञानिक दृष्टिकोणातून बघूया. आज (28 फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. आणि यंदाची संकल्पनाच जागतिक समाजकल्याणासाठी जागतिक विज्ञान (Global Science for Global Wellbeing) अशी आहे. यात जे कल्याण अपेक्षित आहे ते जागतिक तापमान बदलांचा परिणाम कमी करून दैनंदिन जीवन सुधारणे हेच आहे.        

आता मुंबई शहरासाठी हे कसं करता येईल आणि त्यासाठी मुंबई महानगर पालिकेचं 25 कोटी रुपयांचं बजेट पुरेसं आहे का हे पाहूया…        

मुंबई शहरातल्या प्रदूषणाची कारणं       

एखाद्या शहरातल्या हवेत प्रदूषणाचं प्रमाण किती आहे आणि हवेची शुद्धता नेमकी किती आहे, हे आपल्याला एअर क्वालिटी इन्डेक्स मधून कळत असतं. हा इन्डेक्स रिअलटाईम म्हणजे सतत बदलता असतो.        

28 फेब्रुवारीला दुपारी साडे बारा वाजता मुंबईसाठीचा AQI आहे 175. या लिंकमध्ये तुम्हीही तो पाहू शकता. किंवा कुठल्याही ठिकाणच्या हवेची शुद्धता पाहू शकता. 50 अंशांच्या वर हा आकडा गेला तर तो आरोग्यासाठी हानीकारक मानला जातो. यावरून तुम्हाला गांभीर्याची कल्पना येईल.        

आता मुंबईची हवा का प्रदूषित झाली आहे याची महत्त्वाची चार कारणं बघूया…       

रखडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प       

एरवी पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून मोठी रोजगार निर्मिती होते. आणि शहराचा विकास होतो. त्यामुळे असे प्रकल्प हे महत्त्वाचे मानले जातात. पण, महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी अलीकडेच सांगितलेला एक आकडा धक्कादायक आहे.        

मुंबई शहरात सध्या 2,806 बांधकाम प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे . आणि त्या व्यतिरिक्त 3,500 च्या वर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत,’ महानगरपालिकेच्या बजेटनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती.        

या बांधकामांमुळे शहराचं अर्थचक्र सुरू आहे. पण, सिमेंट, रेती आणि जळलेल्या इंधनामुळे कामगार आणि आजू बाजूच्या लोकांचाही जीव गुदमरतोय. हवेची शुद्धता कमी झालीय त्या मागे हे एक महत्त्वाचं कारण आहे.        

या बांधकाम प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प धरलेलेच नाहीत. मेट्रो मार्गांची उभारणी, कोस्टल रोडचं बांधकाम, समृद्धी महामार्गाचं राहिलेलं काम आणि असे शंभरच्या वर रस्ते प्रकल्प सध्या मुंबईत सुरू आहेत. आणि सगळीकडून प्रदूषण निर्मिती मात्र होत आहे.        

ट्राफिक-जाम चा उद्रेक       

‘रस्त्यांवरून जाणंही कठीण झालंय,’ ‘एरवी अर्ध्या तासाचा असलेला रस्ता पार करायला आता दोन तास लागतात,’ अशा गप्पा नाक्या नाक्यावर रंगतायत. यात आणखी एक गोष्टीची भर घालूया, ‘रस्त्यावर चालत असताना सतत टॅक्सी आणि रिक्षांनी सोडलेला अशक् धूर नाका-तोंडात जातो.’        

हा करोडो मुंबईकरांचा रोजचा अनुभव आहे. आणि याला कारण आहे मेट्रो आणि रस्ते बांधकामांमुळे जागोजागी होणारे ट्राफिक-जाम. याचा आणखी एक दृश्य परिणाम आहे वाढलेलं प्रदूषण.        

रस्त्यावरून गाडी जितकी बिनबोभाट जाईल तेवढं गाडीतून कार्बन उत्सर्जन कमी होईल. किंवा ते आटोक्यात राहील. पण, ट्राफिक जाम वाढले तर कार्बन उत्सर्जन वाढेल. आणि सध्या महत्त्वाच्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर नेमकं हेच होतंय.        

What Pollutes Mumbai City?

त्यात भरीस भर म्हणून प्रादेशिक वाहतूक विभागाकडून वेळोवेळी मिळालेला डेटा असं सांगतो की, शहरातल्या 66% टक्के रिक्षा आणि टॅक्सी या प्रदूषण सर्टिफिकेटविनाच रस्त्यावर धावतायत. इतकंच नाही तर वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पर्यावरणविषयक कायदे बनले. पण, 2015 नंतर फक्त एका व्यक्तीवर या कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. बाकीचे एकतर पुराव्या अभावी सुटलेत किंवा खटले सुरू आहेत.        

सांगण्याचा मुद्दा हा की, प्रदूषण कमी व्हावं म्हणून कारवाई होत नाहीए.        

औद्योगिक आणि ऊर्जा स्त्रोतांकडून होणारं प्रदूषण       

मुंबई हे महत्त्वाचं औद्योगिक शहर आहे. आणि तिथली ऊर्जेची गरजही मोठी आहे. त्यामुळे औद्योगिक प्रदूषणही इथं देशात सर्वाधिक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, मुंबईतलं वांद्रे-कुर्ला संकुल हे सगळ्यात जास्त प्रदूषित ठिकाण आहे.        

कारण, इथं औद्योगिक प्रकल्प आणि रहदारी दोन्ही जास्त आहे. औद्योगिक संकुलांमधलं घन कचरा व्यवस्थापन हा ही एक मुद्दा आहेच. एसीमधून बाहेर येणारा धूर. अशी अनेक कारणं आहेत.        

कचरा - सांडपाणी यांचं बिघडलेलं व्यवस्थापन       

मुंबई शहरात तयार होणारं सांडपाणी वर्षानुवर्षे अरबी समुद्रात सोडण्याची पद्धत आहे. पण, आता ही पद्धत शास्त्रीय नसल्याचं समोर आलं आहे. तरीही हीच पद्धत शहरात सुरू आहे.        

आता याचा परिणाम समुद्र दूषित होण्यात होतो आहे. आणि त्यातून पर्यावरणाचं नुकसान होतंय.        

याशिवाय घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं यंत्रणाही पुरेशी विकसित नाही. त्यामुळे कचरा जाळण्याचे प्रयोग होतात. आणि त्यातून कार्बन उत्सर्जन वाढतं.       

Mumbai Air Pollution
Source : www.housing.com

प्रदूषणावर महानगरपालिका कोणते उपाय करणार?       

महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी वेळोवेळी प्रदूषणावर बोलताना तंत्रज्ञानाच्या वापराचा उल्लेख केला आहे. आताच्या पालिका बजेटमध्येही त्यांनी 25 कोटी रुपये हे प्रदूषणावरच्या उपाय योजनेसाठी बाजूला ठेवले आहेत.        

आता प्रश्न आहे की, हे उपाय परिणामकारक होतील का?       

महानगर पालिका कुठले उपाय करणार आहे ते आधी बघू.        

शहरात 14 स्मॉग टॉवर्स       

मुंबई शहर सात विभागांमध्ये विभागलं गेलं आहे. आणि या सातही विभागांमध्ये प्रत्येकी दोन या प्रमाणात स्मॉग टॉवर बसवण्यात येणार आहेत. हवेत फिरणारे प्रदूषणकारी कार्बन धूलीकण या टॉवरमध्ये बसवलेल्या यंत्रणेकडे ओढले जातात. आणि असे धूलीकण मग एकमेकांकडे ओढले जातात आणि त्यांचा पुंजका तयार होऊन वजनामुळे हे घटक हवेत न राहता खाली जमिनीवर पडतात. हवा त्यामुळे शुद्ध होते.       

असे टॉवर 30 फूट उंच असतात आणि फक्त दोन स्केअर फूटांची जागा व्यापतात. इलेक्ट्रो-मॅग्नेटिक रेडिओ लहरी निर्माण करून त्या हवेत सोडण्याचं काम हे टॉवर करतात. धूलीकण या लहरींना चिकटतात.        

अशा एका टॉवरमुळे आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरातलं प्रदूषण 45% नी कमी होतं.        

अशा प्रत्येक टॉवरचा उभारणीचा खर्च साडे तीन कोटी रुपये आहे.        

ही यंत्रणा किती परिणामकारक?      

इक्बाल चहल यांनी अगदी ठासून ही यंत्रणा यशस्वी होईल असा दावा केला आहे. पण, एका प्रश्नाचं उत्तर चहल देतील का? प्रदूषण हाताळणीसाठी एकूण बजेट 25 कोटींचं आहे. त्यात असे चौदा टॉवर कसे उभारून होणार?       

प्रत्येकी साडे तीन कोटी धरले तर 14 टॉवरसाठी पालिकेला 50 कोटी रुपये लागतील.       

Smog Towers in Delhi
Source : www.theasianage.com

दुसरं म्हणजे असे टॉवर नवी दिल्लीत बसवले असता त्यांचा उपयोग झाला नव्हता. मग फसलेल प्रयोग आपण मुंबईत पुन्हा का करतोय?        

पर्यावरणविषयक तज्ज्ञांनीही या यंत्रणेवर सवाल उभे केले आहेत. ‘एकतर असे टॉवर देशातही इतर ठिकाणी यशस्वी झालेले नाहीत. शिवाय हवेतलं प्रदूषण जमिनीवर आणून आपण काही वेगळं करतोय असं वाटत नाही,’ सेंटर फॉर रिसर्च ऑन क्लीन एनर्जी या संस्थेतले एक संशोधक सचिन दाहिया यांनी म्हटलंय.        

आणखी एक मुद्दा दाहिया यांनी मांडला तो म्हणजे, ‘हे टॉवर वीजेवर चालणारे आहेत. म्हणजे कोळसा जाळून मिळवलेल्या विजेवर. टॉवरच्या माध्यमातून एक किलोमीटर परिसरातली हवा शुद्ध करायची आणि हे टॉवर चालवण्यासाठी वीज खर्च करायची, हे कुठलं गणित आहे? हे टॉवर शास्त्रीय दृष्ट्या अगदी योग्य काम करतात असा पुरावाही नाही,’ दाहिया यांनी पोट तिडकीने आपला मुद्दा मांडला.        

गर्दीच्या जागी एअर प्युरिफायर्स       

पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी आणखी एक उपाय सांगितलाय तो शहरातली गर्दीची ठिकाणं निश्चित करून त्या ठिकाणी एअर प्युरिफायर बसवण्याचे.        

दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, कलानगर जंक्शन, महालक्ष्मी जंक्शन आणि अशा गर्दीच्या सात ठिकाणी एअर प्युरिफायर्स बसवण्यात येणार आहेत.        

अशा प्रत्येक एअर प्युरिफायरची किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. पण, या उपायावरही वैज्ञानिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी शंका उपस्थित केली आहे. शिवाय असे कुठलेही उपाय कायमस्वरुपी असत नाहीत याकडेही जाणकारांनी बोट दाखवलं आहे.        

असे कृत्रिम उपाय करण्यापेक्षा मूलभूत प्रदूषण कमी व्हावं यासाठी यंत्रणा काही करणार का, तसंच घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी काय केलं जाणार याचं उत्तर सध्या तरी आयुक्त चहल यांनी दिलेलं नाही.        

मुंबई सर्वात प्रदूषित शहर       

मुंबईतल्या प्रदूषणावर ही सगळी चर्चा चहू बाजूला सुरू असताना जगभरातले प्रदूषणाचे आकडेही येतायत. आणि त उत्साहवर्धक नाहीत. एरवी थंडीच्या दिवसांत राजधानी दिल्लीत हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. आणि तिथला इंडेक्स 400च्या ही घरात जातो. हे हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी पराळी जाळतात त्यामुळे होतं.        

रब्बी हंगामाच्या सुरुवातीला दिल्लीत येणारा हा अनुभव जीव गुदमरवणाराच असतो. पण, मुंबईतला सध्याचा अनुभवही काही वेगळा नाहीए. अगदी जागतिक आकडेवारीतूनही हेच सिद्ध होतंय.        

Polluted Cities in the World

स्वीत्झर्लंडमधली Iq.air ही वेबसाईट जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांच्या हवेतील शुद्धतेचा डेटा जमा करते. ही आकडेवारी रिअल टाईम असते. आणि आज (28 फेब्रुवारी) ला पाहिलंच तर मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर दिसेल.       

मुंबई नंतर म्यानमारमधील यँगॉन, नवी दिल्ली, चियांग माई, ढाका आणि वुहान यांचा क्रमांक लागतो.        

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी ही यंत्रणेची आहे. पण, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे नागरिकांनीही जिथे प्रदूषण कमी करता येईल त्याची काळजी घेतली पाहिजे.        

प्लास्टिकचा कमी वापर, इंधन वाचवणं, वाहनांची नीट काळजी घेणं, कचरा व्यवस्थापनात महानगरपालिकेला सहकार्य करणं हे आपण करू शकतो. आणि राष्ट्रीय वज्ञान दिवसाच्या निमित्ताने या गोष्टीची सुरुवात करू शकतो.