• 27 Mar, 2023 06:48

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Scam : 'या' बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे दुसरीकडे वळवून कसा केला करोडोंचा घोटाळा?

Axis Front - Running Scam

Mutual Fund Scam : सध्या एक म्युच्युअल फंड घोटाळा खूप गाजतोय. देशातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात मोठ्या बँकेत एका कर्मचाऱ्याने लोकांचे पैसे दुसरीकडे वळवून तब्बल 30 कोटींची माया गोळा केली. सध्या अर्थातच हा कर्मचारी आणि त्याचे 20 साथीदार तुरुंगात आहेत

Axis Mutual Fund Front-Running Case या नावाने एक घोटाळा एव्हाना तुम्ही ऐकलाही असेल. कोव्हिडच्या काळात बँकेच्या वर्क-फ्रॉम-होम आणि सोशल डिस्टन्सिंग धोरणांचा फायदा घेऊन स्वत:ला जादूगार म्हणवणाऱ्या या फंड मॅनेजरने दोन वर्षांत चक्क 31 कोटी रुपये कमावले होते. हा माणूस आतली माहिती आपल्या ट्रेडिंग मित्रांना देत होता. आणि त्याप्रमाणे म्युच्युअल फंड कंपनीच्या वतीने गुंतवणूकही करत होता.     

अलीकडच्या काळातला हा सगळ्यात मोठा म्युच्युअल फंड घोटाळा आहे. फंड मॅनेजर विरेन जोशी सध्या अटकेत आहे. आणि अलीकडेच सेबीने विरेनसह त्याच्या 20 साथीदरांना शेअर बाजारात गुंतवणूक करायला मनाई केली आहे.    

ही कारवाई करताना सेबीने जे प्रसिद्धीपत्रक काढलंय, त्यात हा घोटाळा कसा घडला ते लिहिलंय. आणि ते जाणून घेणं रंजक आहे.    

सेबीने हा घोटाळा नेमका कसा पार पडला याची पद्धतच उघड केली आहे. अर्थातच, हेतू हा की असे प्रकार पुन्हा कधी घडू नयेत.     

फ्रंट-रनिंग घोटाळा म्हणजे काय?    

शेअर बाजारात इनसाईडर ट्रेडिंग होतं, तसाच हा प्रकार आहे. म्हणजे कर्मचाऱ्याला कंपनीची अजून बाहेर न आलेली माहिती मिळालेली असते. आणि तिचा वापर करून हा कर्मचारी स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवणूक करतो. किंवा भविष्यात फायद्याच्या ठरतील अशा कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पैसे गुंतवतो.     

योगायोगाने मिळालेल्या माहितीचा वैयक्तिक फायद्यासाठी उपयोग करणं हे बेकायदेशीर आहे. शेअर बाजारात हर्षद मेहता, केतन पारेख यांनी केलेले घोटाळे अशाच प्रकारचे होते. आता म्युच्युअल फंडातही असा घोटाळा समोर आला आहे.     

अ‍ॅक्सिस बँकेच्या या घोटाळ्यात विरेन जोशी या फंड मॅनेजरची मोठी भूमिका होती. आणि आपल्या साथीदारांबरोबर केलेल्या मेसेजच्या देवाण घेवाणीत त्याचं नाव ‘जादूगार’ असं घेतलं जात होतं.     

वर्क फ्रॉम होमच्या काळात विरेन घरून काय करत होता?   


सेबीने दिलेल्या घटनाक्रमानुसार, कोव्हिडच्या काळात सगळे वर्क फ्रॉम होम काम करत होते. आणि नंतरही सोशल डिस्टन्सिंगमुळे सगळ्यांची वर्क स्टेशन लांब लांब होती. आणि याचा फायदा विरेन जोशीने घेतला.     

‘विरेन जोशी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनीचा मुख्य डीलर होता. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड कंपनी ज्या शेअरमध्ये पैसे गुंतवणार होती, त्याच कंपन्यांमध्ये विरेन आणि त्याची गँग आधीच गुंतवणूक करून ठेवायची. गुंतवणुकीसाठी पैसे उभे करतानाही त्यांनी घोटाळा केला,’ सेबीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलंय.     

1 सप्टेंबर 2021 ते  31 मार्च 2022 पर्यंत हा प्रकार सुरू होता. मारफातिया ग्रुप, वूडस्टॉक ग्रुप आणि कुराणी ग्रुप या तीन कंपन्यांना अशी माहिती विरेन देत होता. या ग्रुपमधले लोक आपापसात कुठलीही बातमी शेअर करताना वॉट्सअॅपवर विरेनचा उल्लेख जादूगार असा करत.     

सेबीने कारवाई करताना या सगळ्यांकडून 30.6 कोटी रुपये जप्त केले आहेत. हिंदाल्को, टाटा कन्झ्युमर आणि झूमॅटो यांच्या शेअरविषयीची माहिती विरेननं बाहेरच्या लोकांना दिली होती.     

Fund Manager involved in Axis MF Scam
Source : www.businesstoday.in

जेव्हा म्युच्युअल फंड कंपनी एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करते तेव्हा ती मोठ्या रकमेची असते. त्यामुळे त्या शेअरमध्ये नक्कीच हालचाल दिसून येते. याच गोष्टीचा फायदा घेऊन विरेन आणि गँग त्याच शेअरमध्ये आधीच गुंतवणूक करून ठेवायचे. तसंच फ्युचर आणि ऑपशनची काँट्रॅक्ट घेऊन ठेवायचे. आणि म्युच्युअल फंड कंपनीने प्रत्यक्ष गुंतवणूक केली की फायदा घेऊन हे लोक गुंतवणुकीतून बाहेर पडायचे.     

‘या सर्व प्रक्रियेत विरेन जोशीच्या टीप्स प्रमाणे गुंतवणूक करून चार ब्रोकरेज कंपन्यांनी चांगला नफा कमावला. या प्रकरणी मोबाईल फोनमधूनही बरेच पुरावे तपासात मिळाले. आणि साधारण वर्षभराचे अकाऊंट्स तपासल्यानंतर या 21 जणांवर कारवाई करण्यात आली,’ असं सेबीने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.     

घोटाळ्यात ‘जादूगारा’ची भूमिका काय?    

विरेन जोशी आणि सुमित देसाई हे दोन यातले महत्त्वाचे ऑपरेटर होते. सुमितने इतर साथीदारांची दुबईत बेनामी खाती उघडून घेतली. म्युच्युअल फंड कंपनीत फंड हाताळण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला आपला फोन जपून वापरावा लागतो. आणि हा फोन नंबर कंपनीच्या रडारवर असतो. शिवाय कंपनीत असताना ही व्यक्ती बाहेरच्या व्यक्तीशी बोलूही शकत नाही. पैशाचे व्यवहार गोपनीय राहावेत हाच हेतू यामागे असतो.     

पण, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे जोशी घरून काम करत होता. त्याने आपल्या वैयक्तिक फोन नंबर वरून ही सगळी माहितीची देवाण घेवाण केली. इतकंच नाही तर एकदा टीप दिल्यानंतर म्युच्युअल फंड कंपनीकडून प्रत्यक्ष कधी सौदा होतोय याची माहितीही तो वारंवार कंपनीत फोन करून घ्यायचा. त्याचा हुद्दा आणि पदामुळे त्याला ही माहिती मिळतंही होती.     

सेबीला सुरुवातीला ‘हा जादूगार कोण’ असा प्रश्न पडला होता. पण, दुसरा नंबर वापरताना विरेन जोशीने जी केवायसी प्रक्रिया केली त्यात त्याचीच डॉक्युमेंट्स होती. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. आणि पुढे झालेल्या चौकशीत हा सगळा प्रकार उघड झाला.