• 27 Mar, 2023 06:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL ने पुरुषांच्या क्रिकेटचा झाला तसा फायदा WPL मुळे महिला क्रिकेटचा होईल का?  

Women's Premier League

Image Source : www.flipboard.com

Women’s Premier League : BCCI ने IPL च्या धर्तीवर महिलांसाठी विमेन्स प्रिमिअर लीग (WPL) ची घोषणा केली. आणि म्हणता म्हणता 3 मार्चपासून महिलांच्या T20 मॅचेसना सुरुवातही होणार आहे. या स्पर्धेचा महिला क्रिकेटला नेमका कसा फायदा होईल. आणि महिला क्रिकेटची आर्थिक घडी यामुळे बसू शकेल का?

20 फेब्रुवारी 2008 ला पुरुषांच्या पहिल्या आयपीएलसाठी लिलाव झाला होता. तिथपासून आज आयपीएल कुठे पोहोचलीय हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. BCCI ब्रँड मोठा झालाय, खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू वाढलीय आणि लोकांमध्ये आयपीएलची लोकप्रियता तर अफाट आहे.       

IPL च्या यशानंतर आता BCCI ने त्याच धर्तीवर महिलांसाठी विमेन्स प्रिमिअर लीग अर्थात WPL ची घोषणा केली आहे. WPl साठीचा लिलाव नुकताच पार पडला आहे . आणि येत्या 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान ही स्पर्धा मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि वाशीचं डी वाय पाटील स्टेडिअम इथं पार पडणार आहे.        

IPL सारखंच यश WPL ला मिळेल का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आयपीएलमुळे जसं पुरुषांचं क्रिकेट बदललं तसा फायदा महिला क्रिकेटला आर्थिक घडी बसवण्यासाठी होईल का किंवा खरंतर होऊ शकेल का?       

How WPL will change Women's Cricket
Source : www.dnaindia.com

WPL मुळे महिला क्रिकेट कसं बदलेल?      

WPL सारख्या स्पर्धेचा महिला क्रिकेटवर परिणाम होईल का हा प्रश्न जरी समजून घ्यायचा झाला तरी त्यासाठी एक गोष्ट ध्यानात घ्या. महिलांना 3 मार्च ते 23 मार्च दरम्यान प्रत्येकी किमान आठ सामने खेळायची संधी मिळणार आहे. आणि टीम सेमी फायनल - फायनलला गेली तर जास्तीच्या दोन मॅचेस.  आणि या मॅचेस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पिचवर होणार आहेत!       

हे आवर्जून सांगावं लागतं कारण, 2022 च्या अख्ख्या वर्षात आपली महिलांची टीम फक्त 27 वन डे आणि 19 टी-20 खेळलीय. टेस्ट एकही नाही. आणि ही मॅचची संख्या इतकी दिसतेय कारण, एशिया कप, महिलांचा वर्ल्ड कप आणि कॉमनवेल्थ स्पर्धा यावर्षी झाल्या. नाहीतर महिला टीमच्या वाट्याला परदेश दौरे फारसे येतच नाहीत.       

एका वर्षात जेमतेम एक टेस्ट सीरिज, वन डे आणि टी-20 मिळून 20-30 च्या वर मॅचेस महिलांची टीम खेळत नाही. याउलट पुरुषांची टीम 2022 मध्ये 71 च्या वर मॅच खेळली आहे. आणि यात 5 टेस्ट मॅच आहेत. एशिया कप, वर्ल्ड कप यात धरलेला नाही. त्या मॅचेस वेगळ्या.       

पुरुष क्रिकेटर आणि महिला क्रिकेटर यांना मिळणाऱ्या संधींमध्ये ही इतकी तफावत आहे. आणि म्हणूनच WPL चा नेमका परिणाम महिलांच्या क्रिकेटवर काय होऊ शकेल हे पाहण्याचे निकषही वेगळे आहेत. इथं आपण तीन महत्त्वाचे आर्थिक निकष पाहणार आहोत, ज्यांचा एकूण क्रिकेटवर परिणाम होईल.       

How WPL will change Women's Cricket

रणजी खेळाडूवरही लागली बोली     

पुरुष क्रिकेटरच्या बाबतीतही हे घडलं होतं. महेंद्रसिंग धोणीवर पहिल्या आयपीएलमध्ये पंधरा लाख अमेरिकन डॉलरची बोली लागली हे तर महत्त्वाचं आहेच. पण, त्याचबरोबर रवींद्र जाडेजा, सुरेश रैना आणि नंतरच्या पिढीत हार्दिक पांड्या, के अल राहुल यांच्यावरही आयपीएलमध्ये बोली लागली. आणि हे खेळाडू भारतीय क्रिकेटमध्ये उदयाला आले. रणजी खेळणाऱ्या किती खेळाडूंना आयपीएलने हळूहळू करोडपती केलं याची गणतीच नाही.        

महिलांच्या बाबतीत तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि रणजी स्तरावर खेळणारे खेळाडू यांच्यातली गॅप आणखी मोठी आहे. अगदी अलीकडे डिसेंबर महिन्यात महिलांना आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुरुषांइतके पैसे मिळायला लागलेत. त्यामुळे रणजी किंवा त्या खालच्या स्तरावर न बोललेलंच बरं.       

अशावेळी स्मृती मंढानाला सव्वा तीन कोटी रुपये मिळणार हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे की, तानिया भाटियाला 30 लाख मिळाले, हरलीन देओलला 40 लाख मिळाले आणि शबनमलाही 10 लाख मिळणार आहेत. ही नावं आज तुम्हाला माहीत नसतील. पण, कदाचित पुढे माहीत होतीलही. आणि अशा मुलींसाठी WPL हे मोठं व्यासपीठ असेल. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं आर्थिक पाठबळ पक्कं होईल. रणजी खेळाडूला क्रिकेटमधून आर्थिक उत्पन्नही मिळेल. जी गोष्ट एरवी विरळ आहे.       

WPL Auction has made Women Cricketers rich

याविषयी बोलताना माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर सुलक्षणा नाईक म्हणते, ‘क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकतं हे आता लोकांना कळेल. आणि त्यामुळे मुलींच्या क्रिकेटला घरातूनही पाठिंबा मिळेल. स्मृती आणि हरमनप्रीत सारख्या मुलींनी आंतरराष्ट्रीय मैदान गाजवलंच आहे. आता व्यावसायिक खेळाडूची आर्थिक घडी बसली तर खेळावर लक्ष केंद्रीत करणंही सोपं जातं.’       

सुलक्षणा नाईक स्वत: रेल्वेकडून क्रिकेट खेळलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यामते नोकरी आणि सुविधा त्यांच्या काळातही मिळत होत्या. पण, त्याचं प्रमाण कमी होतं. ‘काही सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला खेळाडूंना स्थान मिळत होतं. पण, आता कॉर्पोरेट जगही महिला क्रिकेटकडे अपेक्षेनं बघतंय ही चांगली गोष्ट आहे,’ असं नाईक यांना वाटतं.       

महिला टीमसाठी कोचिंग स्टाफ     

एका फ्रँचाईझीला टीममध्ये पाच परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना जगभरातल्या खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा अनुभव मिळणार आहे. हा अनुभव महिला क्रिकेटरसाठी एरवी विरळाच.       

शिवाय महिलांची राष्ट्रीय टीम सध्या कायमस्वरुपी कोचशिवाय खेळतेय हे तुम्हाला नाहीत आहे का? राजेश पोवार यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या कोचची अधिकृत घोषणा झालेली नाही. ऋषीकेश कानिटकर कामचलाऊ कोच आहेत. नॅशनल टीमची ही अवस्था आहे.       

पण, WPL मध्ये टीमला कोच असतील. बॅटिंग, बोलिंगसाठी वेगळे कोच असतील, फीजिओ असेल आणि मानसोपचारतज्ज्ञही असेल. टीमची इतकी प्रोफेशनल बांधणी महिला क्रिकेटरसाठी नवीन असेल. शिवाय सरावासाठी चांगल्या दर्जाची पिच मिळतील ते वेगळंच. या गोष्टींसाठी बीसीसीआय आणि फ्रँचाईजी वेगळा खर्च करतील ही गोष्ट महिला क्रिकेटला पुढे नेणारीच असेल.       

याविषयीचा आपला अनुभव सांगताता सुलक्षणा नाईक म्हणतात, ‘आम्ही रणजी सारख्या राष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा खेळायला जायचो. तेव्हा दुय्यम दर्जाची पिच मिळायची. आणि राहण्या जेवणाची व्यवस्थाही अशी तशीच असायची. रेल्वेमध्ये नोकरी करत असल्यामुळे आम्हाला जो भत्ता मिळायचा त्यावर आम्ही आमची सोय करायचो. पण, आता या सगळ्या सुविधा महिलांना हक्काने मिळतील. चांगला सपोर्ट स्टाफ मिळेल,’ सुलक्षणा यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.       

महिला क्रिकेटला हक्काचे प्रेक्षक     

WPL च्या प्रसारणासाठी स्पोर्ट्स 18 या डिजिटल प्रसारण वाहिनीने 2023 ते 2027 च्या हंगामांसाठी मिळून 961 कोटी रुपये मोजून प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. म्हणजेच एका मॅचवर ते साडे सात कोटी रुपये खर्च करणार आहेत.  त्यांना असं वाटतंय की, WPL प्रेक्षकांमध्येही हिट ठरेल. असा पाठिंबा महिला क्रिकेटसाठी आवश्यक आहे. कारण, प्रसारण यशस्वी करण्यासाठी म्हणजेच मॅचेसना प्रेक्षक आणण्यासाठी आता एक यंत्रणा कामाला लागेल.   

बीसीसीआयलाही वाटतंय प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद असेल. एरवी महिला क्रिकेटला प्रेक्षक जमवावे लागतात. पण, आता नवीन खेळाडू ताज्या दमाच्या आहेत. आणि त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षक आणण्याची जबाबदारी काही अंशी बीसीसीआय आणि फ्रँचाईजींनी घेतलीय.       

गेल्याच वर्षी बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महिला क्रिकेटर्सना आंतरराष्ट्रीय मॅचेससाठी आता पुरुषां इतकंच मानधन मिळतं. पुरषांना जसं श्रेणीवार मानधन आहे तशाच श्रेणी महिलांसाठीही आहेत. आणि सर्वोत्तम मानधन आहे टेस्टसाठी 15 लाख रुपये.       

थोडक्यात. महिला क्रिकेटरच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न होत आहेत. महिलांनीही दमदार आंतरराष्ट्रीय कामगिरी करून आपला हक्क सिद्ध केला आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या टीमने सेमी फायनलपर्यंत मजल मारली.       

आता प्रश्न आहे तो महिलांच्या आंतरराष्ट्रीय मॅचेसमध्ये वाढ होण्याचा. आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मिळणाऱ्या मोबदल्याच्या तुलनेत राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या महिलांनाही चांगला मोबदला देण्याची. WPL हे त्या दृष्टीने टाकलेलं एक दमदार पाऊलच आहे. एकसमान वेतन आणि व्यावसायिक लीग या महिला क्रिकेटसाठी घडलेल्या दोन चांगल्या गोष्टी आहेत.