• 09 Feb, 2023 08:38

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JPMorgan Bank Duped : 'या' जगप्रसिद्ध अमेरिकन बँकेला त्यांनी बेमालूम बनवलं!

JPMorgan Bank

Image Source : www.euronews.com

JPMorgan Bank Duped : बँक घोटाळे आपल्याला नवीन नाहीत. भारतातले सगळे घोटाळे हे साधारणपणे कर्ज बुडवण्याचे आहेत. पण, अमेरिकेतल्या जेपी मॉर्गन बँकेलाही भामट्यांनी हातोहात फसवलंय. आणि बँकेला अलीकडे फसवणूक मान्यही करावी लागलीय. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया…

जे पी मॉर्गन (JPMorgan Bank) ही अमेरिकेतली एक अव्वल बँक तसंच वित्तीय संस्था (Financial Organization). पण, अलीकडेच या बँकेनं एका वेबसाईटने त्यांना फसवल्याची कबुली दिली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) या विषयीची बातमी दिली आहे. 2021 मध्ये झालेला हा घोटाळा मजेशीर म्हणावा असाच आहे. जे पी मॉर्गन संस्थेनं संशोधन करून विकत घेतलेल्या फ्रँक (Frank Website) या वेबसाईटने त्यांना चक्क बनवलंय . काय आहे हे प्रकरण समजून घेऊया…    

जे पी मॉर्गन बँकेनं फ्रँक वेबसाईट का विकत घेतली?  

2021 मध्ये जे पी मॉर्गन कंपनीने फ्रँक ही वेबसाईट 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका दाम मोजून विकत घेतली. फ्रँक ही वेबसाईट कॉलेज शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज देऊ करणारी वेबसाईट आहे. मुलांना कर्जासाठी अर्ज करण्यापासून प्रत्येक टप्प्यावर ही वेबसाईट मदत करायची.    

जे पी मॉर्गन वेबसाईटने मूळात फ्रँक वेबसाईट विकत घेण्याचा घाट का घातला अशी चर्चा तेव्हाही झाली होती. पण, बँकेचा उद्देश वेगळा होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुलं तरुण असतात. त्यांना तरुण वयात आर्थिक सल्ला दिला तर त्यांच्या पुढच्या आर्थिक टप्प्यांवरही त्यांच्याशी जोडले जाऊ असा जे पी मॉर्गन बँकेचा होरा होता. आणि शिक्षणासाठी मदत झालेल्या बँकेला कुणी विसरत नसतं हा त्यांचा अंदाज होता. म्हणजेच तरुण ग्राहकांना आपलंसं करण्यासाठीच जे पी मॉर्गन बँकेनं वेबसाईट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता.    

म्हणूनच जे पी मॉर्गन बँकेनं फ्रँक वेबसाईटशी मोठी रक्कम मोजून हा करार केला. जेव्हा वेबसाईट त्यांनी विकत घेतली तेव्हा तिचे 10 लाखांच्या वर ग्राहक होते. फ्रँक हा एक स्टार्टअप प्रयत्न होता. आणि चांगली गुंतवणूक मिळवून तो विकून टाकायचा असा स्टार्टअप मालकांचा प्रयत्न होता. फ्रँक वेबसाईटची संस्थापक होती चार्ली जेव्हिस नावाची एक महिला.    

पण, तिनेच जे पी मॉर्गनला बनवलं. कसं ते पाहा.    

जे पी मॉर्गन बँक का फसली?   

चार्ली जेव्हिसकडून जे पी मॉर्गनने फ्रँक विकत घेतली तेव्हा वेबसाईटचे 10 लाखांच्यावर सबस्क्राईबर होते. म्हणजे इतक्या लोकांना वेबसाईट शैक्षणिक कर्जं मिळवण्यासाठी मदत करत होती. पण, प्रत्यक्षात यातले जेमतेम 3 लाख विद्यार्थीच सक्रिय होते. म्हणजे शिक्षण घेणारे किंवा त्यासाठी कर्ज मिळवायला उत्सुक होते. बाकी विद्यार्थी चक्क फ्रॉड किंवा सदस्य संख्या वाढवण्यासाठी जोडलेले होते.    

हीच बँकेची फसवणूक झाली. आपले पुढचे ग्राहक म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बँक टारगेट करत होती, ते विद्यार्थीच अस्तित्वात नसल्याचं बँकेला अलीकडे लक्षात आलं.    

आणि असं असताना या वेबसाईटसाठी जे पी मॉर्गन कंपनीने तब्बल 175 दशलक्ष अमेरिकन डॉलर मोजले होते. विशेष म्हणजे, चार्ली जेव्हिस जे पी मॉर्गनसाठीही त्या वेबसाईटचं काम पाहात होती. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेली चूक लक्षात आल्यावर जे पी मॉर्गन कंपनीने जेव्हिसला कामावरून काढून टाकलं. जेव्हिसने आपली स्टार्ट अप कंपनी विकण्यासाठी 10 लाख सदस्यांचं बनावट चित्र आपल्यासमोर उभं केल्याचा जे पी मॉर्गन बँकेचा आता आरोप आहे. तशी रितसर तक्रारच त्यांनी केली आहे. काहीच दिवसांपूर्वी फ्रँक हा फ्रॉड असल्याचा आरोप त्यांनी ब्लूमबर्ग मीडिया कंपनीबरोबरच्या एका चर्चे दरम्यान केला. आणि तिथून ही बातमी उघड झाली.