• 27 Mar, 2023 06:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ChatGPT च्या मदतीने ‘या’ उद्योजकाने मिळवलं 90,00,000 रुपयांचं थकित देणं

ChatGPT

Image Source : www.bloomberg.com

ChatGPT चा असाही उपयोग एका उद्योजकाला झाला. त्याचा एक ग्राहक अनेकदा विनंती करूनही कामाचे पैसे त्याला देत नव्हता. शेवटी या उद्योजकाकडे एकच पर्याय होता ग्राहकाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा. पण, त्यापूर्वी त्याने एक हटके उपाय करून बघायचं ठरवलं. त्याने ChatGPTची मदत घेतली. पुढे काय घडलं ते बघा!

ChatGPT हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. लोकांमध्ये कुतुहलाचा विषय तर नक्कीच आहे. आता अमेरिकेतल्या एका घटनेवरून चॅटजीपीटीचा एक वेगळाच उपयोग समोर आला आहे.      

वेबसाईट डिझायनिंगच्या क्षेत्रात असलेले ग्रेग आयसेनबर्ग यांनी चॅट जीपीटीचा आपला अख्खा अनुभव ट्विटरवर लिहिलाय. आणि हे ट्विट आतापर्यंत जगभरात 36 लाख लोकांनी पाहिलंय. लाईक्स, रिट्विट्सची गणतीच नाही.      

आपल्या ट्विटमध्ये आयसेनबर्ग म्हणतात, ‘ग्राहकाकडून 109,500 अमेरिकन डॉलर मी कसे वसूल केले, वकिलाला एक छदामही न देता, याची ही कहाणी.’     

आपणही ती कहाणी ऐकूया…     

आयसेनबर्ग यांच्या वेबसाईट आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट डिझायनिंग कंपनीने एका मोठ्या ब्रँडसाठी डिजिटल डिझायनिंग करून दिलं. कंपनीला त्यांचं काम आवडलं म्हणून पुढच्या वर्षभरात आयसेनबर्ग यांच्याकडेच त्यांची इतरही कामं येत गेली, असं आयसेनबर्ग यांनी लिहिलंय.      

पण, साधारण वर्षभरानंतर आयसेनबर्ग यांच्या कंपनीबरोबरचा ईमेल पत्रव्यवहार त्या कंपनीने अचानक थांबवला. हळूहळू कारण लक्षात आलं, त्यांना पैसे द्यायचे नव्हते. मग आयसेनबर्ग यांच्या वित्त विभागाने आपली ईमेलमधली भाषा थोडी जास्त कडक केली. पण, तरीही उपयोग झाला नाही. शेवटी कंपनीच्या ऑपरेशन्स आणि वित्त विभागाने आयसेनबर्ग यांनाच काय तो निर्णय घ्या असं सांगितलं.      

आणि इथं आयसेनबर्ग यांना एक वेगळीच कल्पना सुचली. ते म्हणतात, ‘मी आणखी एक ईमेल पाठवला असता ती त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं असतं, हे उघड होतं. मला अचानक सुचलं ChatGPT चा वापर केला तर? मी चॅट जीपीटीला म्हटलं, माझ्यासाठी असा धमकी वजा ईमेल लिहून दे,’ आयसेनबर्ग यांनी ट्विटर थ्रेडमध्ये ही सगळी माहिती इत्थंभूत दिली आहे.      

पुढच्या थ्रेडमध्ये आयसेनबर्ग यांनी चॅट जीपीटी आणि वकिलाची फी यांची तुलनाच केली आहे. ते म्हणतात, ‘ChatGPT चा खर्च - 00 आणि वकिलाचा फक्त नोटील पाठवण्याच खर्च - 1,000 अमेरिकन डॉलर!’      

विशेष म्हणजे चॅट जीपीटीने पाठवलेल्या ईमेलचा उपयोग झाला आणि ग्राहकांनी त्यांचे पैसे परत दिले.      

ChatGPT ने कसा लिहिला ईमेल?      

तुम्हाला हे जाणून घ्यायची उत्सुकता नक्की असेल की, ChatGPT ने नेमकं काय केलं. त्यावर आपल्या थ्रेडमध्ये आयसेनबर्ग लिहिलात, ‘सुरुवातीला मनात धाकधुक होती. बरोबर करतोय ना, असं वाटत होतं. पण, म्हटलं चूक झाली तर अनुभव तरी मिळेल. मला कशाप्रकारचा ईमेल हवाय हे मी चॅट जीपीटीला सांगितलं. आणि त्याने दिलेल्या ड्राफ्टमध्ये थोड्या सुधारणा करून मेल पाठवून दिला.’      

आयसेनबर्ग यांचा अख्खा थ्रेड त्यांनी 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी असे दोन दिवस लिहिलाय. आणि यात एकूण 15 वेगवेगळे मेसेज आहेत.      

त्यांनी चॅट जीपीटीला ईमेल लिहिण्यासाठी दिलेली माहिती अशी होती,      

‘तू एका कंपनीच्या वित्त विभागात काम करतोस अशी कल्पना कर. तुझ्या XYZ ग्राहकाने पाच ईमेल नंतरही तुम्हाला कामाचे पैसे दिलेले नाहीत. अशा ग्राहकाने घाबरावं असा एक ईमेल लिहून दे. आमचे थकित 109,500 अमेरिकन डॉलर त्यांच्याकडून परत माग. त्यांची पाच महिन्याची बिल थकलेली आहेत. आणि पाच ईमेलना त्यांना काहीही उत्तर दिलेलं नाही.’     

आणि त्यानंतर चॅट जीपीटीने त्यांना दिलेलं उत्तरही त्यांनी एका थ्रेडमध्ये दिलंय.      

चॅट जीपीटीने आपल्या प्रस्तावित ईमेलमध्ये एका परिच्छेदात लिहिलं होतं, ‘यापूर्वीच्या ईमेलकडे तुम्ही केलेलं दुर्लक्ष आणि आमची थकवलेली रक्कम पाहता, आम्हाला आता कडक पावलं उचलण्यावाचून पर्याय दिसत नाही. पुढच्या तीन दिवसांमध्ये आमचं पेमेंट झालं नाही तर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आणि त्यामुळे तुमच्या मार्केटमधल्या प्रतिमेलाही धक्का बसू शकतो.’     

या खरमरीत ईमेल नंतर समोरून कंपनीचं उत्तर आलं,      

‘चला. तुमचे पैसे आजच देऊन टाकू!’     

आयसेनबर्ग यांना हायसं वाटलं. आणि त्या उत्साहात त्यांनी आपल्या ट्विटर थ्रेडमध्ये चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा याचं प्रात्यक्षिकच दिलं.      

How to use ChatGPT
Source : Twitter

ChatGPT चा व्यावसायिक वापर      

आयसेनबर्ग यांनी आपला अनुभव लोकांशी इतक्या विस्तृत थ्रेडमध्ये वाटल्यामुळे लोकांचा फायदाच होणार आहे. पण, चॅट जीपीटी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या AI ओपन कंपनीचं या ट्विटवर लक्ष गेलं तर आयसेनबर्ग यांच्याबद्दल कंपनी काय विचार करेल ते सांगता येत नाही.      

कारण, चॅट जीपीटी या चॅटबॉटचा व्यावसायिक वापर करण्यावर बंदी आहे. तुम्ही एखाद-दुसऱ्या कामासाठी त्याचा वापर करू शकता. पण, घाऊक प्रमाणावर त्याची मदत घेऊ शकत नाही.      

त्यामुळे एकतर, आयसेनबर्ग यांच्या प्रयोगामुळे चॅट जीपीटीची जाहिरातच होतेय असं समजून कंपनी आयसेनबर्ग यांना जवळ करेल. किंवा व्यावसायिक वापरासाठी त्यांना ‘धमकीवजा ईमेलही’ पाठवू शकते!     

सध्या चॅट जीपीटीच्या व्यावसायिक वापरासाठी सबस्क्रिप्शन फी लागू होते. अमेरिकेत ती महिन्याला 42 डॉलर इतकी आहे. तर भारतात ही किंमत 3,500 च्या घरात जाते. आपण चॅट जीपीटीच्या प्रो म्हणजे व्यावसायिक व्हर्जन बद्दल बोलतो आहोत.      

थोडक्यात, येणाऱ्या दिवसांमध्ये चॅट जीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अॅपमुळे उद्योगधंद्याशी संबंधितही अनेक गोष्टी बदलणार आहेत.