• 27 Mar, 2023 06:42

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Mass Lay-off : गुगलने कामावरून काढलं, त्याने समदु:खींना घेऊन स्वत:ची कंपनी केली स्थापन

Google Mass Lay-off

Image Source : www.businesstoday.in

Google Mass Lay-off : एरवी हेन्री कर्क कुणाला माहीतही नसता. पण, अलीकडे लिंक्ड-इन वरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो गाजतोय. गुगलने काढून टाकल्यावर जिद्दीने पेटून उठत त्याने आपल्यासारखीच वेळ आलेल्या सहकाऱ्यांबरोबर स्वत:ची कंपनी स्थापन केलीय.

‘माझ्याकडे फक्त 52 दिवस आहेत!’    

अशी एक लिंक्ड-इन पोस्ट दोन आठवड्यांपूर्वी पडली. सुरुवातीला कुणाचं लक्ष गेलं नाही. पण, हळूहळू सोशल मीडियावरही ती गाजायला लागली. आणि मग हेन्री कर्कची कहाणी जगासमोर आली.     

हेन्री कर्क गुगलच्या एरिझोना कॅम्पसमध्ये आठ वर्षं काम करत असलेला वरिष्ठ अभियंता आहे (Senior Engineer). पण, जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गुगलने एकूण 12,000 लोकांना कामावरून काढून टाकलं . त्यातलाच एक आहे कर्क.     

त्याला तीन मुलंही आहेत. त्यांचा फोटोही त्याने आपल्या पोस्टमध्ये टाकलाय.     

Henry Kirk to Start New Business After google Layoff
Source : LinkedIn/Henry Kirk/

पण, जवळ जवळ 200 शब्दांची लिंक्ड-इन पोस्ट टाकण्या मागे त्याचा हेतू वेगळा होता. त्याच्या बरोबर गुगलमधून गच्छंती झालेल्या सहा जणांना बरोबर घेऊन कर्कने चक्क एक नवीन कंपनी स्थापन केलीय. आणि ती उभारण्यासाठी त्याला तंत्रज्ञांची आणि नव्या क्लाएंट्स म्हणजे ग्राहकांची गरज आहे. म्हणून या पोस्टचा खटाटोप त्याने केलाय.     

कर्ककडे फक्त 52 च दिवस का?    

साधारणपणे, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जगातली सगळ्यात मोठी टेक कंपनी गुगलने जागतिक स्तरावर 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यांचं नाव या यादीत होतं त्यांना कंपनीकडून मध्यरात्री ईमेल गेले. अनेकांनी ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाहिले.     

हेन्री कर्क हे त्यातलेच एक होते. आठ वर्षांच्या सेवेनंतर ही वेळ आल्यामुळे ते दु:खातच होते. पण, त्यांच्या मनाने एक वेगळाच निर्धार केला. त्यांच्या बरोबरच्या अनेकांना त्यांनी गळ घातली स्वत:चा उद्योग सुरू करण्याची. आधीच टेक कंपन्यांसाठी दिवस बरे नाही आहेत. फक्त गुगलच नाही तर मेझॉन, पल, ट्विटर, मेटा, मायक्रोसॉफ्ट अशा सगळ्याच कंपनीत नोकर कपात होतेय. अशावेळी नवीन कंपनीत गुंतवणूक करण्याची कल्पना घरातही अनेकांना मान्य नव्हती.     

म्हणून कर्क यांच्या मते त्यांनी आणि त्यांच्या नव्या टीमने स्वत:वर एक निर्बंध घालून घेतलाय. गुगलने कामावरून कमी करताना सगळ्यांना दोन महिन्याचा नोटीस कालावधी दिलाय. ते 60 दिवस त्यांच्या हाताशी आहेत. या साठ दिवसांत काहीतरी नवं करून दाखवण्याची जिद्द त्यांनी बाळगलीय.     

आपल्या लिंक्ड-इन पोस्टमध्ये कर्क म्हणतात, ‘सध्याचे दिवस खराब आहेत. माझे नवे भागीदार आणि त्यांचे कुटुंबीय यांनी मला 56 दिवस दिले आहेत. या दिवसांत आमची नवीन कंपनी उभी राहिली पाहिजे. नाहीतर आम्ही सगळे पुन्हा नव्या नोकरीच्या मागे लागू.’    

LinkedIn post by Henry Kirk
Source : LinkedIn

कर्क यांची ही पोस्ट आता अमेरिकेबाहेरही व्हायरल झाली आहे. आपल्या बरोबर आलेल्या साथीदारांचा उल्लेख त्याने #xooglers (Ex-googlers) म्हणजे माजी गुगलर्स असा केलाय. आणि यात त्यांचे पाठीराखेच खूप आहेत. हेन्री कर्क नेमका कसला उद्योग करणार आहेत?     

स्वत:चा डिझायनिंग स्टुडिओ   

कर्क आणि त्याच्या सहकाऱ्यांना न्यूयॉर्क तसंच सॅनफ्रान्सिस्को या दोन शहरांमध्ये वेबसाईट, प्स तसंच कुठल्याही डिजिटल प्रॉपर्टीसाठी डिझाईन आणि संशोधन करून देणारा स्टुडिओ उभारायचा आहे. आणि संस्था सुरू करण्याचं काम उरलेल्या एका महिन्यात करण्याचं त्यांनी ठरवलंय.     

‘स्टार्ट अप्सना फंडिंग मिळवायचं असतं, डिजिटल प्रॉपर्टी उभी करणाऱ्याला अभियांत्रिकी बाजू माहीत नसते. अशा सगळ्यांना आम्ही आमच्या अनुभवातून मदत करू. आम्ही अख्ख्या उद्योगाचं डिझायनिंग करून देऊ,’ असं कर्कने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.     

आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनी उभी करण्यासाठी नवे तंत्रज्ञ आणि नव्या ऑर्डर यासाठी लोकांना आवाहन केलं आहे. दोन आठवडे या पोस्टला झाले. आणि आतापर्यंत 10,000 च्या वर लोकांनी कर्कला शुभेच्छा दिल्या आहेत. तर 962 लोकांनी त्याचा उत्साह वाढवणाऱ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी उद्योगाची चौकशीही केली आहे!     

पण, टेक कंपन्या आधीच मंदीचा सामना करत असताना कर्क यांनी उचललेलं पाऊल प्रवाहाविरोधात आहे की, बरोबर आहे?     

‘गुगल कंपनी सोन्याची बेडी’   

जेनिफर बार्थ या 54 वर्षीय एका महिलेनं कामावरून काढल्यावर असं म्हटलं होतं. ‘गुगलमध्ये मिळत असलेला पगार, भत्ते आणि सुविधा या सोन्याची बेडी ठरल्या. समोर भवितव्य दिसत असूनही मी बाहेर पडण्याचा रस्ता शोधलाच नाही.’     

जेनिफर यांची ही मुलाखतही अमेरिकेत गाजली होती.     

कर्क यांचा उपक्रम समजून घेतल्यानंतर भारतात स्टार्टअपसाठी फंडिंग उभं करणारे आणि स्वत: एक तरुण उद्योजक असलेले प्रताप काकरिया यांनी जेनिफर यांच्याच वक्तव्यावर बोट ठेवलं.     

‘खासकरून मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये स्वत:चं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा नेहमीच असते. मोठ्या कंपनीत अनुभवही सर्व प्रकारचा मिळतो. पण, धंद्याची जोखीम घ्यायला मन धजत नाही. आणि निर्णय घ्यायला उशीर होत जातो. कधी कधी वेळ टळून जाते,’ काकरिया यांनी बोलायला सुरुवात केली.     

आपल्याकडे कौशल्य असेल आणि नवीन कल्पना असतील तर धंद्यात उडी घ्यायला हरकत नाही, असं काकरिया यांचं म्हणणं आहे.     

पण, आता टेक कंपन्यांना आलेल्या वाईट दिवसांचं काय?     

त्यावर काकरिया यांचं उत्तर आहे, ‘सगळे दिवस सारखे नसतात. कधी ना कधी सुरुवात करण्याला महत्त्व आहे. तुम्ही उभं करत असलेल्या उत्पादनाची चोख माहिती, ग्राहकांची गरज आणि किफायतशीर दाम यांचं गणित जमवता आलं तर तुम्ही उद्योगात सफल होऊ शकता.’      

कर्क आणि त्यांच्या साथीदारांना कमी दरात सेवा देता आली तर तो त्यांचा USP ठरेल असं काकरिया यांना वाटतं.     

सोशल मीडियावरची पोस्ट किती उपयोगाची?    

कर्क यांच्या लिंक्ड-इन पोस्टचं काकरिया यांनी कौतुकच केलं. ही पोस्ट फेसबुक किंवा इतर मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ऐवजी लिंक्ड-इनवर पडली याकडे त्यांनी लक्ष वेधलं.     

‘कर्क यांच्या पोस्टचं गांभीर्य त्यामुळे लक्षात येतं. कंपनी उभारताना त्यांनी नोकरी आणि कौशल्याशी संबंधित नेटवर्किंग साईट निवडली. यातून ज्या कमेंट्स किंवा प्रतिसाद असेल तर गंभीर स्वरुपाचा असेल. इतर साईट्सवर या पोस्टचा कदाचित वेगळा परिणाम झाला असता,’ असं काकरिया यांना वाटतं.     

इतकंच नाही तर उद्योग उभारताना सोशल मीडियाचं महत्त्वही मोठं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. उद्योग एकदा उभा राहिल्यावर त्याची जाहिरातही महत्त्वाची. आणि त्यासाठी योग्य माध्यम निवडणंही महत्त्वाचं.     

सुरक्षित नोकरी सोडून आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर स्वत:चा उद्योग सुरू करणं हे जोखमीचं नक्कीच आहे. पण, नेटाने प्रयत्न केले तर कदाचित हा प्रयत्नही यशस्वी होऊ शकतो.