लवकरच होळीचा सण येतोय. या निमित्ताने आपल्याला बाजारात पिचकाऱ्या, वेगवेगळे रंग यासारख्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण तुम्ही होळीसाठी सोन्या चांदीची पिचकारी किंवा बादली बाजारात मिळतीये असं कधी पाहिलंय किंवा ऐकलंय का? हो हे खरं आहे. नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊ शहरात एकत्र येऊन होळी खेळण्याची परंपरा आहे. याच निमित्ताने लखनऊ सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकाऱ्या पाहायला मिळत आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात.
इतकी असेल पिचकारी आणि बादलीची किंमत?
लखनऊमध्ये पहिल्यांदाच होळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या बादल्या आणि पिचकाऱ्या शहरातील सराफा बाजारात विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळत आहेत. अर्थात त्याची किंमत ऐकून तुम्हालाही ती खरेदी करावी का नाही, असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. कारण हल्ली सोन्या चांदीचे दर तर वाढतच चालले आहेत.
लखनऊ सराफ बाजारात या चांदीच्या पिचकारीची किंमत 2,000 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत पिचकारीच्या आकारानुसार वाढू किंवा कमी होऊ शकते. तर, चांदीच्या बादलीची किंमत 5,000 ते 30,000 रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे.
होळीच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात विक्रीसाठी आलेल्या सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या बादलीची किंमत तर लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे ही पिचकारी किंवा बादली तुम्ही एकदा खरेदी केल्यानंतर तिचा वापर पुढील अनेक वर्षे होळी खेळण्यासाठी करू शकता. कारण ती खराब होण्याची शक्यता फारच कमी आहे. विशेष म्हणजे लखनऊच्या सराफा बाजारात अशा पिचकाऱ्या आणि बादल्यांची खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग वाढली आहे. अनेक लोकांनी अॅडव्हान्स बुकिंगही करून ठेवले आहे.
आई-वडील मुलीला देतायेत भेट
लखनऊ येथे सार्वजनिक होळी खेळण्याची परंपरा आहे. त्यातच यंदा सोन्या, चांदीच्या बादल्या आणि पिचकारी खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. केवळ होळी खेळण्यासाठी या वस्तू न वापरता, काही आई-वडील त्यांच्या मुलीला लग्नानंतरच्या पहिल्या होळीला ही बादली, पिचकारी भेट म्हणून देत आहेत. त्यासाठी काहींनी अॅडव्हान्स बुकिंगही केले आहे. गेल्या काही वर्षांपासून लखनऊ सराफा बाजारात सोन्या चांदीच्या पिचकाऱ्या आणि बादल्या विक्रीसाठी येत होत्या, पण यावर्षी या वस्तूंची मागणी वाढली आहे, असं सराफा चौक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदिश जैन यांनी सांगितले आहे.