• 27 Mar, 2023 06:23

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Handle Money? : आदिवासी लहान मुलांना पैशाचे व्यवहार समजावेत म्हणून ‘या’ शाळेनं भरवली ‘दुकान जत्रा’

Financial Literacy For Kids

How to Handle Money? : लहानपणापासूनच मुलांना पैसा हाताळायला शिकवलं पाहिजे असं जाणकार म्हणतात. पैसा ही दैनंदिन आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यातल्या संस्थेनं उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी चक्क दुकान जत्राच भरवली.

डोक्यावर टळटळीत ऊन, सूर्य माथ्यावर आलेला. आणि अशावेळी रस्त्याच्या कडेला तात्पुरती शेड उभारून 20-30 मुलं आपली छोटेखानी दुकानं उघडून बसली होती. दुकानं कसली? मांडी घालून रांगेत बसलेली ही मुलं आपल्या पुढे वर्तमानपत्राचे मोठे कागद ठेवून त्यावर वस्तू आणि भाज्या मांडून बसली होती.         

इथं भरलेल्या या ‘दुकान जत्रे’विषयी एका मित्राने कल्पना दिलेली होती. त्यामुळे मी तयारीत होते. पहिल्याच दुकानात हेमांगी नावाची चुणचुणीत मुलगी होती. मी तिच्याकडून शंकरपाळ्यांची दोन छोटी पाकीटं वीस रुपयांत विकत घेतली. पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यावर ती मला थँक यू म्हणाली. आणि पुढे असंही म्हणाली की, ‘पुन्हा या.’ तिने दुकानात ठेवलेल्या शंकरपाळ्या आईने बनवल्यात, पण कापायला तिने मदत केलीय असंही आवर्जून सांगितलं.         

हेमांगी बोलताना थँक यू, वेलकम असे इंग्रजी शब्द लिलया वापरत होती.        

Financial Literacy for Kids
Image Rights : mahamoney.com

पुढच्या दुकानात थोडा मोठा सिद्धेश आपल्या मित्रांबरोबर बसला होता. त्याने वाफवलेल्या शेंगा वीस रुपयाला एक पाकीट असं मला सांगितलं. मी त्याच्याकडे दोन पाकीटं मागितली. पण, मला वीस रुपयाला दे असं सांगितलं. तो थोडासा गडबडला. ‘चाळीस रुपये,’ असं काहीसं पुटपुटला. शेवटी त्याची घालमेल बघून अकरावीतली त्याची शाळेतली ताई त्याच्या मदतीला आली. तिने मोठ्या आवाजात त्याला सांगितलं काय उत्तर द्यायचं ते. मलाही घासाघीस करायची नव्हतीच. त्यामुळे आमचा सौदा पार पडला.        

बोलताना अडखळणारा सिद्धेश आकडेमोडीत मात्र चोख होता. त्याने माझ्याकडून पन्नास रुपये घेऊन झटपट मला दहा रुपये परत दिले. आपला किती माल खपला हे ही त्याने वहीत नीट अक्षरात लगेच लिहून काढलं.        

Financial Literacy for Kids
Image Rights : mahamoney.com

हे अनुभव मुद्दाम इतके सविस्तर लिहिले. कारण, ही तीन मुलंच काय तर त्यांच्या इतर सवंगड्यांचीची पार्श्वभूमी आपल्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. ही मुलं पालघर जिल्ह्यात मासवण या आदिवासी भागातली आहेत. कुडाच्या घरात राहतात. आणि त्यांचे आई - वडील एकतर शेतात नाहीतर कारखान्यात मजुरी करतात.         

एरवी मुलं शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. पण, शाळा संपल्यावर आठवड्यातून किमान 3-4 दिवस आदिवासी सहज शिक्षण परिवार या संस्थेनं आयोजित केलेल्या खेळघरांमध्ये जातात. आणि या खेळघरानेच मुलांना आर्थिक शिक्षण आणि व्यवहार ज्ञान मिळावं म्हणून ही दुकान जत्रा भरवली होती.         

आठ वर्षाच्या मुलांच्या हातात जेव्हा पैसे येतात…       

एरवी मुलं पालकांच्या सांगण्यावरून दुकानातून वस्तू आणण्याचं काम करतच असतात. पैसे त्यांना नवीन नसतात. पण, अनेकदा दुकानदार ओळखीचा असतो. त्यामुळे हे व्यवहार खेळी मेळीत पार पडतात.         

इथं मात्र दुकान जत्रेचा प्रयोग मुलांनी पैसे जबाबदारीने वापरावेत यासाठी होता.        

Financial Literacy for Kids

आदिवासी सहज शिक्षण परिवारचं हे मासवण केंद्र चालवणाऱ्या वर्षाताई या उपक्रमाबद्दल महामनी डॉट कॉमशी भरभरून बोलल्या. ‘पहिली ते चौथी इयत्तेची ही मुलं होती. त्यांना पैसे ओळखता येतात की नाही, तो मोजता येतात की नाही, हे आम्हाला पाहायचं होतं. आणि खरंतर त्यांना शिकवायचं होतं. कारण, मुलं घराबाहेर वावरतात, तेव्हा त्यांच्याकडे व्यवहार ज्ञान हवं. आणि पैसे हाताळणं हे एक प्रकारचं व्यवहार ज्ञानच आहे,’ वर्षाताई बोलत होत्या.         

मुलांना आर्थिक व्यवहार समजण्याबरोबरच ते करण्याचं बळ देणं हा उपक्रमाचा उद्देश होता.        

‘ही मुलं आदिवासी पाड्यात राहतात. आणि फारशी पाड्याबाहेरही पडत नाहीत. अशा मुलांमध्ये धीटपणा यावा, बाहेरच्या मुलांशी बोलताना ती गांगरू नयेत आणि त्याचवेळी पैशावरून त्यांची फसवणूक होऊ नये, इतकी या मुलांची तयारी व्हावी यासाठी हा उपक्रम होता,’ वर्षा ताई न थांबता बोलत होत्या.         

वर्षाताई म्हणाल्या त्याचा अनुभव मी पुढे घेतलाही. एका दुकानात लहानगी श्रुतिका साडी नेसून बसली होती. मी तिच्याकडून चिवड्याची पाकिटं घेतली पण, तिला म्हटलं मला गिफ्ट म्हणून दे! तिलाही कळत होतं मी तिची गंमत करतेय. पण, माझ्याशी बोलायला ती लाजत होती. मी पैसे मागून घे म्हटलं, तरी तिला मागता येईनात. मग शेवटी तिची ताई पुढे आली. आणि तिने सांगितल्यावर मात्र श्रुतिकाने माझ्याकडे लाजत लाजत का होईना पण, पैसे मागितले.         

सगळ्यात गोड म्हणजे, या पैशाचं काय करणार असं विचारल्यावर म्हणाली, ’तिघी वाटून घेणार!’ कारण दुकान चालवणं आणि पैसे हाताळणं या बरोबरीने दुकानाचं व्यवस्थापनही तिच्या खेळघराच्या ताईने तिला शिकवलं होतं.         

मुलांना कसं शिकवलं व्यवस्थापन?        

मासवण बरोबरच तांडेलपाडा, जाधव पाडा, डोंगरशेत, खोताडपाडा आणि बोडनपाडा अशा पाड्यांमध्ये सुरू असलेल्या खेळघरातली मुलं या उपक्रमात सहभागी झाली होती. मुलांच्या शाळेतल्या परीक्षा संपल्यावर खेळघराने त्यांना दोन दिवस दिले होते. आणि त्या दिवसांमध्ये वस्तू किंवा खाऊ स्वत: बनवायचा होता. आणि तो विकायचा होता.        

संस्था एकूण आठ पाड्यांमध्ये खेळघर चालवते. आणि त्यात अडीचशे ते तीनशे विद्यार्थी येतात. यातल्या पन्नास जणांची निवड या दुकान जत्रेसाठी झाली होती. आणि दुकान जत्रेसाठी मुलांना तयार करायचं काम खेळघरांची सगळी व्यवस्था पाहणारे प्रमोद गोवरी तसंच अनंत पवार यांच्यावर होती.        

Adivasi Sahaj Shikshan Parivar

मुलांबरोबर दुकान जत्रेसाठी काम करणारे प्रमोद गोवरी महामनीशी बोलताना म्हणाले, ‘हा नियोजित उपक्रम होता. मुलं दोन दिवसांत घरच्या घरी काय आणू शकतील, याचा अंदाज घेऊन त्यांना वस्तू निवडून दिल्या होत्या. आणि खेळघरात त्यांच्या बरोबर असणारी ताई या नियोजनात पुढे होती. जी वस्तू दुकानात ठेवलीय तिची माहिती मुलांना सांगता आली पाहिजे आणि हिशोबही करता आला पाहिजे इतकी मुलांची पूर्वतयारी आम्ही करून घेतली. काही अडलं तर ताई दुकानात बरोबर होतीच.’       

एक वाजता दुकान जत्रा संपल्यावर मुलांची निरीक्षणं काय होती?         

एका मुलाने प्रत्येक दहा रुपयांवर पाच रुपये नफा मिळाला असं सांगितलं.        

एका गटाला जाणीव झाली की, शेवग्याच्या शेंगा इथं सगळेच लोक घरी लावत असल्यामुळे त्या खपल्या नाहीत.        

लिंबू सरबत, सँडविच अशा खाण्याच्या वस्तू हातोहात खपल्या. ते बघितल्यावर ती मुलं म्हणाली ‘माल’ आणखी थोडा आणायला हवा होता.         

आता एवढी गर्दी झाली तर सणाच्या दिवसांत किती होईल? होळीला पुन्हा दुकान जत्रा भरवू.        

थोडक्यात, आठ वर्षं वयाच्या मुलांसाठी दुकान जत्रेचा अनुभव समृद्ध करणारा होता.