• 26 Mar, 2023 15:04

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Rewards to Employees : ‘या’ पाच कंपन्यांनी जगात ले-ऑफ सुरू असताना कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या गिफ्ट्स

Expensive Gifts

Expensive Rewards to Employees : एकीकडे मेटा, गुगल, ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागडी गिफ्ट्स दिली आहेत.

काही दिवसांपूर्वी देशातले सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी आपल्या खाजगी विमानात एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. या ज्येष्ठ कर्मचाऱ्यासाठी केकची सोयही त्यांनी आधीच केली होती. आणि केक कापण्याच्या कार्यक्रमात त्यांनी शेवटपर्यंत सहभाग घेतला.     

हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आपल्या मालकाने दाखवलेलं प्रेम बघून त्या ज्येष्ठ कर्मचाऱ्याच्या भावनाही अनावर झाल्या. आणि त्यांनी आधी अनंत अंबानी यांचे पायच धरले. अनंत अंबानी रिलायन्सचा महत्त्वाकांक्षी ऊर्जा उद्योग सांभाळणार आहेत.    

आपल्या मालक किंवा सीईओंनी केलेलं कौतुक कुणाला आवडत नाही. आणि खासकरून कॉर्पोरेट वातावरणात आजूबाजूला नोकर कपातीच्याच बातम्या येत असताना तर अशी एखादी बातमी सुखावणारीच आहे. अशा गिफ्टमधून कंपनीचं कर्मचाऱ्यांवरचं प्रेम तर दिसतंच . शिवाय कर्मचाऱ्यांना कामाची प्रेरणाही मिळते.     

तेव्हा आज बघूया मागच्या काही दिवसांत कुठल्या भारतीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या गिफ्ट्स दिल्या आहेत.     

केरळमधल्या IT कंपनीने कर्मचाऱ्याला दिली मर्सिडिझ    

केरळच्या कोची शहरात एक आयटी कंपनी आहे वेबअँडक्राफ्ट्स. दोनच आठवड्यांपूर्वी या कंपनीने आपले मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी क्लिंटन अँटोनी यांना सी क्लास मर्सिडिझ गाडी भेट दिली. निमित्तं होतं कंपनीला दहा वर्षं पूर्ण झाल्याचं.     

आणि वेबअँडक्राफ्ट्स कंपनी या वाटचालीत 4 कर्मचाऱ्यांवरून 320 कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली. म्हणूनच कंपनीचा पहिला कर्मचारी क्लिंटन यांचा अशा प्रकारे गौरव करण्याचा निर्णय संस्थापक आणि सीईओ अबिन जोस टॉम यांनी घेतला. अबिन जोस हे डिस्लेक्सिया आजाराचे रुग्ण आहेत. त्यांनी 19 व्या वर्षी या कंपनीची स्थापना केली.    

Company Gifted Mercedes to Employee
Source : thekashmirmonitor..net

केरळमधले ते सगळ्यात तरुण उद्योजक मानले जातात. क्लिंटन यांना मर्सिडिज देण्याच्या निर्णयाविषयी बोलताना जोस म्हणतात, ‘एक कर्मचारी जो पहिल्या दिवसापासून कंपनीबरोबर आहे. आणि त्याने कंपनीसाठी सर्वस्व दिलं आहे, त्याचा गौरव करण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्मचारी हाच आमच्या कंपनीचा कणा आहेत.’    

क्लिंटन अँटोनी आणि त्यांच्याबरोबर सगळ्यात जुने चार कर्मचारी असा एक फोटो सोशल मीडियावर तेव्हा व्हायरल झाला होता. या फोटोत अर्थातच मागे क्लिंटन यांना मिळालेली मर्सिडिझही आहे. मर्सिडिझ सी क्लास गाडीची किंमत भारतात 57 लाखांच्या पुढे आहे.     

त्रिध्या टेक कंपनीने 13 कर्मचाऱ्यांना दिल्या सेडान गाड्या    

गुजरातच्या अहमदाबाद इथं असलेली त्रिध्या टेक कंपनी तर अजून लिमिटेड कंपनी आहे. तिचं आयुष्य आहे उणपुरं पाच वर्षांचं. पण, कोव्हिडच्या काळात कंपनीला चांगला फायदा झालाय. आणि त्यातून झालेला नफा कर्मचाऱ्यांबरोबर शेअर करण्याचं कंपनीने ठरवलं.     

उत्कृष्ठ काम करणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांना कंपनीने मोठ्या कार भेट म्हणून दिल्या. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश मारंद यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, ‘कंपनीने आतापर्यंत मारलेली मजल ही पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे शक्य झाली आहे. त्यामुळे आम्ही कंपनीचं यश साजरं करण्याबरोरच कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान साजरं करण्याचं ठरवलं.’    

कंपनीने दिलेल्या गाड्या या मारुती सुझुकी कंपनीच्या आहेत. त्रिध्या टेक या कंपनीने मागच्या तीन वर्षांत आपला जम युरोप, आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियात बसवला. रिटेल, इन्श्युरन्स, आरोग्य तसंच ऊर्जा क्षेत्रात ही कंपनी आयटी सेवा पुरवते. कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या गाड्यांचं एकूण मूल्य समजू शकलं नाही.     

IT क्षेत्रातलं सगळ्यात मोठं गिफ्ट    

वरची दोन्ही उदाहरणं ताजी आणि अलीकडे घडलेली आहेत. पण, आयटी क्षेत्रातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उदाहरण गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात समोर आलं होतं. चेन्नईतल्या एका कंपनीने थोड्या थोडक्या नाही तर 100 कर्मचाऱ्यांना मोठ्या गाड्या भेट म्हणून दिल्या.    

या गाड्या विधीवत पूजा करून कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आल्या. Ideas2IT असं कंपनीचं नाव असून गेल्यावर्षी त्यांनी हा उपक्रम केला. कंपनीबरोबर दहा वर्षं किंवा त्याहून जास्त काळ असलेल्या लोकांना या कार देण्यात आल्या.    

कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष मुरली विवेकानंदन यांनी मीडियाशी बोलताना कर्मचाऱ्यांना कार देण्यामागची आपली भूमिका सांगितली. ‘कंपनीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून या कर्मचाऱ्यांनी घाम नाही तर आपलं रक्त या कंपनीला दिलंय. त्यामुळे या कार मी त्यांना देत नाहीए, त्यांनी त्या मिळवल्या आहेत,’ असं विवेकानंदन यांनी बोलून दाखवलं. Ideas2IT ही कंपनी आता 500 कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.     

येणाऱ्या काळातही कंपनीची जितकी प्रगती होईल तेवढा कर्मचाऱ्यांबरोबर तो नफा वाटला जाईल, असं विवेकानंदन यांनी स्पष्ट केलं आहे.     

किस-फ्लो कंपनीने पाच जणांना दिल्या BMW    

ही घटनाही गेल्यावर्षीची आहे. आणि चेन्नईच्या IT कंपनीची आहे. किस-फ्लो ही कंपनी आशियाई देशांना माहिती - तंत्रज्ञान सेवा पुरवते. कोव्हिडच्या काळात कंपनीवर बिकट आर्थिक परिस्थिती ओढावली होती.     

कंपनीच्या काही गुंतवणूकदारांनी ही कंपनी कोव्हिडनंतरच्या मंदीतून उठणार नाही, अशीच शक्यता वर्तवली होती. पण, कंपनीने संघर्ष केला. आणि आता मागच्या दोन वर्षात चांगली प्रगतीही केली आहे. हे यश साजरं करावं म्हणून कंपनीचे संस्थापक सुरेश संबंधम् यांनी वरिष्ठ व्यवस्थापकीय पदांवर काम केलेल्या पाच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची BMW कार भेट म्हणून दिली.    

या कर्मचाऱ्यांसाठी हे मोठं सरप्राईज होतं. कारण, भेट मिळण्याच्या काही तास आधीच त्यांना सांगण्यात आलं.     

संबंधम् यांनी पाच जणांचे आभार मानताना म्हटलं की, ‘कंपनीवर गेल्या पाच वर्षांत अनेक संकटं आली. प्रत्येक संकट पहिल्याहून मोठं होतं. पण, हे पाच जण माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून राहिले. त्यांच्या योगदानाची भरपाई मी करू शकत नाही.’   

हिरे व्यापारी दिवाळीवर खर्च करायचे 50 कोटी रु   

ही अलीकडची उदाहरणं झाली. पण, या सगळ्यावर कडी करणारं एक उदाहरण आहे सुरतचे हिरे व्यापारी हरी-कृष्णा एक्सपोर्टचे मालक सावजी ढोलकिया. हिरे उत्पादनाबरोबरच त्याच्या निर्यातीतही ते पुढे आहेत.     

2015 मध्ये ढोलकिया पहिल्यांदा प्रकाशझोतात आले जेव्हा त्यांनी 1,200 च्या वर कर्मचाऱ्यांवर दिवाळी बोनस म्हणून 50 कोटी रुपये खर्च केले. या पैशातून त्यांनी कर्मचाऱ्यांना बोनससाठी चार पर्यायच दिले होते. एक म्हणजे हिऱ्याचा नेकलेस, फियाट पन्टो गाडी, दोन बेडरुम असलेल्या घराचं डाऊन पेमेंट किंवा सोनं. यातली प्रत्येक गिफ्ट किमान चार लाखांची होती.     

आणि हे गिफ्ट मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ढोलकिया यांनी ठेवलेली एक लॉयल्टी टेस्ट फक्त पास करावी लागायची. 2015 मध्ये हा उपक्रम राबवल्यावर पुढची तीन-चार वर्षं त्यांनी दिवाळी बोनल देण्याचा मोठा कार्यक्रमच आयोजित केला. ढोलकिया यांच्या नंतर त्या काळात इन्फोसिस आणि HCL कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना अशा मोठ्या गिफ्ट्स देण्यासाठी कार्यक्रम केले.    

ढोलकिया यांना 2022 मध्ये केंद्रसरकारचा मानाचा पुरस्कार पद्मश्रीही मिळाला. पण, अलीकडे त्यांच्या कंपनीत दिवाळी पूर्वीसारखी साजरी होत नाही. दोन वर्षी झालेल्या गाजावाजानंतर आयकर विभागाचं लक्ष या कार्यक्रमाकडे गेलं. आणि त्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर मात्र ढोलकिया यांनी उत्साह आवरता घेतला. आणि पुढचे बोनस कार्यक्रम साधेपणाने साजरे केले.