Expensive Gifts To Sports Stars : फिफा वर्ल्ड कप 2022 जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आपल्या अख्ख्या टीमला सोन्याचा आयफोन गिफ्ट म्हणून दिला. त्यावर खेळाडूचं नावही लिहिलेलं आहे. भारतात कुठल्या खेळाडूला अशी गिफ्ट त्याच्या सहकाऱ्याने दिली आहे का?
कौतुक झालेलं आणि कौतुक म्हणून गिफ्ट मिळालेलं कुणाला आवडत नाही? अशा भेटवस्तूंमधून आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणाही मिळत असते. कामगिरी जर जागतिक स्तरावर असेल तर मिळणारी गिफ्टही अर्थातच, महागडी असणार. एखादा सिनेमा गाजल्यानंतर सिनेमाच्या दिग्दर्शकाने हीरोला दिलेलं गिफ्ट चर्चेचा विषय होतं.
तसंच एखादा खेळाडू मोठी स्पर्धा जिंकला की, त्याला मिळणाऱ्या महागड्या गिफ्टचीही चर्चा होते. गिफ्ट उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगाने दिली तर त्याचं मूल्य वेगळं. पण, अशी गिफ्ट जर आपल्याच टीममधल्या किंवा फिल्डमधल्या लोकांकडून मिळाली तर त्याचं मोल आणखी वेगळं. कारण, यात आपुलकी अधिक असते.
Lionel Messi ordered 35 gold-plated iPhone 14s for his teammates and coaching staff as gifts after winning the World Cup Final. 🏆📱🇦🇷 pic.twitter.com/s4mQER9C3j
मेस्सीने ॲपल कंपनीला ऑर्डर देऊन हे फोन बनवून घेतले हे उघड आहे. या निमित्ताने बघूया भारतात कुठल्या स्पोर्ट्स स्टारने कुणाला अशी महागडी गिफ्ट्स दिली आहेत. आणि त्या गिफ्टमध्ये काय विशेषता होती?
नीरज चोप्राने ऑगस्ट 2021 मध्ये ऑलिम्पिक गोल्ड जिंकून इतिहास घडवला. 23 वर्षांच्या नीरजने 87.57 मीटर लांब भालाफेक करून देशासाठी पहिलं अॅथलेटिक्स आणि ते ही गोल्ड मेडल जिंकलं. अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक गोल्ड जिंकलेला तो फक्त दुसरा खेळाडू होता. त्यामुळे त्याचं कौतुक झालं नसतं तरंच नवल.
नीरज स्वत: फक्त ‘घेणाऱ्यातला’ नाही तर ‘देणाऱ्यातलाही’ आहे. त्यामुळे जो भाला वापरून त्याने गोल्ड जिंकलं त्यातला एक भाला त्याने ल्युसानमध्ये असलेल्या ऑलिम्पिक संग्रहालयाला दान करून टाकलं. तर तेव्हा घातलेला टी-शर्ट आणि आणखी एक भाला त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला.
स्वत: नीरजला मिळालेल्या गिफ्ट्समध्ये खास होती ती क्रिकेटर सौरव गांगुलीने नीरजला दिलेला 1 कोटी रुपयाचा चेक. खरंतर हा सत्कार बीसीसीआयकडून झाला. पण, तव्हा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली होता. आणि त्यानेच ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना संस्थेकडून बक्षीस देण्याचा ठराव आग्रहाने संमत करून घेतला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नंतर ट्विट करून बीसीसीआयच्या या निर्णयाची माहिती दिली होती.
हा चेक घेतल्यानंतर नीरज चोप्राने, ‘एका अनुभवी खेळाडूने कामगिरीची ठेवलेली जाण अमूल्य आहे,’ असं म्हटलं होतं.
सचिनने सिंधू आणि साक्षीला दिली BMW
2016 साली ब्राझीलच्या रिओ दी जेनेरिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची महिला शक्ती दिसली. स्पर्धा संपायला अगदी शेवटचे दोन दिवस उरलेले असतानाही भारताच्या खात्यात एकही मेडल नव्हतं. पण, शेवटच्या दोन दिवसांत आधी साक्षी मलिकने आणि पुढच्या दिवशी पी व्ही सिंधूने मेडलची कसर भरून काढली.
साक्षीला 58 किलो वजनी गटात कुस्तीत ब्राँझ मिळालं. तर पी व्ही सिंधू सिल्व्हर जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरने आधीच सिंधूला वचन दिलं होतं, ‘ऑलिम्पिक मेडल जिंकलंस तर BMW देईल.’
हे वचन त्यांनी तंतोतंत पाळलं. आणि सिंधू, साक्षी आणि थोडक्यात ब्राँझ हुकलेल्या दीपा कर्माकरचा बॅडमिंटन असोसिएशनकडून जाहीर सत्कार झाला. तिथेच सचिनच्या हस्ते चौघांना BMW कार देण्यात आली.
Source : www.businesstoday.in
सिंधूने सचिनकडून कारची चावी घेतानाचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता. ती म्हणाली होती, ‘मी भारतात परतल्यानंतर मला फोन करणाऱ्यांपैकी सचिन एक होता. त्याने कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळची आठवण सांगितली. तेव्हा सचिनने ऑलिम्पिकमध्ये बाजी मारली तर आणखी मोठी कार देऊ असं म्हटलं होतं. आणि ह शब्द सचिनने पाळला. तो स्वत: BMW कारची चावी देण्यासाठी आला.’
सचिन तेंडुलकर BMW इंडिया कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे. त्यामुळे हक्काने त्याने सिंधूला BMW देण्याचं वचन दिलं होतं. कंपनीकडून त्याने हे वचन पाळलंही.
त्या सोहळ्यात, सचिनच्या हस्ते ऑलिम्पिक स्टार पी व्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांच्याबरोबरच बॅडमिंटन कोच पुलेला गोपीचंद यांनाही bmw देण्यात आली. सिंधूला दिलेली कार 37 लाख रुपयांची होती.
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी लतादीदींनी केली कन्सर्ट
आताचे क्रिकेटर करोडोंमध्ये मॅच फी घेतायत. पण, 1983 मध्ये परिस्थिती वेगळी होती. अलीकडेच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी तेव्हाची विदारक परिस्थिती सांगताना म्हटलं होतं की, ‘1983 च्या टीमला दिवसाचा हप्ता मिळत होता 200 रु.’ इतकंच नाही तर टीमने वर्ल्ड कप जिंकला. पण, बीसीसीआयकडे त्यांचं कौतुक करण्यासाठी पैसे नव्हते.
त्यांनी अख्ख्या टीमला मिळून दिले ते फक्त 25,000 रु.
ही परिस्थिती समजल्यावर गानकोकिळा लता मंगेशकर यांना वाईट वाटलं. त्यांनी आणि त्यांचे बंधू ह्रदयनाथ मंगेशकर यांनी तयारी दाखवली टीमसाठी कन्सर्ट आयोजित करण्याची.
सगळ्यांच्या मागे लागून लतादीदींनी खरंच 25 लाख रुपये जमा केले. आणि टीममधल्या प्रत्येक खेळाडूला एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला. या दिवसाची आठवण मन्सूरअली खान पटौडी यांच्या पत्नी शर्मिला टागोर यांनी अलीकडे सांगितली होती.
तर तेव्हाच्या टीमचे एक महत्त्वाचे खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनीही लतादीदींच्या क्रिकेट प्रेमाविषयी बोलून दाखवलं आहे. वेंगसरकर यांनी सलग तीन सेंच्युरी केल्या तेव्हा लतादीदींनी आपल्या लंडनच्या घरी त्यांना बोलावून छान जेवण दिलं होतं.
सायनाला ऑलिम्पिक ब्राँझनंतर मिळाली BMW
सिंधूला 2016 च्या यशानंतर सचिनच्या हस्ते BMW काल देण्यात आली होती. तसंच कौतुक सायना नेहवालचं लंडन ऑलिम्पिकच्या यशासाठी चार वर्षांपूर्वी झालं. आणि त्या ही वेळी करवते होते आंध्रप्रदेश बॅडमिंटन असोसिएशनचे तेव्हाचे उपाध्यक्ष चांमुंडेश्वरी नाथ.
BMW इंडिया कंपनीने ऑलिम्पिक पूर्वीच हे ठरवलं होतं. आणि कंपनीचा ब्रँड अँबेसिडर सचिन तेंडुलकरच्या डोक्यातून ही कल्पना आल्याचं म्हटलं जातं.
सायनाचा हैद्राबादमध्ये जाहीर सत्कार झाला. आणि सत्कारासाठी दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकर हजर होता. तेव्हा सायनाला मिळालेल्या मर्सिडिज 3 सीरिज गाडीची किंमत होती 33 लाख रुपये.
किंग कोहलीने घड्याळ देऊन केलं शुभमन गिलचं कौतुक
ही गोष्ट अगदी अलीकडची जानेवारी महिन्यातली आहे. 18 जानेवारी 2023 ला भारतीय टीमचा ओपनर शुभमन गिलने न्यूझीलंड विरुद्ध डबल सेंच्युरी ठोकली. या त्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन किंग कोहलीने शुभमनला एक महागडं घड्याळ भेट दिलं होतं.
ही गोष्ट एका इन्स्टाग्राम फोटोमुळे नुकतीच स्पष्ट झाली. शुभमनने आपला काळा शर्ट आणि काळी पँट घातलेला एक डार्क फोटो इन्स्टाग्रामवर टाकला होता. आणि त्या फोटोशुटची सगळी क्रेडिटही खाली दिली होती. तेव्हा विराट कोहलीने कमेंट करून लिहिलं की, घड्याळ कुणाची कर्टसी?
आणि शुभमननेही राजा माझ्यावर उदार झाला होता! असा प्रतिसाद दिला. त्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली. शुभमन आणि विराट सोशल मीडियावर एकमेकांशी अनेकदा असा संवाद साधताना दिसतात.
याशिवाय अलीकडेच के एल राहुलचं आथिया शेट्टीशी लग्न झालं त्या लग्नात राहुलला लग्नाची गिफ्ट म्हणून महेंद्रसिंग धोणी आणि विराट कोहलीने दिलेल्या गाड्यांचीही चर्चा झाली. पण, ती लग्नाची भेट असल्यामुळे इथं नोंद घेतलेली नाही.
Top 5 Books on Personal Finance: तुम्हालाही दैनंदिन आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणूक आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन करायचे असेल, तर काही पुस्तके नक्की वाचली पाहिजेत. यातून तुम्ही अर्थसाक्षर तर व्हालच सोबत श्रीमंतीचा मंत्रही तुम्हाला मिळेल.
Fixed Deposit: तेराव्याला येणारा खर्च मंदिरात दान करणे, वृद्धाश्रमात देणे, अनाथ आश्रमात देणे या सर्व बाबी तर ऐकल्यात पण आईच्या तेराव्याला येणारा खर्च टाळून चक्क गावातील 11 मुलींच्या नावाने फिक्स डिपॉजिट केले ही गोष्ट फार नवीन आहे. जाणून घेऊया सविस्तर..
Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत गावाचा विकास घडवून आणते. त्यासाठी लागणारा निधी कुठून आणि कसा येतो? किती येतो? याबाबत अनेकांना माहित नसते. त्याचबरोबर तो निधी पूर्ण वापरला गेला नाही तर काय करावे? याबाबत माहित करून घेऊया...