Daughters of Indian billionaires : देशात महिला उद्योजकांची संख्या मर्यादित असताना कौंटुबिक उद्योगाची धुरा आपल्या मुलीकडे देण्याची उदाहरणं तशी विरळच. पण, महिला दिनाच्या निमित्ताने देशातल्या सहा लेडी बॉसची ओळख खरून घेऊया ज्या कौटुंबिक व्यवसाय नीट सांभाळतायत
भारतात अजूनही कुटुंबाचा वारसा हक्क मुलींना मिळालाय असं खूप कमी वेळा होतं. आणि उद्योगजकही याला अपवाद नाहीत. मुलींचं लग्न लावतानाही रोटी-बेटी व्यवहार बघितला जातो. म्हणजे मुलींचं लग्न दुसऱ्या औद्योगिक घराण्यात करून देताना त्यात औद्योगिक विस्ताराचा विचार केला जातो. पण, प्रत्यक्ष मुलीला औद्योगिक हक्कं किती मिळतात? वडिलांचा उद्योग मुलीकडे नाही तर जावयाकडे सोपवल्याच उदाहरणं सापडता त. पण, मुलींकडे औद्योगिक वारसा अभावानेच येतो.
पण, हळूहळू ही परिस्थिती बदलतेय. आणि या बदलाची धुरा देशातली पिढीजात अब्जाधीश घराणी वाहतायत. अशी सात उदाहरणं बघूया जिथे आघाडीच्या उद्योगपतींनी आपल्या मुलांच्या बरोबरीने मुलींकडे व्यवसाय सोपवला. आणि मुली तो समर्थपणे सांभाळतायत .
मुकेश आणि नीता अंबानींची थोरली मुलगी ईशा अंबानी या यादीत सगळ्यात वर आहे. एकतर तिचे वडील सध्या देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांनी गेल्याच वर्षी आपल्या कौटुंबिक उद्योगाची पुनर्रचना करताना तीनही मुलांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
त्यानुसार, रिलायन्स जिओ या दूरसंचार आणि नवीन डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योग ईशाचा जुळा भाऊ आकाश अंबानीकडे गेला आहे. तर धाकटा अनंत अंबानी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उद्योग बघतो आहे. आणि ईशा अंबानीकडे रिलायन्स रिटेल या उद्योगाची जबाबदारी आली आहे.
ईशा ही जगातल्या उगवत्या अब्जाधीश महिलांच्या यादीत बाराव्या स्थानावर आहे. 1991 मध्ये मुंबईत जन्म झालेल्या ईशाने आपलं शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत पूर्ण केलं. आणि त्यानंतर अमेरिकेतल्या येल विद्यापीठातून तिने मानसशास्त्र आणि दक्षिण आशियाई अभ्यास या विषयातून स्नातक पदवी घेतली. पुढे स्टॅनफोर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठातून तिने MBA डिगरी घेतली आहे.
Source : starsunfolded.com
अमेरिकेत असताना BS अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर एक वर्षं तिने मॅकेन्सी अँड कंपनी या अमेरिकन वित्तसंशोधन करणाऱ्या कंपनीत काम केलं आहे. आपलं उच्चशिक्षण संपल्यावर 2015 मध्ये घरच्या रिलायन्स उद्योगात तिचा आणि तिचा जुळा भाऊ आकाश अंबानीचा अधिकृत प्रवेश झाला. आणि दोघंही कंपनीत संचालक पदावर रुजू झाले. ईशा तेव्हा 22 वर्षांची होती.
सुरुवातीपासून ईशा रिलायन्स रिटेल्सच्या कामात लक्ष घालत होती. आणि एजिओ हा ब्रँड विकत घेण्याचा अख्खा व्यवहार तिच्या नेतृत्वाखाली पार पडला. 2017 मध्ये आकाश आणि ईशाने एकत्र 4G सेवा देणारा जिओ फोन लाँच केला होता.
ईशा, वडील मुकेश अंबानी यांच्या जास्त जवळची आणि लाडकी मानली जाते. 2020 मध्ये ईशाचं आनंद पिरामल यांच्याशी लग्न झालं तेव्हा भावनाविवश झालेले मुकेश अंबानी सगळ्यांना दिसले होते. पण, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ईशा अनेकदा आपल्या आईबरोबर दिसते. आणि तिला उंची दागिने तसंच कपड्यांचा शौक आहे.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये ईशाची एकूण संपत्ती 4710 कोटी रुपये इतकी होती. ईशा, आकाश आणि अनंत रिलायन्स कंपनीकडून काही पगार घेतात का हे कधीच रिलायन्सकडून उघड करण्यात आलं नाही. पण, अशी चर्चा आहे की, तीनही अंबानी वंशज कंपनीकडून पगार घेत नाहीत. त्यांच्याकडे कंपनीचे शेअर मात्र आहेत. त्यांचे वडील मुकेश अंबानी संचालक म्हणून रिलायन्सकडून 15 कोटी वार्षिक पगार घेत होते.
2. निसा गोदरेज
निसाबा किंवा निसा गोदरेज ही आदी गोदरेज आणि परमेश्वरन गोदरेज यांची सगळ्यात धाकटी मुलगी. तिला तानिया दुबाष आणि पिरोजशाह गोदरेज अशी दोन भावंडं आहेत. सध्या 45 वर्षांची असलेली निसा गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्सची अध्यक्ष आहे.
तिचं शालेय शिक्षण मुंबईत कॅथेड्रल अँड जॉन कॅनन शाळेत झालं आहे. त्यानंतर वॉर्टन विद्यापीठातून तिने बॅचलर ऑफ सायन्सचं शिक्षण तर हार्वर्ड विद्यापीठातून MBA केलं आहे. भारतात परतल्यावर पहिल्या दिवसापासून निसा गोदरेजबरोबर काम करतेय. आल्या आल्या हार्वर्ड विद्यापीठातला आपला सहकारी मार्क कान्हला तिने गोदरेज अॅग्रोवेटमध्ये रुजू करून घेतलं. आणि पुढे निसाच्या कारकीर्दीची दिशा स्पष्ट झाली.
Source : www.wikibio.in
निसाने अॅग्रोव्हेट कंपनीची धुरा हातात घेतली. आणि शिवाय कंपनीतल्या अनेक अभिनव, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त औद्योगिक रणनिती ठरवणाऱ्या प्रत्येक उपक्रमात निसाचा सक्रिय सहभाग असायचा. अगदी HR विभागही निसाने पुढाकार घेऊन सांभाळला. गोदरेजमध्ये निसाला दूरदृष्टी असलेलं नेतृत्व अशी ओळख मिळाली आहे. 2018 मध्ये अधिकृतरीत्या निसाकडे कार्यकारी अध्यक्षपद चालून आलं.
गोदरेज कंपनीकडून निसाला 4.62 कोटी रुपये इतका पगार मिळतो. शिवाय गोदरेज कंपनीत तिचं शेअर होल्डिंग 2143 कोटी इतकं आहे. आणि शेअर्सच्या व्यतिरिक्त तिची इतर संपत्ती 1,150 कोटींच्या वर आहे.
3. नंदिनी पिरामल
नंदिनी पिरामल ही औषध क्षेत्रातली देशातली अग्रगण्य कंपनी पिरामल इंडस्ट्रीजची वारस आहे. अजय आणि स्वाती पिरामल यांची नंदिनी ही थोरली मुलगी. तिचा भाऊ आनंद पिरामलचा मुकेश अंबानींची मुलगी ईशाशी विवाह झाला आहे.
नंदिनीची आई स्वाती पिरामल ही स्वत: शास्त्रज्ञ आणि डॉक्टरही आहे. नंदिनीवर आईचा खूप मोठा पगडा आहे. आणि नंदिनीची अभ्यासातली कारकीर्दही आईसारखीच दैदिप्यमान आहे. तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून BA डिगरी घेतल्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातून MBA अभ्यासक्रम पूर्ण केला.
MBA करताना तिचा मुख्य विषय HR म्हणजे मनुष्यबळ विकास हा होता. आणि पिरामल इंडस्ट्रीतही तिने सुरुवातीपासून मनुष्यबळ विकास विभागात लक्ष दिलं. नंदिनीचं लग्न अमेरिकन नागरिक असलेल्या पीटर डी-यंगशी झालं आहे. आणि डी-यंगही घरच्याच पिरामल उद्योगात ग्लोबल फार्मा कंपनीत संचालक पदावर काम करतात. तर नंदिनी पिरामल उद्योगाची अध्यक्ष आहे.
Source : www.wikibio.in
नंदिनी पिरामल यांचं नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती कधीच बाहेर आली नाही. पण, पिरामल इंडस्ट्रीजचे जे दोन शेअर त्यांच्याकडे आहेत त्याची एकूण किंमत पाच कोटी इतकी आहे. आणि पिरामल इंडस्ट्रीजची एकूण संपत्ती 2.8 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.
4. स्मिती कनोडिया
स्मिती कनोडिया ही इस्सार ग्रुपच्या रुईया कुटुंबातली तिसरी पिढी. रवी आणि मधु रुईया यांची मुलगी स्मितीने कौटुंबिक उद्योगाच्या विस्तारात मोठी भूमिका निभावली आहे. इस्सार समुह ऊर्जा, धातू, पायाभूत सुविधा तसंच लॉजिस्टिक्स या क्षेत्रात कार्यरत आहे.
स्मिती यांनी या समुहात प्रिटिंग उद्योगाची भर घातली. आणि समुहातर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रिटिंग सेवा देणारी पॅप्रिका मेडिया ही कंपनी सुरू केली. या कंपनीतर्फे जगप्रसिद्ध टाईम आऊट हे नियतकालिक काढण्यात येतं.
आपल्या मराठी लोकांसाठी स्मिती यांची आणखी एक ओळख आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट स्मिती यांनी काढला होता. सिनेमाचे दिग्दर्शक होते परेश मोकाशी. स्मिती यांचं मॅट्रिक्स समुहाचे संचालक निशांत कनोडिया यांच्याशी लग्न झालं आहे.
स्मिती यांच्या एकूण मालमत्तेविषयी मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
5. तानिया दुबाश
उद्योजक आदी गोदराज आणि परमेश्वरन गोदरेज यांची सगळ्यात मोठी मुलगी. तानिया यांनी 2008 मध्ये गोदरेज कंपनीचं झालेलं रिब्रँडिंग आणि विस्तार यात खूप मोठी भूमिका बजावली होती. गोदरेज इंडस्ट्रीज, कन्झ्युमर प्रोडक्ट्स आणि अॅग्रोव्हेट या तीनही कंपन्यांच्या उभारणीवर त्यांचं जातीने लक्ष होतं.
Source : www.ndtv.com
सध्या या तीनही कंपन्यांच्या संचालक मंडळात त्या कार्यरत आहेत. तानिया यांचं लग्न उद्योजक अरविंद दुबाश यांच्याशी झालं आहे. डिसेंबर 2022 च्या आकडेवारीनुसार, तानिया यांची एकूण मालमत्ता 1,354 कोटी रुपये इतकी आहे.
6. वनिशा मित्तल
युकेतले भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मीकांत मित्तल यांची मुलगी वनिशा पहिल्यापासूनच कौंटुबिक उद्योगात लक्ष घालते. तिचे वडील लक्ष्मी मित्तल यांना स्टील किंग अशी ओळख मिळाली आहे. कारण, स्टील उद्योगातले ते नंबर वन उद्योजक आहेत.
2004 मध्ये वनिशा यांनी आर्सेनल-मित्तल समुहात पदार्पण केलं. आणि तेव्हापासून त्या संचालक मंडळात तर आहेतच. शिवाय मुख्य धोरण प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युरोपीयन बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी डिगरी घेतली आहे.
Source : www.riinternet.com
वनिशाला आर्सेनल - मित्तल कंपनीतून 1,71,000 अमेरिकन डॉलर इतका पगार मिळतो. तर त्यांची एकूण मालमत्ता 16 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. 2005 मध्ये वनिशाचं अमित भाटिया यांच्याशी लग्न झालं. वनिशाचे वडील लक्ष्मी मित्तल यांनी या लग्नासाठी तब्बल 60 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च केला होता.
7. अनन्या बिर्ला
या यादीतलं शेवटचं नाव हे इतर उदाहरणांपेक्षा वेगळं पण, तरीही नोंद घेण्यासारखं आहे.
अनन्या बिर्ला या यादीत बसत नाहीत. कारण, त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी चक्क आपला कौंटुंबिक उद्योग नाकारला. आणि लगेचच आपली स्वत:ची फिनटेक कंपनी सुरू केली.
देशातल्या तरुण उद्योजकांपैकी एक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. आणि सध्या अनन्या फक्त 28 वर्षांची आहे. देशातले सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले कुमारमंगलम बिर्ला आणि नीरजा बिर्ला यांची अनन्याश्री ही सगळ्यात मोठी मुलगी आहे.
बिझिनेस बरोबरच कला आणि अभिनयाचीही तिला आवड आहे. तिच्या कंपनीचं नाव आहे स्वतंत्र फिनटेक. 2022 मध्ये तिची एकूण मालमत्ता अंदाजे 13.6 अब्ज अमेरिकन डॉवर इतकी आहे.
हवीहवीशी वाटणारी वर्क फ्रॉम होम (Work from home) ही संकल्पना हळूहळू मागे पडत चालली आहे. आम्हाल वर्क फ्रॉम होमच हवं, असा आग्रह करणारे आणि अक्षरश: भांडणारे आता ऑफीस वर्कच्या प्रेमात पडले आहेत. वर्क फ्रॉम होमची संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली ती कोरोना महामारीनंतर (Corona pandamic). मात्र आता कर्मचाऱ्यांना ऑफीस खुणावू लागलं आहे. पाहूया, काय सांगतोय अहवाल!
Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.
Maharashtra Export: मागील सहा वर्षात महाराष्ट्रातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीत घसरण झाली आहे. देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा मागील पाच वर्षात 8% घसरल्याची आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. राज्याला 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.