बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ही सरकारी बँक त्यांच्या उपकंपनीतील मोठा हिस्सा लवकरच विकणार आहे. बँकेच्या संचालक मंडळाकडून बँकेला यासंदर्भात मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी बँकेने दिलेल्या माहितीनुसार बीओबी फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड (BFSL) या उपकंपनीतील 100 टक्के हिस्स्यापैकी 49 टक्के भागीदारी विकण्याची परवानगी बोर्डाने बँकेला दिली आहे.
बँकेने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये (Stock Exchange Filing) असे म्हटले आहे की, आता आम्ही अधिकृतपणे 49 टक्के भागीदारीसाठी रणनीती आखून जाहिरात प्रकाशित करू शकतो आणि बोली लावू शकतो. यासंदर्भातील व्यवहार प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी आज म्हणजेच 10 मार्च रोजी जाहीर करण्यात येतील, व त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल. काही रिपोर्टनुसार बँक आपला इतर व्यवसाय वाढवण्यासाठी हा हिस्सा विकत असल्याचे सांगण्यात येत आहे.
SBI अगोदर BOB ने भारतीय बाजारपेठेत आणले होते क्रेडीट कार्ड
BoB Financial Solutions ला पूर्वी बीओबी कार्ड्स लिमिटेड (BOB Cards Limited) या नावाने ओळखले जात होते. SBI चे क्रेडिट कार्ड लाँच होण्यापूर्वी 4 वर्ष म्हणजे 1994 मध्ये बँक ऑफ बडोदाने भारतीय बाजारपेठेत स्वतःचे पहिले क्रेडिट कार्ड आणले. परंतु प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत बँक ऑफ बडोदा मागे पडली. काही काळानंतर बाजारपेठेत स्थान निर्माण करण्यात आणि ग्राहकांपर्यंत पोहण्यात बँकेला यश मिळाले आणि लोकांनी बँकेच्या कार्डला पसंती दिली.
शैलेंद्र सिंग यांचे मत काय?
BoB Financial Solutions Ltd चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये मिंटला (Mint Media) एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, आम्ही भारतीय बाजारात अतिशय लवकर उतरलो. महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी उतरलो, ज्यावेळी भारतीय बाजारात क्रेडिट ब्युरोही अस्तित्वात नव्हता. साहजिकच लोकांचा सिबिल स्कोरही तपासला जात नव्हता.
भारतीय लोक क्रेडिट कार्ड (Credit Card) सारख्या उत्पादनाच्या तयारीत नव्हते. याचाच आम्हाला फटका बसला. कदाचित आम्ही थोड्या कालावधीनंतर बाजारात उतरलो असतो, तर अधिक उत्तम कामगिरी करू शकलो असतो, असे त्यांनी मिंटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.