• 31 Mar, 2023 08:26

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Axis Bank - Citi Bank Merger : तुमचं सिटी बँक अकाऊंट आणि क्रेडिट, डेबिट कार्डाचं काय होणार?

Axis Citi Bank Merger

Image Source : www.moneyduck.com

Axis Bank - Citi Bank Merger : सिटी बँकेचं अॅक्सिस बँकमध्ये विलिनीकरण पूर्ण झालं आहे. अलीकडेच कोलकातामध्ये सिटी बँकेची शेवटची शाखा बंद झाली. अशावेळी बँकेच्या सध्याच्या ग्राहकांना त्यांचं खातं, कार्ड आणि कर्जाचं आता काय होणार असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तुमच्या मनातल्या याच प्रश्नांची उत्तरं बघूया…

1 मार्चपासून सिटी बँकेचं अ‍ॅक्सिस बँकेतलं विलिनीकरण पूर्ण झालं आहे . अ‍ॅक्सिस बँक ही सध्याची देशातली तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे. सिटी बँकेच्या ग्राहक सेवा तसंच सिटीकॉर्प फायनान्स ही वित्तीय संस्था अशा दोन कंपन्या अ‍ॅक्सिस बँकेनं 11,603 कोटी रुपयांना विकत घेतल्या.       

ही विलिनीकरणाची प्रक्रिया नेमकी कशी असेल हे सिटीबँकेनं आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलं आहे. म्हणजे या विलिनीकरणामुळे सिटीबँकेच्या आताच्या ग्राहकांवर नेमका काय परिणाम होईल, त्यांनी पुढे काय केलं पाहिजे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात ज्या शंका असतील त्यांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न आहे.       

ATM सेवा, बँकेचे विविध चार्जेस, क्रेडिट - डेबिट कार्ड तसंच सध्याचं कर्ज या सगळ्यांचं काय होणार जाणून घेऊया.      

Table of contents [Show]

1. सिटी बँकेतल्या सध्याच्या खात्याची माहिती, नंबर बदलेल की तसाच राहील?       


हो. सिटी बँकेतल्या खात्याची कुठलीही माहिती बदलणार नाही. आपल्या वेबसाईटवर सिटी बँक म्हणते, ‘सिटी बँकेचा खाते क्रमांक, micr कोड, IFSC कोड, डेबिट कार्ड, चेकबुक, क्रेडिट कार्ड इतकंच कशाला, तुमचे बँक सेवांचे चार्जेसही तसेच राहतील. तुमच्या खात्यावर तुम्हाला मिळणारे इतर लाभही तसेच राहतील’      

2. सिटी बँकेच्या खात्यात नेमके काय बदल होतील?       

1 मार्चनंतर सिटी बँकेच्या ग्राहकांना दोन मोठे बदल जाणवत आहेत. अ‍ॅक्सिस बँकेचे व्याजदर सिटी बँकेपेक्षा जास्त आहेत. आणि सिटी बँकेच्या ग्राहकांना आता नवे वाढीव व्याजदर लागू होतील.       

दुसरं म्हणजे परदेशात पैसे पाठवणं किंवा तिथून भारतात मागवणं यासाठी लागणारा SWIFT कोड आता बदलला आहे. नवा कोड आहे AXISINBB      

3. सिटी बँक ग्राहकांना अ‍ॅक्सिस बँकेचं ATM वापरता येईल का?       

हो. अ‍ॅक्सिस बँकेचं ATM आता सिटी बँक ग्राहकांना स्वत:च्या बँकेचं म्हणून वापरता येईल. म्हणजे अ‍ॅक्सिस बँकेच्या ATM मध्ये केलेले व्यवहार आता थर्ड पार्टी वापरासारखे नसतील.       

सिटी बँकेचे ग्राहक म्हणून जितके ATM व्यवहार तुम्हाला करता येत होते तितकेच तुम्हाल अॅक्सिस बँकेत करता येतील. आणि त्यासाठी सिटी बँके इतकेच दर लागतील.       

Citi Bank Debit Card
Source : www.thecurrencyshop.com.au

4. माझ्या सिटी बँकेतल्या मुदतठेवीचं काय होईल?       

मुदतठेव जशी असेल तशी सुरू राहील. अगदी त्याला ऑटोरिन्युअलचा पर्याय दिलेला असेल तरी तो तसाच राहील.       

सिटी बँकेनं यापूर्वीच 5000 रुपयांपेक्षा कमी असलेली मल्टी डिपॉझिट खाती पैसे काढून घेऊन रिक्त करण्याची नोटीस ग्राहकांना दिली होती. 28 फेब्रुवारी पूर्वी ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित होतं.       

काहींनी या मुदतठेवी काढल्या नसतील तर आता मुदतठेवी आपोआप बंद होऊन ते पैसे खात्यात जमा केले जातील. किंवा आता नवीन बँकेच्या नियमानुसार या मुदतठेवी बदललेल्या चार्जेससह तुम्हाला सुरू ठेवता येतील. त्यासाठी अर्थातच, अ‍ॅक्सिस बँकेचे नियम लागू होतील.        

5. सिटी बँक डेबिट कार्डाची माहिती, रिवॉर्ड पॉइंट्स यांचं काय होणार?       

डेबिट कार्डाची पैसे काढून घेण्याची मर्यादा बदलणार नाही. तुमचं सध्याचं कार्ड आधीचे दर, लाभ यानुसारच सुरू राहील.       

इतकंच नाही तर तुमच्या सिटी बँक डेबिट कार्डावरचे तुमचे रिवॉर्ड पॉइंटही कायम राहतील. आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ते वळते करून घेऊ शकाल. शिवाय रिवॉर्ड्स पॉइंट्स वाटपाची पद्धतही पूर्वीचीच राहील. आणि रिडेम्पशन प्रक्रियाही बदलणार नाही.       

6. व्याजदर, बिलिंग सायकल, फी, रिवॉर्ड्स, क्रेडिट कार्डाची कर्ज मर्यादा यात काय बदल होतील?       

डेबिट कार्डाप्रमाणेच क्रेडिट कार्डही तसंच राहील. आणि त्याविषयीचे नियमही फारसे बदलणार नाहीत. सिटी बँक क्रेडिट कार्डावर तुम्हाला मिळणारी क्रेडिट लिमिट तशीच राहील. बिलिंग सायकल बदलणार नाही. की, बिल निघण्याची तारीख बदलणार नाही. अगदी बिल भरण्याची शेवटची तारीखही तीच असेल.       

क्रेडिट कार्डाचं बिल भरायला उशीर झाला तर रकमेवर बसणारं व्याजही बदलणार नाही. किंवा इतर कुठलेही चार्जेसही बदलणार नाही.       

ज्या गोष्टींमध्ये बदल होईल त्या ग्राहकांना पत्र लिहून कळवलं जाईल, असं सिटी बँकेनं त्यांच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. रिवॉर्ड पॉइंट्समध्येही काही बदल होणार नाही.      

Citi Bank World Debit Card
Source : www.online.citibank.co.in

7. क्रेडिट कार्डाच्या बिल पेमेंटमध्ये बदल होईल का?       

तुम्ही सध्या ज्या पद्धतीने क्रेडिट कार्डाचं बिल भरताय तिच पद्धत सुरू ठेवण्याचा सल्ला सिटी बँकेनं ग्राहकांना दिला आहे. जर या पद्धतीत काही बदल करायचा झाला तर तुम्हाला आगाऊ सूचना देऊन कळवलं जाईल असं सिटी बँकेनं म्हटलं आहे.       

7. सिटी बँक गोल्ड बँकिंगचे फायदे मिळत राहतील का?       

सिटी बँकेच्या गोल्डन ग्राहकांचे काही फायदे मात्र तात्पुरते स्थगित होतील. जगभरातली सिटी बँकेची लाऊंजेस्, आपत्कालीन परिस्थितीत मिळणारी रोख रक्कम, होम कनेक्ट सेवा, रिलोकेशन अकाऊंट सेवा, सिटीगोल्ड स्टेटस, क्रेडिट पोर्टेबिलिटी या सेवा तात्पुरत्या स्थगित होतील.       

8. NRI खात्यात काय बदल होतील?       


सध्या सुरू असलेली NRI खाती आताच्या नियमांनुसारच चालतील. NRE, NRO तसंच FCNR यामध्ये काही बदल होणार नाही. सिटी बँकेचा सध्याचा दर त्यासाठी लागू असेल. पण, नवीन NRI खाती उघडताना मात्र अॅक्सिस बँकेचे नियम लागू होतील.       

तर परदेशातून पैसे मागवताना किंवा परदेशात पाठवतानाचा SWIFT कोड मात्र आता बदलेल. नवा कोड असेल AXISINBB.      

1099 हे सर्टिफिकिट मिळणं बंद होईल. तुम्हाला व्याजाचं तसंच TDS सर्टिफिकिट हवं असेल तर ते तुम्हाला सिटी बँकेच्या वेबसाईटवर मिळू शकेल.       

9. गृहकर्ज आणि होम लोन प्रॉपर्टी टर्म लोनचं काय होईल?       


तुम्हाला सिटी बँकेनं दिलेलं कर्ज पूर्णपणे वितरित झालं आहे की, त्याचा काहीच हिस्सा दिला गेला आहे, हे आधी तपासून पाहिलं जाईल. आणि त्यानंतर तुमचं सध्याचं कर्ज अ‍ॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केलं जाईल. कर्ज घेताना तुम्ही बँकेबरोबर कर्जाचा एक करार करत असता.       

तुमचा सिटीबँकेबरोबर असलेला करारही आता अ‍ॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित होईल.       

कर्जाचा व्याजदर पूर्वी इतकाच राहील. तो बदलता असेल तर बेंचमार्क रेट बदलेल तसे बदल त्यात होत राहतील. इतर कुठलाही बदल अ‍ॅक्सिस बँक करणार असेल तर तुम्हाला तसं आधी कळवलं जाईल.       

10. बेंचमार्क कर्ज दरात काही बदल होईल का?       

कर्जासाठी जो बेंचमार्क दर ठरला आहे त्यात सध्या तरी कुठलाही बदल होणार नाही. कर्जाचा बँकेबरोबरचा करार नक्की बदलेल. आणि त्यावेळी तुमचं कर्ज ट्रेझरी बिल लिंक्ड रेटशी जोडलेलं आहे का हे पाहिलं जाईल. तसं असेल त रिपर्चेज करार करावा लागेल. तो बँक तुमच्याकडून करून घेईल.       

त्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी तुमच्याशी संपर्क साधतील.       

जर कर्ज सिटी बँक मॉर्टगेज रेटला जोडलेलं असेल तर बेस रेटमध्ये काहीही बदल होणार नाही.       

त्यातून काही नियम बदललेच तर तुम्हाल पूर्वकल्पना दिली जाईल. आणि वरील दोन्ही शक्यतांमध्ये तुमचा कर्जावरील व्याजदर तोच राहील.       

12. कर्जासाठी नवीन करार करावा लागेल का?       


अ‍ॅक्सिस बँक बरोबर कोणताही नवा करार करावा लागणार नाही. आहे तो करार फक्त हस्तांतरित होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा स्टँप ड्युटी किंवा इतर कुठलेही चार्जेस भरण्याची गरज नाही.       

इतकंच नाही तर कर्जाच्या सेवा दरांवरही परिणाम होणार नाही. ते आहेत तेच राहतील.       

कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नवीन मँन्डेट देण्याचीही गरज नाही. सध्याच्या पद्धतीनेच emi भरणं सुरू राहील.       

Citi Bank Branches would be Axis bank Branches now
Source : www.fortuneindia.com

13. सिटी बँक डी-मॅट खात्याचं काय होईल?       

डी-मॅट खात्याची मालकी आता अ‍ॅक्सिस बँकेकडे जाईल. DPID खातं आता नवीन बँकेचं असेल. पण, डी-मॅट किंवा DPID खाते क्रमांक बदलणार नाहीत. इतकंच नाही तर डी-मॅट खात्यात व्यवहार करायचा झाला तर अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात जाऊनही तुम्ही di स्लिप्स भरून व्यवहार करू शकाल.       

यात काही बदल करायचा झाल्यास ग्राहकांना पत्र आणि ईमेलवर तो कळवला जाईल असं सिटी बँकेनं वेबसाईटवर म्हटलंय.      

14. सिटी बँकेतल्या म्युच्युअल फंड खात्यांचं काय होईल?       

तुमचं म्युच्युअल फंड खातं अ‍ॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित करण्यात येईल (ARN 0019). तुमची गुंतवणूक, त्यावर मिळालेला परतावा, पोर्टफोलिओ आणि इतर व्यवहार तुम्हाला बँकेच्या शाखा, रिलेशनशिप मॅनेजर, सिटीबँक ऑनलाईन सेवा आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सुरू ठेवता येतील.       

सिटी बँकेकडून दिलं जाणारं इन्व्हेस्टर रिस्क रेटिंग कायम राहील. इतकंच नाही तर रेटिंग प्रक्रियेचं नुतनीकरण करताना आताचेच नियम लागू राहतील.       

रिसर्च रिपोर्ट, इनसाईट्स, प्रोडक्सविषयी माहिती या गोष्टी ग्राहकांना पहिल्या सारख्या मिळत राहतील.       

15. सिटी बँकेच्या विमा पॉलिसींचं काय होईल?       


सिटी बँकेकडून घेतलेल्या पॉलिसींचे नियम आणि लाभ तसेच राहतील. तुमचा विमा हप्ता आणि तो भरण्याची पद्धतची तीच राहील. शिवाय तुमच्या विम्याची रक्कमही बदणार नाही.       

तुम्हाला विम्याबरोबर ज्या सुविधा मिळतात, त्या ही सुरू राहतील. आणि विम्याचा हप्ताही बदलणार नाही.       

16. सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये काय बदल होतील?       

बाँडचं मूळ खातं हे रिझर्व्ह बँकेकडे उघडलेलं असतं. त्यासाठीचं माध्यम मधल्या बँका असतात. त्यामुळे माध्यम बँक बदलल्याची नोंद रिझर्व्ह बँक घेईल. तुमचं रिसिव्हिंग ऑफिस बदलून आता अ‍ॅक्सिस बँक होईल. तुम्हाला बाँडमध्ये कुठलाही व्यवहार करायचा झाला तर बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही करू शकता.       

बाँड खरेदी ऑनलाईन केलेली असेल तर ती त्याच स्वरुपात सुरू राहील.       

सिटी बँकेचे ग्राहक मोबाईल अ‍ॅप, सिटी बँकेची ऑनलाईन सेवा यांचा वापर पूर्वी सारखाच सुरू ठेवू शकतील. सिटी फोन तसंच रिलेशनशिप मॅनेजरही बदलणार नाहीत. आणि तुमच्या सिटी बँकेची शाखा आता अ‍ॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित झाली असली तरी तिथे तुम्हाला पूर्वीच्या सेवा मिळणारच आहेत.