अलीकडील काही वर्षात गुंतवणुकीचे साधन म्हणून म्युच्युअल फंड (Mutual Fund) अधिक लोकप्रिय झाले आहेत. अधिक चांगल्या रिटर्न्सच्या अपेक्षेने लोक म्युच्युअल फंडाचा मार्ग निवडत आहेत. मात्र, यामध्येही लोकांसमोर अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झाले आहेत. लोकांना समजत नाही की, त्यांनी कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी.
म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. पहिला एक्टिव म्युच्युअल फंड (Active Mutual Fund) आणि दुसरा पॅसिव्ह म्युच्युअल फंड (Passive Mutual Fund). कोरोना महामारीच्या काळात पॅसिव्ह फंड झपाट्याने उदयास आला आहे. नवीनतम AMFI डेटानुसार, जानेवारी 2023 मध्ये ETF मार्केटमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. जानेवारी 2022 मध्ये ईटीएफचा मार्केटमधील हिस्सा 11.2 टक्के इतका होता, जो जानेवारी 2023 मध्ये वाढून 13.1 टक्के झाला आहे.
एका वर्षात 56 टक्क्यांची वाढ
डिसेंबर 2022 पर्यंत म्युच्युअल फंड खात्यांची संख्या 14 कोटी 11 लाख 19 हजार 590 होती, ज्यामध्ये इक्विटी आधारित खाती 67.5 टक्के, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) आणि फंड ऑफ फंड्स (FOF) यांचा वाटा 12.5 टक्के आणि हायब्रिडचा योजनेचा वाटा 8.5 टक्के इतका होता. खात्यांच्या संख्येच्या बाबतीत, ETFs आणि FoFs डिसेंबर 2022 मध्ये हायब्रीड आणि डेट-आधारित फंडांना मागे टाकत दुसरी सर्वात मोठी श्रेणी बनले आहेत. ETF आणि इंडेक्स फंडांची संख्या 31 जानेवारी 2022 रोजी 196 वरून 31 जानेवारी 2023 पर्यंत 305 पर्यंत वाढली आहे. या संदर्भात, केवळ एका वर्षात 56 टक्के वेगाने वाढ नोंदवली गेली आहे.
दोन्हीमध्ये फरक काय?
जर तुम्हाला गुंतवणुकीची माहिती नसेल किंवा तुम्हाला फार कमी माहिती असेल, तर ईटीएफ आणि इंडेक्स फंड यांसारख्या पॅसिव्ह फंडांद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे योग्य आहे. पॅसिव्ह फंड अशा गुंतवणूकदारांसाठी आहे, ज्यांना कमी जोखीम घ्यायची आहे. तसेच, कोणत्या फंडात गुंतवणूक करावी हे निवडण्याच्या त्रासापासून ते तुम्हाला मदत करतील.
एक्टिव आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड म्हणजे काय?
पॅसिव्ह म्युच्युअल फंड हा बाजाराचा मागोवा घेतो. यामुळे, एक्टिव फंडाच्या तुलनेत त्यात कमी अस्थिरता आहे. हे नवीन गुंतवणूकदारांसाठी किंवा त्या गुंतवणूकदारांसाठी चांगले आहे, जे परताव्यापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देतात. इंडेक्स फंड आणि ईटीएफ हे पॅसिव्ह फंड आहेत जे त्यांच्या अंडरलाईन बेंचमार्कचा मागोवा घेतात. हे दोन्ही फंड बेंचमार्क निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
उदाहरणावरून समजून घेऊयात
उदा. निफ्टी 50 इंडेक्स फंड किंवा ईटीएफ निफ्टी 50 च्या 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. त्याचप्रमाणे सेन्सेक्स इंडेक्स फंड किंवा ईटीएफ सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. गोल्ड, कमोडिटीज, बँक, हेल्थकेअर यासह अनेक श्रेणींसाठी ईटीएफ आणि इंडेक्स फंड उपलब्ध आहेत. तर, इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, हायब्रीड फंड किंवा फंड ऑफ फंड इत्यादी एक्टिव फंडाच्या कक्षेत येतात.
जेव्हा एक्टिव म्युच्युअल फंडांचा विचार केला जातो, तेव्हा एक्टिव मॅनेज्ड म्युच्युअल फंडांचे मॅनेजर फंडाची रणनीती तयार करण्यासाठी भरपूर अभ्यास आणि विश्लेषण करतात. एवढेच नाही तर ते नियमितपणे खरेदी-विक्रीशी संबंधित निर्णय घेतात. येथे फंड मॅनेजर सक्रियपणे एक्टिव म्युच्युअल फंड व्यवस्थापित करतात. याशिवाय, गुंतवणूकदारांना जास्त संशोधन किंवा विश्लेषण करण्याची गरज नाही, कारण हे काम फंड मॅनेजरद्वारे केले जाते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)