मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे तो नेहमीच महत्त्वाचा असतो. वर्षभरातल्या पडून राहिलेल्या गोष्टी या महिन्यात संपवायच्या असतात. काहींना कर बचतीसाठी गुंतवणूक करायची असते, काहींना पॅन कार्ड - आधारला जोडायचं असतं. अशा अनेक गोष्टी या महिन्यात पार पाडायच्या असतात.
त्या बरोबरीने ‘या’ सहा गोष्टींकडेही लक्ष द्या. कारण, या बदलांचा परिणाम तुमच्या गुंतवणूक निर्णयांवर होणार आहे. पारंपरिक विमा पॉलिसींमध्ये जास्त हप्त्याच्या पॉलिसी टाळा, म्युच्युअल फंडातल्या खात्यासाठी नॉमिनी नक्की नेमा. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. कारण, 31 मार्च नंतर सरकार ही योजनाच बंद करेल असा अंदाज आहे. त्यामुळे तुमच्या हप्त्यावर कर बचतीचा फायदा कदाचित मिळणार नाही.
अशा या महत्त्वाच्या सहा गोष्टी आहेत. त्या आता सविस्तर बघूया…
1. नामनिर्देशन नसलेली म्युच्युअल फंड खाती गोठवली जातील
सध्या गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडांसाठी आता नामनिर्देशन (नॉमिनी) दिलेलं असलं पाहिजे. किंवा अशा फंडासाठी ऑप्टिंग आऊटचा पर्याय दिलेला असला पाहिजे. म्युच्युअल फंड खातं वैयक्तिक नावावर किंवा संयुक्त नावावर असलं तरी हे नियम लागू आहेत.
त्यामुळे म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक खात्यासाठी नॉमिनी किंवा ऑप्ट-आऊट पर्याय निवडलेला आहे की नाही याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया केलेली नसेल तर 31 मार्चनंतर अशी म्यच्युअल फंड खाती गोठवली जातील. आणि अशा खात्यांमधून फंड युनिट्स विकता येणार नाहीत.
2. PMVVY मध्ये गुंतवणूक करण्यासाठी शेवटचा महिना
साठ वर्षांच्या वर वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने जाहीर केलेली एक योजना आहे, प्रधानमंत्री वय वंदना योजना. सध्या या योजनेची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. आणि सरकारने ही मुदत वाढवली नाही तर योजनाच बंद पडू शकते.
2017 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एकदाच 15 लाखां पर्यंतचा हप्ता भरला की, पुढची दहा वर्षं या योजने अंतर्गत तुम्हाला वर्षाला 1.11 लाख रुपये मिळत होते. अशा या योजनेची मुदत दहा वर्षांची आहे. आणि वर्षाला 1.11 लाखांची हमी ही योजना तुम्हाला देत होती.
2017 मध्ये सुरुवात झाल्यानंतर पुढच्या प्रत्येक वर्षी या योजनेला मुदतवाढ मिळत गेली. म्हणजे पुढच्या प्रत्येक वर्षी गुंतवणुकदारांसाठी योजना खुलीच राहिली. पण, यावेळी योजनेला मुदतवाढ मिळेल की नाही याविषयी शंका आहे.
त्यामुळे ज्यांना PMVVY मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना 31 मार्च पूर्वीच करावी लागणार आहे. कारण, ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही योजना लोकप्रिय आहे. तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला 7.4% इतकं व्याज मिळतं.
3. पॅन आणि आधार लिंक करा
खरंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची मुदत संपली आहे. आता तुम्ही ते जोडायला गेलात तर तुम्हाला 1000 रुपये विलंब शुल्क भरावं लागणार आहे. पण, विलंबा शुल्कासह ही जोडणी पूर्ण करण्याची मुदतही 31 मार्चला संपतेय.
लक्षात ठेवा, सरकारने आधार कार्ड पॅन कार्डाला जोडणं अनिवार्य केलं आहे. आणि तसं न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमचं पॅन कार्ड रद्द होईल. आयकर विवरणपत्र भरणं पॅन कार्डाअभावी अशक्य होईल.
तुम्ही आधी भरलेलं विवरणपत्र प्रोसेस व्हायचं असेल तर ती प्रक्रिया थांबेल. आणि महत्त्वाचं म्हणजे कर परतावा रखडला असेल तर तो मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जास्तीचा आयकरही लागेल.
4. जास्त हफ्ता असलेल्या विमा पॉलिसी टाळा
तुमच्या जीवन विम्याचा हप्ता 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर असा पॉलिसीवर एरवी मिळणारी कर वजावट आता ताज्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढून घेतलीय. 31 मार्च नंतर घेतलेल्या पॉलिसींवर हा नियम लागू होणार आहे.
त्यामुळे अनेक एजंटनी या मुदतीपूर्वी मोठे हप्ते असलेल्या प्रिमिअम पॉलिसी ग्राहकांना विकायला सुरुवात केली आहे. या पॉलिसी जास्तीत जास्त खपवायच्या असा त्यांचा विचार असावा.
पण, ग्राहकांनी यात फसू नये. गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
अशा पॉलिसींवर मिळणारा परतावा कमी असू शकतो. खासकरून टर्म विम्यापेक्षा हा परतावा कमी असतो. आणि अशा पॉलिसी आपल्याकडची अतिरिक्त रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात.
5. कर बचतीला सुरुवात पहिल्या महिन्यापासून करा
अनेकदा कर बचतीच्या गुंतवणुकीला सुरुवात आपण 1 जानेवारी किंवा त्याच्याही नंतर करतो. पण, खरंतर ही सुरुवात सुरुवातीपासून झाली पाहिजे.
आताही तुम्ही कर बचतीसाठी पुरेशी गुंतवणूक केलेली नसेल तर लगेच कामाला लागा. तुमची आर्थिक उद्दिष्टं लक्षात घेऊन त्याप्रमाणे गुंतवणूक करा. PPF, नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकिट, NPS, सुकन्या समृद्धी योजना किंवा EPF अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर वाचवू शकता.
याशिवाय आरोग्य विमा, त्याचा हप्ता यातूनही तुमचं कर दायित्व कमी होऊ शकतं. गृहकर्जाची मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींवर कर सवलत मिळते. पण, या सगळ्याचं नियोजन जितक्या लवकर करता येईल तितकं चांगलं.
तुम्ही वर सांगितल्यापैकी किती साधनांमध्ये आधीच गुंतवणूक केली आहे हे तपासून उर्वरित रक्कम गुंतवायला सुरुवात करा.
6. सिटी बँक अॅक्सिस बँकेत विलीन
1 मार्चपासून सिटी बँकेचं अॅक्सिस बँकेतलं विलिनीकरण पूर्ण झालं आहे . आणि सिटी बँकेचा सर्व बिझिनेस आता देशातली तिसरी मोठी बँक अॅक्सिस बँकेकडे आला आहे. यात बँक खातं, मुदतठेवी, क्रेडिट - डेबिट कार्ड, कर्ज असं सगळंच नवीन बँकेत विलीन झालं आहे.
देशातल्या 25 लाखांहून जास्त सिटी बँक ग्राहकांसाठी हा मोठा बदल असणार आहे. बँकिंग व्यवहार त्यांच्यासाठी कसे बदलतील हे या लिंकमध्ये पाहू शकता. खात्यामध्ये फारसा बदल होणार नसला तरी गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड वापराचे नियम आता किंवा येणाऱ्या दिवसांत बदलू शकतात. आणि त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.